मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या युतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टिंगल उडवली आहे. “ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने फार काही मोठे घडेल असा समज बाळबोधपणाचा आहे,” अशा शब्दांत फडणवीसांनी या युतीचा प्रभाव शून्य असल्याचे स्पष्ट केले.
झेलेन्स्की आणि पुतीन यांची उपमा!
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “मी टीव्हीवर या युतीचा कार्यक्रम पाहिला, तेव्हा असे वाटले की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की (उद्धव ठाकरे) निघाले आणि तिकडून पुतीन (राज ठाकरे) आले! पण प्रत्यक्षात ही केवळ आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली धडपड आहे. या पलीकडे या युतीचा कोणताही राजकीय अन्वयार्थ नाही.”
“मराठी माणसाचा विश्वासघात केला”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या ‘ट्रॅक रेकॉर्ड’वर बोट ठेवत गंभीर आरोप केले. “या मंडळींनी सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात केला आहे. ज्यांनी मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचे पाप केले, त्यांच्यासोबत आज मुंबईकर नाही. भ्रष्टाचार आणि स्वहित हेच त्यांचे धोरण राहिले आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
भावनिक आवाहनाला मुंबईकर भुलणार नाही
निवडणुका जवळ आल्या की भावनिक राजकारण करायचे, ही ठाकरेंची जुनी पद्धत आता चालणार नाही, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. “मुंबईची जनता आता सुज्ञ झाली आहे. त्यांनी महायुतीची विकासकामे पाहिली आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंनी आणखी दोन-चार जण सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीलाच मतदान करतील,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
अस्तित्व टिकवण्याची धडपड
भाजपच्या मते, जेव्हा स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवण्याची ताकद उरत नाही, तेव्हा अशा प्रकारच्या ‘सोयीच्या’ युती केल्या जातात. ही युती म्हणजे वैचारिक नसून केवळ राजकीय विजनवासातून बाहेर पडण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका भाजप समर्थकांकडून केली जात आहे.