Friday, December 19, 2025

पुस्तक परिचय: Leadership: Six Studies in World Strategy

Share

नुकतचं डॉ. हेन्री किसिंजर यांचे Leadership: Six Studies in World Strategy हे पुस्तक वाचून संपवले. यात सहा नेत्यांचा अभ्यास केला आहे. या नेत्यांनी जागतिक रंगमंचावर आपला ठसा उमटवला. या सहाही नेतृत्वात काही विशेष अशी खासियत होती. किसिंजर यांनी त्या प्रकरणांच्या शीर्षकात ती लिहीली आहे.

Konrad Adenauer: the Strategy of Humility – अडेन्यूअर यांनी युद्धोत्तर पश्चिम जर्मनी उभारला. यात पश्चिम जर्मनीचे पश्चिम युरोपशी एकत्रीकरण करणे व पश्चिम जर्मनीचे कम्युनिस्टांपासून संरक्षण करणे ही कामगिरी त्यांनी केली. यात अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांच्या प्रभावातून पश्चिम जर्मनीला बाहेर काढून एक स्वतंत्र देश म्हणून तीला उभा करणे ही कामगिरी त्यांनी केली.

Charles de Gaulle: The Strategy of Will

अडेन्यूअर यांना पश्चिम जर्मनीचे पश्चिम युरोपशी एकत्रीकरण हवे होते तर गॉलना फ्रान्सची स्वतंत्र अस्मिता जिवीत करायची होती. युद्धामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था, अल्जेरिया ही वसाहत टिकविणे व तीला स्वातंत्र्य देणे, व्हिएतनाम युध्दात मार खाऊन त्याचे उत्तरदायित्व अमेरिकेला सोपविणे व या अवघड कामांत, स्वतःचा जीव धोक्यात घालून (वाचा: फ्रेडरिक फोरसिथचे द डे ऑफ जॅकल) फ्रान्सला अमेरिका व इंग्लंडच्या बरोबरीचे स्थान मिळवून देण्याची कणखर इच्छा द गॉल यांच्यात दिसून येते.

Richard Nixon: the Strategy of Equilibrium

डॉ किसिंजर हे निक्सन प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व नंतर निक्सन व फोर्ड प्रशासनात the secretary of state (परराष्ट्र व्यवहार पाहणारे) होते. हॉर्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेले डॉ किसींजर हे निक्सन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर प्रथमच त्यांना भेटले व ते पण निक्सन यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर काम कराल का? हे विचारण्यासाठी त्यांना भेटीला निमंत्रित केले म्हणून. निक्सन यांच्याशी डॉ किसींजर यांचा या ग्रंथातील इतर नेत्यांपेक्षा जास्त व जवळून संपर्क झाला. सोविएत रशियाच्या वाढत्या प्रभावामुळे जगाचा बदललेला समतोल नव्याने आखण्याचे काम निक्सन यांनी केले. यात सोविएत रशियासमावेत शस्त्र नियंत्रण करार, व्हिएतनाम युध्दातून माघार घेणे (प्रत्यक्ष युद्ध संपेपर्यंत निक्सननी राजीनामा दिला होता) आणि सोविएत प्रभाव रोखण्यासाठी चीनशी संबंध प्रस्थापित करणे (यात डॉ किसींजर यांची कराचीहून बिजिंगला दिलेली गुप्त भेट येते) अरब इस्राएल यांचे १९७३ चे योम किप्पूरचे युद्ध या बाबी येतात. सोविएत युनियनला आवर घालणे व चीनला जागतिक मंचावर आणणे यामुळे निक्सन यांनी नव्याने जागतिक समतोल साधला.

Anwar Sadat: the Strategy of Transcendence

इस्राइलला हरविणारा अरब जन्माला यायचा आहे व तो जर चुकून जन्मला आला असेल तर तो निश्चितच अन्वर सदात होय. अरब जगताला कधीही मान्य नसेल अशी गोष्ट त्याने केली ती म्हणजे इस्राइलशी समझोता.

नासरने सोविएत रशियाच्या मदतीवर अवलंबून राहून इस्राएलशी १९६७ चे सहा दिवसांचे युद्ध लढले व त्यात इजिप्तचा पराभव व मानहानी झाली. यात निकृष्ट दर्जाची शस्त्रे देऊन रशियाने नासरला फसविले. याचा परिणाम होऊन नासरचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

सदातने रशियावर अवलंबून न राहता अमेरिकेला इजिप्त व इस्राएल संबंधात ओढून शांतता प्रस्थापित करण्याचे ठरविले. अमेरिका दाद देत नाही म्हणून सोविएत रशियाकडून, त्यांच्या दबावाला न जुमानता उत्कृष्ट शस्त्रे मिळवून पूर्ण तयारीनिशी इस्राएलवर हल्ला केला. ही तयारी करताना युध्दापूर्वी इजिप्तमध्ये असलेल्या वीस हजार रशियन सल्लागाराना अचानक हाकलून दिले. दोन वेळा युध्दाचा बागुलबुवा उभारुन जनरल दायानसारख्या कसलेल्या सेनापतीला हुलकावणी दिली. तेव्हा प्रत्यक्ष हल्ला झाला तेव्हा इस्राएल पूर्णपणे गाफील होते.

‌‌सदातच्या अपेक्षेप्रमाणे पुढे घडले. अमेरिका इजिप्त इस्राएल संबंधात ओढली गेली व Camp David Agreement झाले. याची किंमत मात्र सदातला चुकवावी लागली. त्याची हत्या झाली (सदातवर यू ट्यूबवर सुंदर फिल्म आहे).

Lee Kuan Yew: the Strategy of Excellence

१९६५ मध्ये मलेशियाने स्वतःपासून वांशिक मुद्द्यावर अलग केलेल्या एका ग्रामीण भागाचे एक सर्वोत्कृष्ट नगर राष्ट्र बनविण्याचे सर्व श्रेय लि क्युआन यू या धोरणी नेतृत्वाला आहे. गेली अनेक वर्षे Good Governance Index मध्ये सिंगापूर प्रथम क्रमांकावर आहे.

सुएझ कालव्याच्या पूर्वेला स्वतःच्या हिंमतीवर उभा असलेला एकमेव कॅपिटलिस्टीक देश सिंगापूर होता. (लिंचे from Third World to First या पुस्तकात याचा तपशील आहे). प्रत्येक बाबतीत सर्वोत्कृष्टता पाहिजे हा आग्रह धरणारे व तो सत्यात साकारणारे ली यांची धोरणे व ती राबविताना त्यांचे नेतृत्व याचे वर्णन डॉ किसींजर यांनी केले आहे.

Margaret Thatcher: The Strategy of Conviction

An iron lady म्हणून परिचित असलेल्या मार्गारेट थॅचर यांचा ११ वर्षांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ Thatcherism म्हणून ओळखला जातो. प्रचंड ढासळलेल्या अर्थव्यवस्थेत थॅचर हुजूर पक्षाच्या नेत्या बनून पंतप्रधान झाल्या. महागाई १० टक्क्यांवर तर बेरोजगारी १८ टक्क्यांपर्यंत पोहचली होती. कोळसा खाण कामगारांनी संप केला पण थॅचर यांनी तो मोडून काढला. दृढपणे आर्थिक सुधारणा केल्या. यात खर्चावर कपात करण्यासाठी फॉकलंड बेटावरील नाविक शक्ती कमी केल्याचा अर्जेंटिनाने फायदा घेऊन ती बेटे ताब्यात घेतली. तेव्हा अमेरिकेसारख्या मित्र देशांची साथ नसताना सात हजार मैलांवरुन थॅचर यांनी युध्द केले व फॉकलंड परत मिळविले. उत्तर आर्यलंडच्या प्रश्नावर त्यांनी खंबीर भूमिका घेतली. आयरिश रिपब्लिकन आर्मी या दहशतवादी संघटनेचे लोक खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात होते (लॉर्ड माऊंटबॅटन यांची हत्या याच संघटटनेने केली). ते राजकीय कैद्यांचा दर्जा मिळावा म्हणून आमरण उपोषणाला बसले. यात उत्तर आर्यलंडमधून दहशतवादी संघटनेचा राजकीय पक्ष असलेल्या सीन फीन यांचा एक खासदार तुरुंगातून निवडून आला होता. त्याचा या उपोषणात मृत्यू झाला पण खंबीर थॅचर डगमगल्या नाहीत. त्यांनी राजकीय पातळीवर बोलणी करुन व दहशतवादाला भीक न घालता शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोलणी चालू ठेवली.

गोर्बाचेव्ह सत्तेवर येण्यापूर्वी त्यांची शैली व विचार थॅचर यांनी ओळखून त्यांच्याशी संपर्क वाढविला. राष्ट्राध्यक्ष रेगन यांचेवर थॅचर यांचा चांगला प्रभाव होता. त्यामुळे ब्रिटन व अमेरिका यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले. युरोपियन युनियनमध्ये ब्रिटनने सामिल होण्याबाबत त्या अत्यंत नकारात्मक होत्या व त्याचमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

आपल्या अकरा वर्षांच्या काळात त्यांनी लागोपाठ तीन निवडणूक जिंकल्या व चौथ्या निवडणुकीतही विजयाची व्यवस्था करुन दिली. त्यांचा दृढनिश्चयाचे उत्कृष्ट वर्णन किसींजर यांनी केले आहे.

या सर्व नेत्यांशी डॉ किसींजर यांचे चांगले वैयक्तिक संबंध होते. यातील काही जागतिक घटनांत डॉ किसींजर सक्रिय होते. ते सत्तेबाहेर असुनही अडेन्युअर व द गॉल वगळता सर्व नेते त्यांचा वेळप्रसंगी सल्ला घेत असत.

अत्यंत ओघावत्या शैलीत व अभ्यासपूर्ण असे हे पुस्तक आहे. डॉ किसिंजर हे राजकीय मुत्सद्दी म्हणून परिचित असले तरी ते मुळचे स्कॉलर असल्याने त्यांची स्कॉलरशिप या पुस्तकात कायम दिसून येते.

        -समीर कुर्तकोटी

अन्य लेख

संबंधित लेख