मुंबई : आगामी निवडणुका आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि विविध मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, “प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर निवडणुकांमुळे कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब झाला. केंद्रीय नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून सक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. संधी मर्यादित असली तरी, ज्यांची नावे यादीत नाहीत अशा कार्यकर्त्यांना इतर माध्यमांतून कामाची संधी दिली जाईल.”
मुख्य प्रवक्ते : पक्षाची बाजू मांडण्यासाठी नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
युवा आणि महिला मोर्चा : कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे, तर चित्रा वाघ यांच्याकडे महिला मोर्चाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी योगेश टिळेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तर पक्षाच्या तिजोरीची किल्ली म्हणजेच कोषाध्यक्षपद मुंबईचे आमदार मिहिर कोटेचा यांना देण्यात आले आहे.
उपाध्यक्ष : सुजय विखे पाटील, गोपीचंद पडळकर, केशव उपाध्ये, अर्चना पाटील चाकूरकर, अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास तडस आणि प्रिया शिंदे यांसारख्या प्रमुख चेहऱ्यांना उपाध्यक्षपदी संधी मिळाली आहे.
सरचिटणीस पदावर निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे आणि योगेश सागर या सहा नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, चिटणीस म्हणून मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी घाक यांना संधी देण्यात आली आहे.