Saturday, July 27, 2024

धुंद: प्रेम की गुलामी? वास्तवावर आधारित लव्ह जिहाद ची कादंबरी

Share

प्रत्येक भाषेतील साहित्यात प्रेमकथांचे स्वतःचे असे वेगळे स्थान असते. मग या कथा कधी काव्यातून, गीतातून, सांगितल्या जातात तर कधी कथा, दीर्घकथा, कादंबरीतून वाचकांच्या भेटीला येतात. अशीच एक कादंबरी नुकतीच वाचली होती ‘धुंद: प्रेम की गुलामी?’ या नावातच ही प्रेमकथा असल्याचे व्यक्त होत होते व त्या कथेला लव्ह जिहाद व्यथेचे वलय असल्याचे जाणवत होते‌.

कथा वाचायला सुरुवात होते व शब्दांच्या प्रवाहासोबत वाचकांचा प्रवास सुरू होतो .या प्रवासात, या कथेतील व्यथा सहजपणे वाचकांच्या मनाला भिडते. मग ती समस्या, त्याचे भयावह रौद्र रूप पाहून, मन सुन्न होते .अशा निराश अवस्थेत सुद्धा कथा नायिकेचे पालक ज्या हिमतीने परिस्थितीला सामोरे जातात, ते वर्णन वाचून मन स्तब्ध होते. एवढेच नाही तर त्यातील कायद्याची गुंतागुंत लक्षात घेत, एक युवक जे धाडस दाखवतो ,जो विचार समाजापुढे मांडतो आणि प्रत्यक्षात तसे जगून दाखवतो, ते वाचून भेदरलेल्या मनाला एक प्रकारचा दिलासा मिळतो‌.

या कथेतील व्यथेचे नाव आहे ‘ लव्ह जिहाद ‘. या पुस्तकाची प्रस्तावना, श्री .भानुप्रसाद बर्गे, निवृत्त ए सी पी, महाराष्ट्र. यांनी लिहिली आहे. ‘ ही प्रस्तावना लिहिण्यापूर्वी पुस्तकाचे वाचन करताना, पोलीस दलात कार्यरत असताना, 34 वर्षे वेळोवेळी या विषयावर आलेल्या अनुभवांचा चित्रपट डोळ्यासमोर सरकू लागला ‘ असं ते म्हणतात. आज जगाच्या नकाशावर बघितले तर इसिस सारख्या संघटना धर्माचा आधार घेऊन दहशतवादी हिंसेचे थैमान घालत आहेत .श्री .बर्गे म्हणतात, कधी मुस्लिम ब्रदरहूड ,तर कधी तालिबान, तर कधी अल कायदा, नाव फक्त बदलते, पण काम मात्र दहशतवाद .

या दहशतवादाचाच एक भाग म्हणजे ‘लव जिहाद’. हिंदू धर्मातील मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करून, त्यांचे धर्मांतर करण्यात येते. खरे तर एक खूप मोठी यंत्रणा अशा प्रकारच्या धर्मांतरासाठी काम करत असते व त्या पार्श्वभूमीवर श्री .नरेंद्र यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून, कुठेतरी परिवर्तन होणे मला आवश्यक वाटते, असेही ते म्हणतात.

कादंबरी वाचून संपते आणि पुढील पान उलटले की आपल्या वाचनात येतात ते श्री. सुब्रमण्यम स्वामी यांचे विचार. ऑक्टोबर 2020 मध्ये या पुस्तकाचे विमोचन त्यांच्या हस्ते झाले होते, व दुसरी आवृत्ती नोव्हेंबर 2021 मध्ये प्रकाशित झाली होती. ते म्हणतात, या समस्येचे अनेक पैलू आहेत. त्यांचा विचार होणे आवश्यक आहे .एक खूप मोठी संघटना, यंत्रणा अशा प्रकारच्या धर्मांतरासाठी कार्यरत आहे. त्यांचा हेतू, उद्देश राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. भारतात 82 टक्के हिंदू आहेत. कुटुंब नियोजनाचा विचार फक्त हिंदू करत राहतील तर हिंदूंची संख्या कमी होऊन मुस्लिमांची संख्या वाढत राहील ,म्हणून समान नागरिक कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड ला अशा संघटनांचा विरोध असतो .दुर्दैवाने राजकारणी लोक या महत्त्वाच्या गोष्टीकडे दर्लक्ष करत आहेत‌. याबाबत खबरदारी घेत, भविष्यात येणाऱ्या गंभीर समस्यांचे परिणाम समजून घेत, याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. हे पुस्तक लीहून राष्ट्रीय सुरक्षेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे, याबद्दल श्री .सुब्रमण्यम स्वामी यांनी या पुस्तकाचे लेखक श्री .नरेंद्र यांचे अभिनंदन केले.

आता मराठी वाचकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो तो म्हणजे या पुस्तकाचे लेखक आहेत, नरेंद्र .त्यांनी आडनाव लिहिले नाहीये‌, कुठले टोपण नाव घेतले नाहीये ,किंवा नरेन्द्रकुमार अथवा पी. नरेंद्र असे काही बदलले नाहीये. याबाबत लेखक ,श्री. नरेंद्र पेंडसे यांनी सांगितले की त्यांच्या प्रकाशकांचे असे म्हणणे होते की आडनाव हे जात वाचक असते. भारतीय समाज, विशेषतः हिंदू समाज अनेक जातींमध्ये विखुरला गेला आहे. भारतीयांच्या मनातून जात नाही ती ‘जात’. आपल्या समाजाने प्रत्येक जातीला विचारांच्या एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करून टाकले आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून एकमेकांचे अस्तित्वच जणू अनेकांना मान्य नाहीये व या पुस्तकातील विचार राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने, हिंदूंच्या ऐक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत .त्याकडे वाचकांचे दुर्लक्ष होऊ नये, लेखकाच्या आधी वाचकांच्या भेटीला त्यातील विचारांनी जावं आणि म्हणून लेखकाचे नाव नरेंद्र.

ही कादंबरी लिहिण्यापूर्वी लेखकाने या विषयाबद्दल बरेच वाचन करून, अभ्यास करून ,हा विषय बारकाईने समजून घेतल्याचे जाणवते.या समस्येचे उत्तर शोधताना, त्यांनी कादंबरीची सुरुवात करण्याअगोदर , भारताच्या इतिहासातील अशा व्यक्तींचा थोडक्यात परिचय दिला आहे ,ज्यांनी आपल्या पराक्रमाने भारताचे आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. तसेच कादंबरीच्या मलपृष्ठावर परत हा विषय थोडक्यात मांडताना ,रिटा च्या रूपातील आधुनिक स्त्री, सौदामिनी म्हणून स्वतःची सुटका तर करुन घेतेच, त्याबरोबर इतर मुलींना वाचविण्यासाठी व्यवस्था देखील निर्माण करू शकते ,हे आवर्जून नमूद केले आहे.
असा एखादा गंभीर विषय लक्षात आल्यावर सर्वसामान्य व्यक्ती असा विचार करतात, की बाप रे,हे खूपच मोठे संकट आहे, याबाबत जनजागृती व्हायलाच हवी. कुणीतरी याबाबत पुढाकार घेऊन काम करायला हवे. पण लेखक, श्री .नरेंद्र पेंडसे मात्र या ‘कुणीतरी’ ची वाट न पाहता स्वतः लेखणी हातात घेतात, याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार व अभिनंदन.

मोहिनी पाटणकर

अन्य लेख

संबंधित लेख