मुंबई/बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या असून, “आज महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी अविश्वसनीय आहे. ते केवळ एक नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची आणि इथल्या प्रश्नांची सखोल जाण असलेले लोकनेते होते. जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल मोठी आस्था होती. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे ते एक संवेदनशील नेतृत्व होते.”
अजित पवारांसोबतच्या वैयक्तिक संबंधांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “माझ्यासाठी हा वैयक्तिक आघात आहे. मी माझा एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि अशा वेळी त्यांचे जाणे हे राज्याचे मोठे नुकसान आहे.”
“राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत तीन दिवसाचा दिखवटा जाहीर करण्यात आला आहे. कधीही भरून न निघणारं असं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण आहे. अजित पवार हे जनतेच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असायचे. लोकांमध्ये त्यांचा वावर असायचा.
“त्यांच्या कुटुंबावरही प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यााशी चर्चा करून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आहे. त्यांनीही याबद्दल प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. एकूणच देशातच या प्रकरणाने हळहळ पसरली आहे. पुढच्या सर्व गोष्टी त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रिया ताईंशी बोलणं झालं. त्यानंतर पार्थ पवारांशी बोलणं झालं. संपूर्ण परिवार बारामतीला गेल्यावर सर्व निर्णय त्यांच्या संमतीने घेतले जातील” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“अजितदादा गेले, यावर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.