पुणे : “पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून ते तंत्रज्ञान, उत्पादन आणि जीसीसी (GCC) चे हब बनत आहे. पुण्याला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी आम्ही ११- किमी मेट्रोचे जाळे आणि ५४ किमीचे भुयारी मार्ग तयार करत आहोत. तुम्ही १५ तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ,” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना दिला.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांसह भाजपचे अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर उपस्थित होते.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘मेगा प्लॅन’
पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या:
मेट्रो आणि टनेल: शहरात ११० किमी मेट्रो नेटवर्क आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५४ किमीचे भुयारी मार्ग (Tunnels) तयार केले जाणार आहेत.
डबल डेकर पूल: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पुणे-अहिल्यानगर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक या मार्गांवर ‘डबल डेकर’ पूल उभारले जातील.
रिंग रोड: शहरांतर्गत आणि बाहेरून होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी इनर आणि आऊटर रिंग रोडचे काम वेगाने पूर्ण केले जाईल.
नदी पुनरुज्जीवन: रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुळा-मुठा नदीचा किनारा विकसित करून शहराच्या सौंदर्यात भर घातली जाईल.
पाणी आणि स्वच्छता: सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२ ‘सीवेज ट्रीटमेंट प्लांट’ सुरू केले असून, शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा करण्याचा आणि पाणी गळती रोखण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पुणे ग्रोथ हब: पायाभूत सुविधांसाठी हजारो कोटींच्या गुंतवणुकीचा ‘कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ तयार असून ‘पुणे ग्रोथ हब’च्या माध्यमातून पुण्याचा कायापालट केला जाईल.
सुरक्षित पुण्याचा निर्धार
शहराच्या सुरक्षेसाठी आणि नियोजनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर फडणवीस यांनी भर दिला. ‘इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’च्या माध्यमातून थ्री-डी ट्विनिंगचे पहिले मॉडेल पुण्यात तयार केले जात आहे, ज्यामुळे नवीन अतिक्रमणांवर आळा बसेल. तसेच संपूर्ण शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क उभारून आरोग्य, पूर नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधींचा निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.