महाराष्ट्र : भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेते पाकिस्तानचीच भाषा बोलतात आणि त्यांना पाकिस्तानच्या मदतीचीच आशा आहे,” असा घणाघात केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची नावे घेत ही टीका केली.
केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, मणिशंकर अय्यर, राहुल गांधी यांच्यापासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत पाकिस्तानला दिलासा देणारी विधाने करणे, हीच आता काँग्रेसची ओळख बनली आहे. याचे ताजे आणि धक्कादायक उदाहरण म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे “भारत #OperationSindoor पहिल्या दिवशी हरला” हे वक्तव्य. विशेष म्हणजे हे विधान पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
उपाध्ये यांनी स्पष्ट केले की, वास्तव वेगळे आहे. भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी #OperationSindoor दरम्यान पाकिस्तानला झालेल्या मोठ्या नुकसानीचा सविस्तर तपशील देशासमोर मांडला आहे.
📍एकूण 4 ठिकाणचे पाकिस्तानी रडार नष्ट
📍कमांड आणि कंट्रोल सेंटर्स: 2 नष्ट
📍धावपट्ट्या: 2 हवाई तळांवरील धावपट्ट्या उध्वस्त
📍हॅन्गर्स: तीन वेगवेगळ्या स्टेशन्सवर 3 हॅन्गर्सचे नुकसान
📍विमाने: एक C-130 क्लासचे विमान नष्ट
4-5 लढाऊ विमाने, बहुधा F-16 विमानांचे नुकसान
एक लांब पल्ल्याचे विमान (AEW&C किंवा SIGINT) 300 किमी पलीकडील हल्ल्यात नष्ट
5 अत्याधुनिक लढाऊ विमाने (F-16 किंवा JF-17 क्लास) नष्ट
📍हवाई संरक्षण प्रणाली: 1 सरफेस टू एअर मिसाईल (SAM) प्रणाली नष्ट
“भारत विजय मिळवत असताना काँग्रेसला पराभवच का दिसतो?” असा सवाल उपस्थित करत केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर नाही, भारतीय अधिकाऱ्यांवर नाही आणि सत्यावरही नाही. त्यांचा विश्वास आहे तो फक्त पाकिस्तानच्या कथनावर.
देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांपेक्षा शत्रूच्या प्रचाराला अधिक महत्त्व देणे हे केवळ राजकारण नसून, ही एक धोकादायक मानसिकता असल्याचेही उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये ठामपणे नमूद केले आहे.