Friday, December 19, 2025

पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य

Share

पाथर्डी : पाथर्डीच्या विकासासाठी ‘कमळाची’ ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अभय आव्हाड आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत जनसमुदायाला संबोधित केले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असलेल्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाथर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार ठामपणे पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, वाढत्या शहरीकरणामुळे पाथर्डी आणि शेवगाव शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र आमदार मोनिका राजळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून दोन्ही शहरांसाठी पिण्याच्या पाण्याची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करून घेतली असून, या योजनेचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. यासोबतच ₹२२० कोटींची भुयारी गटार योजना देखील सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर जल’ या संकल्पनेनुसार पाथर्डीतील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनांमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाथर्डी येथील नवीन शासकीय न्यायालयाच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून अनेक शासकीय इमारतींची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्याचे सांगितले. शहराच्या विकासासाठी त्यांच्या ज्या-ज्या संकल्पना असतील, त्यांना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाथर्डीच्या जनतेला आवाहन करताना, “२० तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढील पाच वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ,” असे ठामपणे सांगितले. या जाहीर सभेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजप व महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख