मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेली, त्यांना देश कसा चालवायचा, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत कुठलीही माहिती नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी खरगेंचा समाचार घेतला.
नेमका वाद काय?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मध्य पूर्वेतील संकट आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘हुकूमशहा’ असून पंतप्रधान मोदी हे त्यांचे ‘गुलाम’ असल्याची टोकाची टीका खरगे यांनी केली होती. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
भारताने ‘टॅरिफ वॉर’मध्ये झुकणे नाकारले – फडणवीस
खरगे यांच्या आरोपांना खोडून काढताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारताच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणाचे समर्थन केले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षा अत्यंत खंबीरपणे जपली आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळेच जागतिक संकटातही भारताची स्थिती भक्कम राहिली. जेव्हा जागतिक स्तरावर ‘टॅरिफ वॉर’ (कर युद्ध) सुरू झाले, तेव्हा भारत कोणासमोरही झुकला नाही. भारताने कणखरपणे उभे राहून त्याचा सामना केला. भारताने अनेक देशांसोबत अशा प्रकारे टॅरिफ अॅग्रीमेंट केले की, ज्यांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच अखेर मागे हटावे लागले.
“देशाचे हित जपणाऱ्या नेतृत्वावर गुलामीचा आरोप करणे हे केवळ हास्यास्पद आहे. स्वतः एका कुटुंबाची चाकरी करणाऱ्यांनी जागतिक राजकारणावर भाष्य करणे शोभत नाही,” असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.