महायुतीला बहुमत मिळालेलं असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकालयाल काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील उमेदवार महेश शिंदे आणि पाटणमधील उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार सभा घेतल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले की काँग्रेसबरोबर केलेला घरोबा बाळसाहेबांनाही मान्य नव्हता, म्हणून आम्ही उठाव केला आणि धनुष्यबाण वाचवला आणि शिवसेना वाढवली. आज राज्यभरातून कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोकसभेत उबाठाच्या समोर १३ जागा लढलो त्यातील ७ जागा आपण जिंकलो. त्यामुळे शिवसेना कोणाची हे जनतेने सिद्ध केले. आम्ही विचारांची प्रतारणा करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पाटणमध्ये तिरंगी लढत नाही तर एकच रंग दिसतोय तो म्हणजे भगवा रंग. कोणीही येवो पाटणचा गड शंभूराज देसाईच सर करणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई माझ्या दोन पावलं पुढे होते. त्यामुळेच त्यांना दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिलं, असे त्यांनी सांगितले.
कोरेगावमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीने मेट्रो बंद पाडली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले. आम्ही सर्व प्रकल्प सुरु केले आणि पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. अडीच वर्षात मविआने केवळ ४ सुप्रमा दिल्या होत्या, महायुतीने दोन वर्षात सिंचनाच्या १२४ सुप्रमा दिल्या आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींचे प्रेम पाहून विरोधकांच्या पोटात दुखायला लागले. सुरुवातीला त्यांनी या योजनेबाबत अपप्रचार केला मात्र आम्ही बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरले.आचारसंहितेपूर्वी नोव्हेंबरचे पैसे दिले, असे ते म्हणाले. २३ नोव्हेंबरला निकाल लागला की डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात टाकणार. लाडक्या बहिणींना लखपती झालेले बघायचे आहे, असे ते म्हणाले. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते तर आमचे सरकार हप्ते भरणारे आहोत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
महेश शिंदे हा चौकार षटकार मारुन सेंच्युरी मारणारा भरवशाचा बॅट्समन आहे. जेवढ्या सभा माझ्या जन्मभूमीत होतात त्याचा मला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड काळात परवानगीशिवाय स्वत:च्या जीवावर कोविड सेंटर सुरु करणारा महेश शिंदे एकमेव आमदार आहे. महेश शिंदे यांना कार्यसम्राट नाही तर जलनायक आहेत, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
कोविड काळात रात्रंदिवस काम केले. पीपीई कीट घालून रुग्णालयात गेलो. रात्री ठाण्यातील एका कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची गरज होती, मध्यरात्री लिंडे कंपनीत भरत असलेला ऑक्सिजन नेला ४०० रुग्णांचे प्राण वाचवले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितले. या दरम्यान दोन वेळा मलाही कोविड झाला. पण तुमच्या आशिर्वादाने मी वाचलो, असे ते म्हणाले. एकीकडे स्वत:चे पैसे खर्च करुन कोविड सेंटर उभारणारा आमदार आणि दुसरीकडे खिचडी, बॉडीबॅग, कोविड सेंटरमध्ये पैसे खाणारे तुम्ही आमचा काय हिशेब करणार अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उबाठावर केली. जनतेच्या दरबारात महाविकास आघाडीचे अडीच वर्षांचे काम आणि महायुतीचे दोन वर्षांचे काम होऊन जाऊ दे दूध का दूध आणि पानी का पानी, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना दिले. आम्ही घरात बसत नाही तर लोकांच्या घरी जातोय शेतकऱ्यांच्या बांधावर जातोय आणि काम करतोय, हा आमच्यात आणि विरोधकांमध्ये फरक असल्याचे ते म्हणाले. संविधान बदलणार नाही तसेच लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.