Tuesday, February 10, 2026

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा

Share

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बहुतांश जिल्ह्यांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महायुतीने राज्यातील ग्रामीण भागावर आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या विजयाचा वरचष्मा कायम राखला असून, गेल्या चार महिन्यांतील निकालांनी भाजपची अभेद्य पकड अधोरेखित केली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये मिळवलेल्या मोठ्या यशानंतर, जानेवारीत महानगरपालिका निवडणुकांमध्येही पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले. आता फेब्रुवारीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवून भाजपने राज्यात सत्तेची आणि यशाची एक ‘विजयाची हॅटट्रिक’ पूर्ण केली आहे. या सलग विजयांमुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत मतदारांचा कौल महायुती आणि विशेषतः भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे.”

या विजयाचे मुख्य शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सूत्रधार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या जोडीने राबवलेली रणनीती भाजपच्या यशामागे कळीची ठरली: १. अचूक निवडणूक नियोजन: स्थानिक समीकरणांचा अभ्यास करून दिलेले उमेदवार. २. थेट संवाद: राज्य पातळीवरील नेतृत्वाचा स्थानिक कार्यकर्त्यांशी असलेला थेट ताळमेळ. ३. प्रभावी प्रचार यंत्रणा: महायुतीचे काम तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची या निवडणुकीत मोठी भूमिका राहिली आहे. जमिनीवर वावरणारे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना विचारधारेच्या धाग्याने जोडणारे नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दिल्ली आणि नागपूर या दोन्ही सत्ताकेंद्रांचा विश्वास सार्थ ठरवत, फडणवीसांच्या साथीने त्यांनी विरोधकांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्के दिले आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडीला (मविआ) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये आघाडीतील विसंवाद आणि भाजपच्या आक्रमक प्रचारामुळे मविआला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपने मिळून मविआच्या गडांना खिंडार पाडले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख