Saturday, May 25, 2024

हे यश अथक परिश्रमांचे

Share

महाराष्ट्रातील भाजपची वाटचाल सर्वार्थाने बिकट होती. भाजपच्या विचारसरणीला प्रखर विरोध होता. पक्षप्रसार अत्यंत अवघड होता. अशाही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप पाय रोवून उभा राहिला. ‘माधव थिअरी’ आणून भाजपने आपला सामाजिक पाया विस्तारला आणि पुढे तो मजबूतही केला. भाजपचा ६ एप्रिल हा स्थापना दिन. त्यानिमित्ताने या वाटचालीचा आढावा.

काही वर्षांपूर्वी भाजपची महाराष्ट्रात `भटाबामनांचा’ पक्ष अशी अवहेलना होत असे. टिंगलटवाळी सहन करणे, हे भाजप कार्यकर्त्यांचे व्यवछेद्क लक्षण मानले जात असे. अनेक भाजप कार्यकर्त्यांना ग्रामीण भागात अघोषित सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले. कित्येक कार्यकर्त्यांच्या पदरी घरातसुद्धा उपेक्षाच पडत असे. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर, म्हणजे पक्ष स्थापनेनंतर अवघ्या चार वर्षात भाजपच्या पदरात घोर अपयश पडले. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन काॅंग्रेसने अभूतपूर्व यश मिळवले. सर्वच विरोधी पक्षांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले. पुण्यात काही ठिकाणी भिंतीवर घोषणा लिहिली गेली होती. ही घोषणा होती, पर्यायी पक्ष म्हणतो कोण, लोकसभेत जागा मिळाल्या दोन. भाजपने या काळात स्वतःला पर्यायी पक्ष म्हणून प्रोजेक्ट केले होते, परंतु जागा फक्त दोनच मिळाल्या. ही घोषणा अर्थातच काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी लिहिली होती. मात्र आज ४० वर्षानंतर पुण्यातील काॅंग्रेस भवनात ऐन निवडणुकीतसुद्धा गर्दी दिसत नाही आणि भाजपचे कार्यालय सदैव कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या गर्दीने भरलेले असते. भाजपाचा हा ४० वर्षांचा हा प्रवास अचंबित करणारा आहे.

परिवर्तनाचे मोठे कारण…
ऐंशीच्या दशकात भाजपला महाराष्ट्रात केवळ सात टक्के मते मिळाली होती. नव्वदच्या दशकात ही टक्केवारी फक्त दहा टक्के होती. २००० नंतर थोडीशी प्रगती होऊन भाजपची मतदानातील टक्केवारी १४ टक्क्यांपर्यंत गेली होती. याच कालावधीत भाजपने आपल्या परंपरागत प्रतिमेला छेद दिला. भटाबामनांचा पक्ष मानल्या गेलेल्या पक्षाने ग्रामीण भागात सामाजिक पाया विस्तारला. या परिवर्तनाचे सर्वात मोठे करण म्हणजे पक्षाने अंमलात आणलेली ‘माधव थिअरी’.

राजकारणात सोशल इंजीनिअरिंगचे श्रेय उत्तररेतील पक्षांना दिले जाते. सोशल इंजिनअरिंग ही कल्पना मंडल आयोगानंतर उदयास आलेल्या राजकारणाची देणगी मानली जाते. तथापि, त्यापूर्वीच भाजपने हा प्रयोग महाराष्ट्रात केला आणि तो यशाचा मार्ग होता. महाराष्ट्रात आजही मराठा समाजाचा राजकारणावर प्रभाव आहे. काही वर्षांपूर्वी हा प्रभाव ‘undisputable’ होता. मराठा समाज परंपरागत काॅंग्रेसच्या विचारधारेशी बांधील राहिला होता. (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसचेच वैचारिक अपत्य आहे). राजकीय कोंडीतून बाहेर पडण्यासाठी भाजपने माधव थियरीची अंमलबाजवणी केली. माधवचा अर्थ माळी’,धनगर’ आणि’वंजारी’ या तीन जातींचे एकत्रीकरण. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या तीनही जाती प्राबल्य राखून आहेत. राज्याच्या सर्व भागात हे तीनही जाती समूह पसरलेले आहेत. संख्यात्मकदृष्ट्या या तीनही जाती बलवान होत्या आणि आहेत. हे तीन जातीसमूह एकत्र आले तर संख्यात्मक ताकद उभी राहून पक्षाचा सामाजिक पाया व्यापक होण्यास मदत होईल, हा भाजपचा अंदाज होता. विशेष म्हणजे या तीनही जाती ‘ओबीसी’ प्रवर्गातील. साहजिक ‘ओबीसी’ प्रवर्गातील अन्य जातीसुद्धा भाजपकडे आकृष्ट झाल्या. याचवेळी भाजपने ताकदवान मराठा नेत्याना संधी देऊन सामाजिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसअंतर्गत कंटाळलेल्या अनेक मराठा नेत्यांनी भाजपला पसंत केले. भाजपची ही खेळी तंतोतंत यशवी झाली. माधव थियरीसाठी भाजपने अत्यंत काळजीपूर्वक तीन नेत्यांची निवड केली. हे नेते होते प्रा. ना. स. फरांदे (माळी), अण्णासाहेब डांगे (धनगर) आणि गोपीनाथ मुंडे (वंजारी). या त्रिकूटाने पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविला आणि भाजपची राज्यात प्रगती सुरू झाली.

१९८५ साली भाजपने विधानसभेच्या ६७ जागा लढविल्या आणि केवळ १६ जागांवर विजय संपादन केला. तीस वर्षांतर भाजपने स्वबळावर १२२ विधानसभा जागांवर विजय संपादन केला. १९९० नंतर प्रथमच महाराष्ट्रात एंका पक्षाने शंभरच्या वर जागा मिळविल्या होत्या. यापूर्वी १९९१ साली काॅंग्रेसने १९९० साली १६१ जागा जिंकल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, शिवसेना-भाजप युतीने १९९५ साली संयुक्तपणे १३८ जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या माधव थियरीचे दृश्य परिणाम १९९० नंतर दिसू लागले होते.

सर्वसमावेशक विस्तार
अनेक टीकाकार भाजपच्या महाराष्ट्रातील यशाचे श्रेय शिवेसेनेला देतात. मात्र हा दावा भाजपवर अन्याय करणारा आहे. भाजपचे कार्यकर्ते याच काळात पक्षाचा कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये जात होते. युती म्हणजे स्वपक्षाच्या विस्तारावर मर्यादा नव्हे याची स्पष्ट जाणीव भाजप नेतृत्वाला होती. यात गैर काय आहे? दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचा याच कालावधीत राष्ट्रीय पातळीवर लक्षणीय विस्तार होत होता. महाराष्ट्र त्याला अपवाद असण्याचे काहीही कारण नव्हते. देशभरातील मानस राजकीयदृष्ट्या हिंदुत्वाने भारलेले होते. काॅंग्रेससविरोधी अवकाश भाजपने स्वबळावर भरून काढला तर कोणाला पोटदुखी होण्याचे कारण नाही. काॅंग्रेससविरोधी स्पेस भरून काढण्याची शिवसेनेला तेवढीच संधी होती. ही संधी सेनेने चुकवली याला भाजप जबाबदार कसा? वस्तुतिथी अशी आहे की, सेनेने मुंबई आणि कोकण पट्ट्यापालिकडे कधीही गंभीरपणे बघितले नाही. मुंबई आणि कोकणापालिकडे सेनेचे अस्तित्व त्या त्या भागातील स्थानिक नेत्यांमुळेच होते आणि आहे. त्यात पक्षाच्या मुंबईतील नेतृत्वाचा फार कमी सहभाग होता. बाळासाहेब ठाकरे हयात असतानासुद्धा सेनेची एका मर्यादेपालिकडे वाढ झाली नाही. या वास्तवाला भाजप जबाबदार कसा? या उलट भाजपने पक्षावाढीची एकही संधी सोडली नाही. देशभरातील हिंदुत्वाच्या वातावरणाचा महाराष्ट्र भाजपने पुरेपूर फायदा घेतला आणि पक्षविस्तार केला. हा विस्तार सर्वसमावेशक होता. यामुळे भाजपचा सामाजिक विस्तार व्यापक आणि बळकट झाला. महाराष्ट्र भाजपच्या विस्ताराचे श्रेय सेनेला देणे म्हणजे, भाजप कार्यकर्त्यांचा अपमान आहे आणि पक्षाने आक्रमकपणे प्रसार केलेल्या विचारांना दुय्यम लेखण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

पक्षाचा सामाजिक पाया विस्तारताना भाजपने तितकीच महत्त्वाची खेळी केली. ही खेळी कदाचित जास्त यशस्वी झाली. महाराष्ट्राचे राजकारण प्रदीर्घ काळ शरद पवार यांच्या तंत्राने चालू होते. भाजपने काॅंग्रेसच्या या मर्मस्थलावर आघात करून पवार पॉवर’ ची ‘credibility’ च समाप्त केली. विशेषत: गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले करून काँग्रेसला चांगलेच घायाळ केले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचार यावर जोरदार टीका करून शरद पवार यांच्या तथाकथित सुसंस्कृत राजकारणाचा पर्दाफाश केला. वास्तविक, शरद पवार यांच्या राजकारणाच्या मर्यादा याच कालावधीत स्पष्ट झाल्या होत्या. भाजपने केलेल्या आक्रमक हल्ल्यामुळे शरद पवार खरे तर कधीही सावरले नाहीत. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला कायमचा फटका बसला आणि त्यांच्या राजकीय अवनतीला प्रारंभ झाला. स्वतंत्र पक्षाची स्थापना करूनसुद्धा पवार यांच्या राजकीय वाटचालीवर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही. याचा परिणाम खरे तर सर्व काॅंग्रेस पक्षाला भोगावा लागला. भाजपचे कौतुक अशासाठी की, नेत्यांनी पवार यांच्यावर राजकीय आक्रमण करण्यासाठी कशाचीही पर्वा केली नाही. तीस वर्षांपूर्वी राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय हाताळताना जिवावर उदार होण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र भाजपने बेदरकारपणे हा लढा चालवून पवार यांचे ‘demystification’ केले आणि पवार यांच्या राष्ट्रीय आणि प्रांतीय राजकारणाला यशस्वी लगाम लावला. राजकीय शत्रूच्या मर्मस्थानावर सतत घाव घालून भाजपने स्वतःची प्रतिमा उंचावली आणि मतदारांना आकर्षित केले. काही अपवाद वगळता, पवार यांच्या राजकारणाला भाजपने कायमची खीळ बसवली आणि नवमतदारांना आकृष्ट केले. आज पवार यांचा महाराष्ट्रावरील राजकारणाचा प्रभाव मर्यादित आहे, याचे श्रेय भाजपच्या रणनितीला जाते. राजकारणासाठी विश्वासार्हता अत्यंत आवश्यक असते. भाजपमुळे पवार यांना गेली तीन दशके credibility crisis’ चा सामना करावा लागत आहे. आज पवार यांच्या राजकारणाची अवस्था केविलवाणी झालेली आहे. त्याला ते स्वत: आणि भाजपची रणनीती जबाबदार आहे. पवार यांना उभ्या हयातीत शंभरीचा आकडा गाठता आला नाही. भाजपने दोनदा शंभरी पार केली, यातच पवारांच्या राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट होतात आणि भाजपची यशस्वी रणनीती दिसून येते.

अथक परिश्रमांना यश
महाराष्ट्रातील भाजपची वाटचाल सर्वार्थाने बिकट होती. भाजपच्या विचारसरणीला प्रखर विरोध, सामाजिक रचना आणि गांधी हत्येसारखे प्रसंग यामुळे पक्षप्रसार अत्यंत अवघड होता. मात्र त्याग, तपस्या आणि बलिदान या त्रिसूत्रीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांना यश येताना दिसत आहे. मात्र पल्ला टप्प्यात असला तरी वाटचाल अजूनही काटेविरहीत नाही.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख