चंद्रपूर : राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असून आदिवासी बांधवांची प्रगती व्हावी, यासाठी राज्यपालांचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गावे पेसामध्ये घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी करून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली असून पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आणि संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकासात राज्यपालांचे योगदान राहील, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. तसेच, समृद्धी महामार्ग पोंभुर्णापर्यत येणार असून या महामार्गासाठी कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही, असे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले.
‘पोंभुर्णा तालुक्यातील गावांचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समाविष्ट झालेल्या गावांना दरवर्षी 25 लक्ष रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच वनसेवा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झटका मशीनसाठी 15 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागेल त्याला झटका मशीन देण्यात येईल,’ असे ते म्हणाले. पोंभुर्णा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात येईल. बिरसा मुंडा केवळ एक व्यक्ती नाही तर शोषित, वंचित लोकांचा बुलंद आवाज आहे. म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.