Saturday, April 5, 2025

बहिणाबाई अशी आली सामोरी

Share

प्रवास कधी कधी कामासाठी होतो, तेव्हा प्रेक्षणीय स्थळे लक्ष नसतातच. मात्र कामानिमित्त अनेक माणसं भेटतात, आणि त्यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर दिसू लागतात, अन एरवी अगदी साधी वाटणारी माणसं एकदम विलक्षण वेगळी भासू लागतात. ही माणसं असामान्य सामर्थ्याने, शांतपणे, दीर्घकाळ चिकाटीने जीवन व्यतीत करताना पाहिली म्हणजे मन अवाक होते. जळगावच्या प्रवासात अशा अनेक स्त्रिया भेटल्या. काहींची घरे एक खांबी होती,तर काहीजणी रथाच्या दुसऱ्या समर्थ चाकासारख्या होत्या. कमालीचं धाडस, कठिण परिश्रम आणि टोकाचा निर्धार यासारखे शब्द सुद्धा तोकडे पडावेत त्यांचे वर्णन करायला. मुलांचे भविष्य घडवण्यासाठी कितीही कष्ट करायची त्याची तयारी होती, किंबहुना त्या करतच होत्या. आपण यशस्वी होणारच ही श्रद्धाच तारून नेत असावी.

जेंव्हा जेंव्हा फर्दापूरला MTDC गेस्ट हाऊसमधे राहायची वेळ येते, तेंव्हा त्याच्या शेजारी असलेल्या सिद्धेश्वर नावाच्या धाब्यावर भाजी भाकरी खाण्याचा योग येतो. एक मावशी त्यांचे आई, वडील व मुलगा यांच्या मदतीने तो चालवतात. यजमानांच्या अकाली निधनानंतर काही काळ शेतावर मजूर म्हणून काम करून पाहिलं,पण हा ढाबा चालविणे हाच त्यांना योग्य पर्याय वाटला. या व्यवसायाच्या आधाराने घर चालविणे त्यांना शक्य झाले, मुलांचे शिक्षण व लग्न देखील या जोरावर पार पडली.

भाजीचे मोजके पर्याय,गरम ताजी भाकरी किंवा पोळी, गरम भात आणि डाळ हा मेनू कायम उपलब्ध असतो. रस्त्याच्या कडेला टाकलेली बाज, संध्याकाळचे गार वातावरण ( हो अगदी परवा परवा पर्यंत संध्याकाळी हवा गार होती ) आणि गरम भाकरीचा बेत, सारं कसं अगदी आल्हाददायक. आणि शेवटी गरम चहा ही त्यावर कडी. शिवाय मावशींची आपुलकीची वागणूक, घरातले सगळेच अगदी आत्मीयतेने वागणारे. ( हा लाख मोलाचा आदरातिथ्याचा पाठ कुठे शिकले सगळे देवजाणे. ) एरवी शक्यतो ट्रक ड्रायव्हर बरेच येतात त्यांच्याकडे. हजार पंधराशे कुठे जात नाहीत दिवसाला त्या म्हणाल्या.

मोफत रेशन असतेच,शिवाय निराधार योजनांमधून थोडे पैसे महिन्याला मिळतात, ” ताई घर छान चाले ना आमचे “, त्या खानदेशी हेल काढून म्हणतात. या लहान वाटणाऱ्या योजना किती महत्वाच्या ठरतात वेळ आल्यावर ,हे लक्षात येऊन मी आवंढा गिळला. वडील स्वच्छता करतात,मुलगा नोकरी करतो व सामानाची नेआण करतो. लग्नही झालंय त्याचं. आई तिच्या हातचे लोकांना आवडणारे पदार्थ करायला मदत करते.

नेहेमी समाधानीच दिसतात सगळे. ( जवळ जवळ दहा वर्ष तरी भेट होतेच आहे ) प्रकृती चांगली असल्याने घर छान चालवता येते याचा आनंद कायम असतो त्यांच्या चेहेऱ्यावर. पतिनिधनानंतर त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या, संसाराचा गाडा हाकला याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर कायम विलसत असतो.

सर्व शक्तिनिशी ही अवघड लढाई त्या लढल्या, खचणे मंजूर नव्हतेच, म्हणून आज हे दिवस दिसले. आता धाब्यावर बरीशी फरशी घातली आहे, सीलिंग फॅन आहे, चांगल्या पत्र्याच्या भिंती आहेत, परिस्थिती पालटते आहे. यावर कडी म्हणजे स्वच्छता व सस्मित स्वागत.

परतीच्या दिवशी केळे वेफर्स घ्यायचे होते,म्हणून एक रस्त्याच्या कडेला असलेल्या तळणीपाशी थांबलो. तळणीला थोडा वेळ लागणार असल्याने तिथल्या मावशींशी बोलणे झाले. सुशीला ताई, त्यांचे नाव. समोर केळी ढीग करून ठेवली होती,त्या सरासर ती सोलत होत्या. त्यांचे यजमान ते ढीग किसणीने किसून वेफर्स टाकत होते. सकाळी लवकरच त्या कामाला लागतात. लवकर उठून, घरचे काम आवरून केळी सोलायला बसतात. रस्त्यावर घर असल्याने ग्राहक तयारच असतात,काही उरत नाही दाखवायला सुद्धा, सुशीला ताई उत्साहाने म्हणाल्या. केळी उत्पादन मोठेच आहे इथे, ५ क्विंटल तरी केळी आणतो एकदम. रोज किमान एक सव्वा क्विंटल तरी लागतात,तेव्हा २५/३० किलो वेफर्स तयार होतात. एका बाजूला हात थांबलाच नव्हता. घरात सगळी आवरा आवर झाली होती, दिवसा वातावरण चांगलेच तापते, पण हात थांबवून चालत नाही.

सोललेल्या केळी आणि न वापरण्या सारख्या केळी ढिगाचा वापर जनावरांना होतो खाद्य म्हणून, थोडे पैसे पण मिळतात, खेरीज वाया पण जात नाही. सुशीला ताईंनी सांगितले.

एकदम काहीसं आठवून म्हणाल्या ताई गावात घर बांधायला घेतले आहे, लोन काढलंय,( बहुतेक जन धन खाते असावे ) ते झाले की मग इथे अजून काहीतरी सुरु करता येईल. हा मात्र माझ्यासाठी आनंदाचा सुखद धक्काच होता.( बँकेला दर महिन्याला हप्ता देता येण्याइतका पैसा आहे आणि बँकेला तेवढी खात्री देता आली हे केवढे विशेष ) हे सगळे ऐकणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात किती फरक होता,त्यांचा घरचा विषय काढताच हरखलेला चेहरा अजून दिसतो मला. अर्थात त्यांच्या अपरंपार कष्टाला सीमाच नाही.

कोणीतरी ही वेफर्सची कल्पना सांगितली, प्रयोग करत करत यश मिळाले,मग कष्टही आनंदाचे झाले, संसार उभा राहिला. त्याआधी शेतात मजुरी हाच पर्याय होता.

गेली १४ वर्ष हे दोघे हा व्यवसाय करताहेत. चित्र तर पालटत आहे,खंत एकच, मुलांना यात रस नाही, त्यांची लग्न झाल्यावर सूना साथ देतील कदाचित, ही आशा. दशरथ दादा, त्यांचे यजमान आमचे बोलणे एकीकडे तळताना ऐकत होते व मान डोलवत होते.

जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा तळणी दिसतात, घरातल्या स्त्रिया पण बरोबरीने काम करतात. केळी उत्पादन पण मोठे आहे,त्याला अजून एक दिशा. शिवाय तिखट मीठ, चाट मसाला किंवा मिरेपूड लावून चविष्ट लागणारे वेफर्स देखिल मिळायला लागले आहेत.अर्थार्जनाचे एक चविष्ट दालनच तयार झालंय. खान्देशात शेतीवर अवलंबून एक नवीन व्यवसाय तयार झालाय.

मुक्ताई नगरला चांगदेव मंदिरा जवळ एक तरुण स्त्री त्या बरोबर चहा पण करून देत होती. सकाळी लवकरच येते आवरून,मग उशिरा पर्यंत चालते काम असे म्हणाली. बोलता बोलता सुंदर चहा करून दिला. तिची चपळाई थक्क करणारी होती.

मागे पोलिस दलात भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूण मुलीही दिसल्या होत्याच फर्दापूर जवळच्या लहानशा गावात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमालीचा होता. कोरोना काळात इंटरनेट सर्वत्र पोचले आणि त्या बरोबर माहितीही,ही तरुणाईचे क्षितिज विस्तारणारे ठरले. अपेक्षा उंचावल्या.

पर्यटनाने सेवा क्षेत्र देखील विस्तारले. शेती आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या खान्देशात त्याचा सुरेख फायदा स्त्रियांनी करून घेतला असे चित्र दिसते आहे खरे.

तिथला असह्य उकडा, आग ओकणारा सूर्य, चढणारा पारा,तळणी जवळची धग,या कशाचाही परिणाम त्यांच्या उत्साहावर होताना दिसत नाही. त्यांच्या निरंतर कष्टाला खळ नाही. घर संसार उभा करताना कष्टाची तमा त्या बाळगतच नाहीत. यश मिळणारच हा त्यांचा विश्वास.

कधी कधी फार हिरमुसायला होते,किंवा निराशा घेरते अशा वेळी या सगळ्यांचे चेहरे आठवले की तक्रार करायला वाव कुठंय. मनाला आधार मिळतो,उभारी येते.

आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर,हे वास्तव असे पुढे येईल असे वाटले नव्हते.

विद्या देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख