Saturday, September 7, 2024

सानंद सकुशल: पत्रलेखनातून उमगलेले सदाशिवराव देवधर

Share

‘सानंद सकुशल ‘हे शब्द वाचले आणि मन भूतकाळात फिरायला गेले .बालपणात शिरून मराठीच्या व्याकरणाच्या तासाला जाऊन बसले. आता नियम पाठ करणे सुरू झालं, पत्र लिहिताना उजव्या हाताला वरच्या कोपऱ्यामध्ये गावाचे नाव आणि तारीख लिहायची, त्या खालच्या ओळीत डावीकडे ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे त्याच्या स्थानाप्रमाणे किंवा नात्याप्रमाणे ती. श्री. चि. कु असे संबोधन लिहीत त्या व्यक्तीचे नाव लिहायचे, मग पुढच्या ओळीत साष्टांग नमस्कार विनंती विशेष किंवा सा. न. वि. वि. किंवा स. नमस्कार ,असे अभिवादन करून पुढील मजकूर लिहायचा, मग खाली पत्राच्या शेवटी मोठ्यांना नमस्कार छोट्यांना आशीर्वाद वगैरे लिहून उजव्या हाताला खाली स्वतःचे नाव लिहायचे, नावा आधी आपला नम्र किंवा असे जे योग्य असेल ते शब्द लिहून त्याखाली स्वतःचे नाव लिहायचे.अशा रीतीने पत्र लेखनाचे प्रशिक्षण मिळायचे. बाल मनाला व्याकरणाचे एवढे नियम कशाला असा प्रश्न पडायचा, आज तो प्रश्न आठवला आणि त्याच्यात भरून राहिलेला अर्थ मनाला भावला.

तारीख, स्थळ लिहिणे किती आवश्यक आहे, ते आता इतिहासाची पाने चाळताना त्याचे महत्त्व कळते ,तसेच वडिलधाऱ्यांना केलेले संबोधन , एकूण मजकूर, त्या वेळच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. तसेच तो मजकूर ,त्या वेळच्या घटना, त्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आणि त्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्त करतो.

मा. श्री. स. गौ. देवधर यांचे पत्रलेखनाचे संकलन असलेले पुस्तक ,’सानंद सकुशल ‘ वाचले आणि अनेक वर्ष
पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत असणारी ही व्यक्ती कुटुंबापासून दूर असूनही मनाने कुटुंबाच्या किती जवळ आहे हे जाणवले. स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत जे नातं आहे, तोच जिव्हाळा, तीच आपुलकी सर्व कार्यकर्त्यांसमवेत, मित्र मंडळीं समवेत असल्याचे जाणवते. सातत्याने पत्र लिहून सर्वांशी संपर्क साधणे ही गोष्ट खरंचच खूप विशेष आहे. त्यांच्या पत्रलेखनातून ते फक्त कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांच्या संपर्कात राहतात असे नाही, तर या कार्यात सहभागी होताना समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींशी जोडलेले राहतात. सर्व साधुसंत आणि शंकराचार्य, तसेच सामाजिक संस्था, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, राजकारणात सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती अगदी नरेंद्र मोदी ते नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक लोकांशी संपर्कात असल्याचे, चांगले नाते असल्याचे, जाणवते.

अनेक वेळा हक्काच्या नात्याने भोवताली असलेल्या व्यक्तींच्या चुकाही दाखवतात, व योग्य मार्गदर्शनही करतात. हे करताना कधी कधी परत परत उपदेशपर काही लिहिल्यास त्यांना ‘ बोर ‘न होता सबंध पत्र वाचा असा आग्रह पण करतात.तर कधी आपल्या हातून कोणी दुखावले गेले आहे असे वाटल्यास दिलगिरी पण व्यक्त करतात.

श्री . देवधर दादांबद्दल लीहिताना त्यांचे सहकारी, मित्र, विद्यार्थी मनापासून आदराने आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात.

सबंध पुस्तक वाचताना कुठेही स्वतःच्या कार्याचे मात्र फारसे उल्लेख वाचायला मिळत नाहीत. त्यांच्या कार्याबद्दल बाकी सर्व लोक खूप आदराने बोलतात, लिहितात, पण आता मला त्यांनी जे प्रत्यक्ष कार्य केले आहे, त्याबाबत जाणून घ्यायची इच्छा आहे.

विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, आणि एकूण संघ परिवाराच्या कामात त्यांचे योगदान
निश्चितच खूप मोलाचे आहे. यातील काही महत्त्वाचे पैलू व्यक्त करताना, श्री.अरुण करमरकर लिहीतात, त्यांनी परिषदेच्या संघटनेतील पूर्ण वेळ कार्यकर्ता ही रचना आणि दुसरी म्हणजे महिलांचा, विद्यार्थिनींचा त्या कामातील सहभाग,या महत्त्वाच्या गोष्टी या कार्यपद्धतीत रुजविल्या.

लिहिण्यासारखे अजून बरेच काही आहे, पण थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री. गिरीश प्रभुणे याला पत्र प्रांगण म्हणतात, मराठी साहित्याच्या प्रांगणात या पत्रसंग्रहाने मोलाची भर घातली आहे ,असे ते म्हणतात,ते मनापासून पटते.

आणि या पत्र प्रपंचा मागची भावना ,आपल्या भोवती सर्वजण ‘सानंद सकुशल ‘असावेत , ही सहज पणे वाचकांच्या मनापर्यंत सहज पोहोचते.
ती. देवधर दादांना सादर नमस्कार.

मोहिनी पाटणकर

अन्य लेख

संबंधित लेख