मुंबई : एमआयएमसोबतच्या आघाडीवरून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार केला आहे. “झेब्रा क्रॉसिंगवर चुकून गेलेली गाडी दाखवून आरडाओरड करणारेच लोक आयुष्यभर सिग्नल, हेल्मेट, लेन अशा कोणत्याच नियमांचे पालन करत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
केशव उपाध्ये म्हणाले की, “स्थानिक पातळीवर भाजपाकडून एमआयएमसोबत आघाडी झाली, हे खरे आहे. मात्र ती चूक लक्षात येताच भाजपाने क्षणाचाही विलंब न करता ती आघाडी तोडली आणि दुरुस्ती केली.” यावरून भाजपाची भूमिका स्पष्ट असून, चुकीवर पांघरूण घालण्याऐवजी ती मान्य करून सुधारणा करण्याची परंपरा पक्षाने कायम ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.
याउलट विरोधी पक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना उपाध्ये म्हणाले, “मग एमआयएमसोबत नांदेडमध्ये काँग्रेसची आघाडी झाली तेव्हा काय झाले? अमरावतीत उद्धव ठाकरे गटाची युती झाली, तेव्हा कोणी आवाज उठवला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवकांच्या मतांसाठी एमआयएमची मते घेतली गेली, तसेच खासदारकीसाठी संजय राऊत यांनी एमआयएमच्या मतांचा स्वीकार केला, या घटनांकडे लक्ष वेधत उपाध्ये म्हणाले की, “तेव्हा कोणाला धर्मनिरपेक्षता, नीतीमत्ता किंवा राजकीय तत्वांची आठवण झाली नव्हती.”
“चूक सगळ्यांकडून होते, हा वास्तव स्वीकारला पाहिजे. मात्र फरक इतकाच आहे की भाजपाने चूक लक्षात येताच ती सुधारली, तर इतर पक्षांनी आपल्या चुकीचे समर्थन करत त्याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप त्यांनी केला.
विरोधकांनी दुहेरी भूमिका सोडून आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन करत उपाध्ये म्हणाले की, भाजप पारदर्शक आणि स्पष्ट भूमिकेवर ठाम आहे. “ढोंगगिरी करून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी सत्य स्वीकारणे आणि सुधारणा करणे हेच खरे राजकारण आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.