महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ‘तपोवन’ येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. ‘वृक्षवृल्ली आम्हा सोयरे… होय! संत तुकारामाचा वारसा आम्हीच चालवतो!!’ असे म्हणत उपाध्ये यांनी विरोधकांचे ‘वृक्षप्रेम’ ढोंगी असल्याची टीका केली आहे.
उबाठा आणि अमराठी बिल्डर
केशव उपाध्ये यांनी थेट मुंबई महानगरपालिकेतील उबाठाच्या वर्षानुवर्षे असलेल्या सत्तेवर बोट ठेवले.
“मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे उबाठा सत्ता उपभोगते आहे. याच महापालिकेत ‘वृक्षतोड समिती’ने बिल्डरांच्या फायद्याकरिता किती झाडे तोडायला परवानगी दिली?” असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे, यातील बहुतांशी बिल्डर अमराठी असतानाही, त्यांच्या प्रकल्पांसाठी उबाठाच्या सत्तेने किती झाडांचा जीव घेतला, याचा हिशोब करण्याची मागणी त्यांनी केली.
राज ठाकरे आणि ‘आरे’ जंगल
राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या भूमिकेवरूनही उपाध्ये यांनी टीका केली.
काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुभाष घई यांना ‘व्हिसलिंग वूड्स’ फिल्म इन्स्टिट्यूटसाठी आरेच्या जंगलात कमी दरात जमीन दिली. त्यावर न्यायालयाने ताशेरे मारले असतानाही, राज ठाकरे यांनी सुभाष घईंची बाजू घेतली होती. “हे सुभाष घई हे ना मराठी, ना तिथली फी मराठी विद्यार्थ्यांना परवडणारी! …हे यांच मराठी आणि वृक्ष प्रेम,” असे उपाध्ये यांनी उपरोधाने म्हटले.
शरद पवार गट आणि ‘लवासा’
शरद पवार गटावरही उपाध्ये यांनी ‘लवासा’ प्रकल्पावरून जोरदार निशाणा साधला.
“आख्खं लवासा उभं करताना किती झाडे तोडली, पर्यावरणाची किती वाट लावली याबद्दल एक अक्षर हे बोलणार नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.
खरा विरोध ‘कुंभमेळ्याला’!
तपोवनातील वृक्षतोडीबद्दल बोलताना त्यांनी विरोधकांचा खरा उद्देश उघड करण्याचा प्रयत्न केला.
कमीत कमी झाडे तोडली जातील आणि जेवढी झाडे तोडली त्यापेक्षा १० पट झाडे लावली जातील, हे मंत्री गिरीष महाजन वारंवार सांगत आहेत.
हिंदू उत्सवांना विरोध
“पण यांचा (विरोधकांचा) खरा विरोध हा वृक्षतोडीला नाही, तर त्या निमित्त होणाऱ्या कुंभमेळ्याला आहे. हिंदूची परंपरा, उत्सव म्हटले की यांना मळमळ सुटते, त्रास होतो, आणि अशा ओकाऱ्या होऊ लागतात!!” असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला. सध्या लावलेली झाडे सुध्दा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच लावलेली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.