महाराष्ट्र : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरच्या आसपास भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल अशी भविष्यवाणी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशीच आपला पूर्णपणे पराभव झाला होता असं वक्तव्य करून चर्चेत आले आहेत.
पुण्यात माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशीच आपला पूर्णपणे पराभव झाला होता. लोक यावर विश्वास ठेवू दे किंवा नको ठेवू दे, पण 7 तारखेला झालेल्या अर्ध्या तासाच्या हवाई युद्धात आपला पूर्णपणे पराभव झाला होता. भारतीय विमानं पाडण्यात आली होती. त्यामुळे हवाई दलाची सर्व विमाने जमिनीवर होती आणि एकही विमान उडाले नव्हते. जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा येथून कोणतेही विमान उडाले असेल, तर पाकिस्तान ते पाडण्याची दाट शक्यता होती. त्यामुळेच हवाई दलाची सर्व विमाने जमिनीवर ठेवण्यात आली होती.”
पृथ्वीराज चव्हाण यांनी असाही दावा केला की, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही पाहिले की, सैन्य एक किलोमीटरही पुढे सरकले नाही. दोन-तीन दिवसात जे काही घडले, ते हवाई युद्ध आणि क्षेपणास्त्र युद्ध होते. भविष्यातही अशाच प्रकारे युद्ध लढली जातील. अशा परिस्थितीत, आपल्याला खरोखरच 12 लाख सैनिकांच्या सैन्याची गरज आहे का? आपण सैनिकांचा वापर इतर कामांसाठी करू शकतो? असे प्रश्न उपस्थित करतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच एक मराठी नेता देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असा पुनरुच्चारही केला.