Tuesday, December 3, 2024

नव्या भारताचे परराष्ट्र धोरण: एस. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘विश्वमित्र भारत

Share

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणात कसा बदल झाला हे लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘व्हाय भारत मॅटर्स’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध लेखिका विभावरी बिडवे यांनी केला आहे. या अनुवादाचे प्रकाशन श्री. जयशंकर यांच्या हस्ते पुणे येथे नुकतेच झाले. त्याचा परिचय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय परराष्ट्र धोरणाकडे दुर्लक्ष करणे, त्याला बगल देणे मोठमोठ्या जागतिक नेत्यांनासुद्धा परवडणारे नाही. देश-विदेशातील विविध मंचांवरून भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर अनेक सार्वजनिक चर्चा झडत असतात. पण बारकाईने त्यांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की भूतकाळात अमलात आणल्या गेलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय संबंधविषयक धोरणांच्या चौकटीतूनच नव्या धोरणांकडे पाहायचा शिरस्ता अजूनही अनेक प्रसार माध्यमांकडून होत आहे. गेल्या १० वर्षांत निर्माण केलेले नव्या स्वरुपातले भारतीय परराष्ट्र धोरण आणि त्यावरील विविध माध्यमे करत असलेले त्याचे विवेचन यांच्यातील अंतर किंवा फरक कमी करण्यास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे नवीन पुस्तक मदत करेल.

एखाद्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप घडवणारा, त्याला दिशा देणारा, ती धोरणे प्रत्यक्षात राबविणारा परराष्ट्रमंत्री स्वतःच आपल्या कार्यपद्धतीवर पुस्तक लिहितो असे सहसा घडत नाही. त्यामुळेच हे पुस्तक एक विशेष उपलब्धी ठरते. पुस्तक लिहिण्याचे कारण मांडताना जयशंकर असा युक्तिवाद करतात की जगभरातील बुद्धिजीवी समुदाय आणि राजकीय वर्गाने मोदीकाळात भारताच्या परराष्ट्र धोरणात घडलेले आमूलाग्र बदल नीटपणे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्यामुळे, विद्यमान परराष्ट्र मंत्र्यांना, स्वतः ही जबाबदारी घ्यावी लागली. अत्यंत वेगाने घडणाऱ्या या असामान्य बदलांची ओळख जगाला करून देण्याची म्हणजेच भारत आणि भारताची धोरणे यांविषयी असणारे पूर्वग्रह निपटून काढून योग्य विचार आणि सत्य जगाला समजावण्याची गरज त्यांना वाटली. लोकांचा दृष्टिकोन घडवण्याचे काम हे पुस्तक करत आहे.

पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेबरोबर गेली साडेसहा दशके चालत आलेले घिसेपिटे भारतीय परराष्ट्र धोरण हे ‘भारताच्या भूतकाळातील राजनैतिक अडचणींच्या स्रोतांचे दुर्मीळ प्रतिबिंब आहे.’ पुस्तकात हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. यापैकी बऱ्याच समस्यांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समुदायात अनेक दशके दबक्या आवाजात चर्चा झडत आहेत. परंतु आता जयशंकर यांनी स्वतःच पुढाकार घेऊन, १९५०च्या पुढील ६ दशकांत भारताने केलेल्या निवडींचे, हेतू आणि अनपेक्षित परिणामांचे कठोर मूल्यांकन या पुस्तकाद्वारे करून या दबल्या आवाजांना स्वर मिळवून दिला आहे.

वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मिनू मसानी यांच्यासारखी द्रष्टी समकालीन मंडळी १९५०च्या दशकात नेहरूंची धोरणे, निर्णय व निवडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होती. त्यालाच प्रमाण धरून जयशंकरही, जवाहरलाल नेहरूंच्या पाकिस्तान आणि चीनबाबतीतील “भोळसटपणा” आणि पाश्चिमात्य देशांसंदर्भातील “वैचारिक मिंधेपणा” यावर पुस्तकात टीका करतात. मात्र ‘घटना घडून गेल्या आता टीका करायला मोकळे’ अशा स्वरूपाची ही टीका नाही. तर प्रतिष्ठित, अभ्यासू लोकांचा योग्य सल्ला डावलून मुद्दाम घेतलेल्या चुकीच्या निर्णयांवर जयशंकर बोट ठेवत आहेत.

स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणातील चुकांच्या या मूल्यमापनामुळे बरेच वादंग माजणे स्वाभाविक आहे. परंतु यामुळे भारतीय परराष्ट्र धोरणाचा दीर्घकालीन आणि प्रस्थापित इतिहास लिखीत स्वरुपात तयार झाला आहे. भूतकाळात केलेली प्रत्येक गोष्ट त्या वेळकाळ परिस्थितीसाठी योग्य निवड होती, या भ्रमातून बाहेर पडायला भारतीयांना या लेखनामुळे खूप मदत होणार आहे.

नेहरूंनी नाकारलेल्या किंवा टाळलेल्या रस्त्यांवरूनच आज भारत कसा मार्गक्रमण करतो आहे याचे जयशंकर यांनी केलेले वर्णन पाकिस्तान, चीन आणि अमेरिकन परराष्ट्र खात्यांना दिल्लीच्या सध्याच्या दृष्टिकोनाबद्दल नीटपणे सजग करते. काश्मीरविषयीची संदिग्धता संपवणे, चीन, अमेरिका आणि पश्चिमी देशांबद्दल कठोर वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारून व्यावहारिक सहभागाचा पाठपुरावा करणे या वर्तनामागाची मूळ भूमिका स्पष्ट केली आहे.

भारतीय परराष्ट्र धोरणातील घोर चुका, काळा इतिहास जगापासून, प्रामुख्याने भारतीयांपासून पद्धतशीरपणे लपविला गेला. परंतु आता भारतीय परराष्ट्र धोरण विषयात लुडबुड करणाऱ्यांच्या टोळीचे डोळे या पुस्तकामुळे खाडकन उघडले आहेत. कारण आजवर जे काही लपवण्याचा प्रयत्न केला गेला तेच जयशंकर अधोरेखित करून आपल्या लेखनातून, भाषण-संभाषणातून, नीती द्वारे उच्च स्वरात जगाला सांगत आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणातील अनेक आधुनिक, विकासवर्ती बदल आणि नेहरूवादी जागतिक दृष्टिकोनातून निर्णायक सुटका हे मोदीनीतीचे प्रमुख सूत्र आहे.

गेल्या दशकातील भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या वर्तनावर इतिहासकार त्यांचे अंतिम म्हणणे मांडतील, तर जयशंकर यांचा त्याच्या उत्क्रांतीचा पहिला हात हा मोदी वर्षांतील भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रतिबिंबित करण्याचा प्रारंभबिंदू ठरेल.

भारताच्या परराष्ट्र धोरणाची निश्चित पुनर्रचना १९९१ मध्ये सुरू झाली. भारतातील जुनी आर्थिक व्यवस्था बदलून, आर्थिक जागतिकीकरणाचा उदय झाला. बाकी जागतिक महत्त्वाच्या घटना जसे की सोव्हिएत युनियनचे पतन आणि शीतयुद्धाच्या समाप्तीमुळे भारतासाठी नवीन धोरणात्मक गरजा निर्माण झाल्या. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या सामर्थ्यामध्ये सातत्याने वाढ झालेली दिसत असूनही दिल्लीला जुनी विचारसरणी त्यागणे शक्य होत नव्हते.

आधीच्या सरकारांनी गृहीत धरलेली गृहितके आणि अडचणी, संकटे, शंका यामुळे तत्कालीन शासनाने जगाच्या बरोबरीने भारताला वाव मिळू दिला नाही. त्यांच्या संकुचित, पूर्वग्रहदूषित धोरणांमुळे, होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदलांचे सुपरिणाम मिळवण्यापासून, त्यांचा पुरेपूर लाभ घेण्यापासून भारतीयांना रोखले गेले. परंतु गेल्या दशकात जयशंकर, सुषमा स्वराज आणि पर्यायाने मोदींनी जाणीवपूर्वक आणि धाडसी परराष्ट्र धोरणाचा अवलंब करत, जगाशी व्यवहार करताना भारताचा हा “ऐतिहासिक संकोच” संपविण्यावर बराच भर दिला आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचा उदय आणि प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याचे नवे उदात्तीकरण याविषयीही समजावून देणारे हे पुस्तक वाचणे मोठा बौद्धिक आनंद देणारे आहे.

जयशंकर यांचे परराष्ट्र खाते मोदींच्या नेतृत्वाखालील भारताच्या नवीन परराष्ट्र धोरणाच्या “काय असावे” आणि “कसे राबवावे”च्या पुढे जाऊन भारताच्या परिवर्तनाच्या “का” चाही शोध अनेक अंगांनी घेत आहे. मोदींनी आणलेला अतिशय वेगळा जागतिक दृष्टिकोन, आत्मसन्मानाची नवीन भावना आणि “भारत प्रथम” ठेवणारे परराष्ट्र धोरण पुढे नेण्याचा निर्धार हे केवळ पोकळ शब्द नाहीत तर प्रत्यक्ष कृती आहे याची कित्येक उदाहरणे मोदी व जयशंकर घालून देत आहेत. परराष्ट्र धोरणातील परिवर्तनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारताच्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजवणे, तिला नवसंजीवनी मिळवून देणे आणि वस्तविकतेच्या हिऱ्याला परराष्ट्र धोरणात चमक देण्यासाठी एक नवीन बौद्धिक कोंदण तयार करणे हेच तर आहे.

२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द इंडिया वे’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकात जयशंकर यांनी महाभारताचे दाखले देऊन आपले मुद्दे मांडले तर या नव्या दुसऱ्या पुस्तकात ते रामायणाची कास धरतात. ‘विश्वमित्र भारत’ या पुस्तकाचे शीर्षकच मोदी सरकारची “निःशंकीकरण” आणि “स्वदेशीकरण” या वादग्रस्त वैचारिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. जयशंकर यांच्या निष्कर्षाशी सर्वजण सहमत असतीलच असे नाही की “भारत महत्त्वाचा आहे कारण तो भारत आहे. परंतु जयशंकर यांच्या पुस्तकातील त्या प्रस्तावावर आणि इतर अनेक अपारंपरिक विषयांवर चर्चा केल्याने भारतीय परराष्ट्र धोरणाच्या चर्चेत एकमत आणि एकमताच्या मोहामुळे दीर्घकाळ गुदमरून गेलेल्या चर्चेला नवसंजीवनी मिळायला हवी.

मूळ इंग्रजीत परिचय – अमेय कुलकर्णी
मराठी अनुवाद – अमिता आपटे
(अनुवादक सामाजिक कार्यकर्त्या आणि आंतरराष्ट्रीय तसेच ईशान्य भारतातील प्रश्नांच्या अभ्यासक आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख