Sunday, May 26, 2024

‘बिईंग लॉफुल’: हे वाचायलाच हवे!

Share

दरवर्षी २ एप्रिल या दिवशी बाल पुस्तक दिन साजरा केला जातो. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या दिवसाचा मुख्य उद्देश. Being Lawful या विभावरी बिडवे यांनी उमलत्या वयातील मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाची बाल पुस्तक दिनाच्या निमित्ताने ही ओळख. पालक, शिक्षक आणि मुले अशा सर्वांसाठीच हे उपयुक्त पुस्तक आहे.

Being Lawful हे विभावरी बिडवे ह्यांनी वाढत्या वयातील मुलांसाठी लिहिलेलं इंग्रजी भाषेतील आणि पूर्ण रंगीत कागदावरील एक महत्त्वाचे पुस्तक आहे. पालक, शिक्षक आणि मुले ह्या सर्वांसाठीच ते उपयुक्त आहे. संविधानिक तरतुदी पुस्तकांमधून वाचता येतात. त्यावर भरपूर लेखन होते, त्याविषयी बोलले जाते. पण ह्या सगळ्याकडे कसे बघावे, हे नक्की कशासाठी आहे हा दृष्टिकोन खूप कमी वेळा अशा शैक्षणिक पुस्तकांमधून असतो. आणि तो दृष्टिकोन मिळाला की त्या तरतुदी एकेकट्या राहत नाहीत तर पूर्ण समाजाच्या संरचनेत त्यांची किती मोठी भूमिका आहे ह्याची जाणीव त्याने होते. कोणत्याही कायद्याच्या पुस्तकाने आणि मुलांसाठीच्या पुस्तकाने तर त्याची ही व्यावहारिकता सर्वप्रथम दाखवून द्यायला पाहिजे.

मुलांसाठी कायदा हा केवळ काही नियमबाह्य वागल्यास त्याचे होणारे परिणाम किंवा शिक्षा किंवा नुकसानभरपाई ह्यापुरता मर्यादित नसतो. तर नियमबाह्य वागण्याची वेळच येऊ नये ह्यासाठी मुलांना घडवायचं काम त्याने करायचं असतं. कारण मुलं ही विकसनशील असतात. त्यांच्या चूक बरोबर, चांगले वाईट, नीती अनीती ह्या कल्पना घडवायला पुष्कळ वाव असतो. त्या वेळेस आपला भवताल, आपलं पालक, नातेवाईक आणि मित्रमंडळींचं छोटं वर्तुळ ह्यापलीकडे समाजभान येणं, समाजाप्रति कर्तव्यांची जाणीव जागृत होणं, न्याय कल्पना रुजणं असे उद्देश साहित्याचे असायला हवेत. आणि त्याच भावनेने हे पुस्तक लेखिकेने लिहिले आहे. मुले वाढत असताना ती कसा विचार करतात, आणि त्या वेळेस संविधानिक मूल्यांचा तसेच कायद्यांचा उद्देश अर्थात कर्तव्य आणि न्याय ह्या कल्पना त्यांना सांगणे कसे गरजेचे आहे हे आपल्याला आपली मुले वाढत असताना कायमच वाटत असते.

मुलांच्या कायद्याचा उद्देश मुलांची सुरक्षा साधणे हा आहेच पण त्याबरोबर स्वतःच्या वागणुकीतून इतरांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेलणे हासुद्धा आहे. त्याद्वारे मुलं कायदेपालन करणारे नागरिक होऊ शकतात. कायदे समाजरूपी इमारत भरभक्कमपणे उभी रहावी म्हणून भरीव पाया घालण्याचीमोलाची भूमिकाही बजावत असतात. कायद्यांचा भव्य पट म्हणजे (नागरिकांच्या)जबाबदार्‍या, हक्कांची गुंतागुंत आणि नैतिक वर्तवणूक यांना मार्गदर्शनकरणारा अथवा त्याकरिता मार्ग दाखवणारा तो एक प्रकारचा नकाशा असतो.कायद्यांचे पालन करण्याच्या संदर्भात लहान मुलांच्या पातळीवरून पाहू गेलेअसता त्यांना कायद्याचे ज्ञान असणे, हे केवळ त्यांच्या स्वत:च्यासुरक्षिततेच्या उपयोगासाठी असते असे नसून न्याय आणि जागतिक समानता यातसक्रिय असण्यासाठी ते एक उत्तम साधन आहे.

उत्तम नागरिक घडवायचा आहे
साधारणपणे समता, स्वतंत्र, न्याय ह्या कल्पना संविधानातून मुलांना समजतात. शाळेमध्ये असा स्वतंत्र विषय असतो. भारतीय संविधान ही मूल्ये अभिमानाने वागवते. पण आपण आपली संस्कृती हजारो वर्षांची आहे म्हणतो तेव्हा संविधानपूर्व अशी आपली काही सांस्कृतिक मूल्ये आहेत त्याबद्दल ह्यामध्ये सविस्तर लिहिले आहे. ही मूल्ये आपली महाकाव्ये, सण समारंभ, परस्पर वागण्याचा प्रथा परंपरा, साहित्य ह्यातून रुजली आहेत. आणि त्यामुळेच आपण बंधुभाव, सहिष्णुता ही म्हटले तर आधुनिक मूल्ये पण आपल्या रक्तात आहेत अशी ती आपल्यात रुजली आहेत. ही नाळ आपल्याला त्यांचे पालन करण्याचा उद्देश देते. केवळ कायदा आहे किंवा पालन केले नाही तर अमुक एक शिक्षा आहे म्हणून नाही तर ती हजारो वर्षे शाश्वत विचारधारा आहे हा विचार नक्कीच जास्त बंधने देतो. त्यामुळे संविधानिक आणि सांस्कृतिक मूल्ये ह्यांच्या एकत्रित आचरणानेच एक उत्तम नागरिक घडू शकतो. अखेरीस आपले जग अधिकाधिक चांगले करणे हे एक निरंतर चालणारे काम आहे.

नागरिकांची कर्तव्ये
पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्या संविधानाही उद्देशिका अर्थात प्रिएम्बल आणि त्यातील अनेक सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, एकत्व अशा अनेक मूल्यांवर भाष्य केले आहे. संविधान हे माणसांच्या हक्कांचा संरक्षण करणारा दस्त आहे त्यामुळे मुलांच्या हक्कांविषयी लिहिताना सुरुवात ह्या हक्कांपासून केली आहे. त्याबरोबरच पुढे भारतीय नागरिकांची कर्तव्ये आणि आपली कर्तव्याधीष्टीत समाजरचना ह्यावर भाष्य केले आहे. आपल्या संस्कृतीतील अनेक ‘धर्म’ विषयक रंजक गोष्टी पुस्तकात आहेत. सोबतच United Nations Convention on the Rights of the Child (CRC or UNCRC) ह्याद्वारे घोषित केलेले हक्क, भारतामधील मुलांचे हक्क आणि त्यावरील उपाय पुस्तकात येऊन जातात. मुले त्यांच्या वयाच्या कोवळीकतेमुळे अनेक संकटांमध्ये सापडू शकतात, विविध व्यसने, गुन्हे, लैंगिक वा इतर छळ अशा अनेक प्रसंगांना सामोरे जाण्याचा दुर्दैवी प्रसंग आल्यास भारतातील लागू कायदे आणि हेल्पलाईन नंबर किंवा आवश्यक उपाययोजना पुस्तकात नमूद आहेत. ह्याशिवाय सायबर कायद्यांवर एक प्रकरण आहे, त्यामध्ये सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय ह्यावर विचार केला आहे. कायद्याचे प्रकार, आंतरराष्ट्रीय कायदा, भारतातील कोर्टांची उतरंड ह्या सगळ्याच्या अंतर्भावाने पुस्तक एक समग्र अनुभव देते.

पुस्तकाच्या सातव्या प्रकरणात भारताच्या प्राचीनवाङ्‌मयातील शिबी राजाची गोष्ट, युधिष्ठिर-यक्ष यांच्या महाभारतातील संवादाचे आख्यान, अश्वत्थाम्याचा वध झाल्याचे पसरवून दिलेल्या वृत्ताचीगोष्ट आणि सिंहासन बत्तीशीतली एक गोष्ट, अशा गोष्टी प्रातिनिधिक स्वरूपातनमूद करून तत्काली आमचेकडे, righteousness, duty, truthfulness,Dharma- that is justice, sacrifice, the values that are deeply rooted in our culture यांचे शिक्षण कसे दिले जात होते ते आचरणात कसे आणले जात होते आणिएक प्रकारे आजच्या Being Lawful शी ते फार प्राचीनकालापासून कसे निगडीतआहे, ते बुद्धिनिष्ठरित्या सांगितले आहे. या प्रकरणात कायद्यामधील भेद, जसेभौतिक आणि नैतिक कायदे, नैतिक कायद्यांचे उगमस्थान, नैतिक कायद्यांचामॅनमेड कायद्यांवर असलेला प्रभाव अथवा भौतिक कायद्यांचे मूळ नैतिक कायद्यातकसे आहे यावर प्रकाश टाकणारे आहे.

मुलांनी भर घालण्याची यादी
पुस्तकातले शेवटचे प्रकरण ‘ Being Lawful ‘ म्हणजे ‘ Being in accordance with law ‘ असण्यासाठी, राहण्यासाठी आत्तापर्यंत काय सांगितले त्याचा या प्रकरणात घेतलेला आढावा होय. त्याखेरिज खर्‍याअर्थाने कायदा पाळणारा असण्यासाठी लेखिकेने मार्गदर्शन म्हणून कोणत्या १३गोष्टी माणसाने टाळाव्यात त्या ह्या प्रकरणात नमूद केल्या आहेत. पुस्तकलिखाणाचा हेतू पटवून देण्यासाठी लेखिकेने जागोजागी अध्यात्मिक विचारांची जीगुंफण केली आहे ती तर्कशुद्ध आणि पुस्तकातील विषयाशी अत्यंत सुसंगत अशीआहे. पुस्तकाच्या शेवटच्या ह्या प्रकरणात समारोप करताना त्याबाबत लेखिकेनेजे पुन्हा एकदा सारांशाने मांडले आहे ते अत्यंत मौलिक असे असल्यामुळे तेत्यांच्याच शब्दात देत आहे. लेखिका पृष्ठ क्र. ११६ वर म्हणते- ” In addition, it may be wise to explore ancient Indian concepts like ‘ Dharma ‘ to understand the values they uphold and to seek the guidance of knowledgeable people before engaging in activism”. ‘Being Lawful’ ह्या शीर्षकाचा उत्तम उलगडा पुस्तकाच्या अखेरीस येतो. पूर्ण रंगीत पानांचे आकर्षक मांडणीचे हे पुस्तक मुलांना वाचायला आकर्षक वाटेल असेच आहे. पुस्तकाच्या अखेरीस काय करावे आणि काय करू नये ह्याची एक यादी आहे ज्यात मुलांनीही भर घालायची आहे.

एकूणच हे पुस्तक वाढत्या वयातील, टीन-इजमधील मुलांसाठी एक उत्तम नागरिक होताना महत्त्वाचे मार्गदर्शक ठरू शकते.आपल्या स्व मधून बाहेर पडून ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही जगण्यासाठी सक्षम करणारे असे हे प्रत्येक घरी असायलाच हवे असे पुस्तक आहे. लेखिकेला मागील २३ वर्षांचा वकिली क्षेत्रातील अनुभव आहे आणि कायदा विषयावर त्यांची पुष्कळ लेखन संपदा आहे.

क्षितिजा आगाशे
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या, नाट्य विषयाच्या शिक्षिका आणि बालनाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख