Monday, October 13, 2025

डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला

Share

गुजरातच्या सुरत नगरीत मध्यमवर्गीय घरात जन्मलेली एक साधी, सरळ मुलगी पुढे जनजाती सेवेसाठी आपले अख्खे आयुष्य अर्पण करेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. ती मुलगी होती डॉ. सौ. अमिता आचार्य (Dr. Amita Acharya). वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला साध्या डॉक्टरकीपेक्षा काहीतरी वेगळे, अर्थपूर्ण जीवन हवे होते. तिच्या आयुष्याला नवे वळण मिळाले तेव्हा, जेव्हा २५ मार्च १९८४ रोजी तिचा विवाह जनजाती कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ सेवाव्रती कार्यकर्ते डॉ. मधुकर आचार्य यांच्याशी झाला.

लग्नानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गुही या दुर्गम आदिवासी भागात संसार थाटला. हे संसार थाटणे म्हणजे एखाद्या स्वप्ननगरीत नव्हे, तर जंगलातल्या पर्णकुटीत उभे केलेले कठीण जीवन होते. एका खोलीत दवाखाना, दुसऱ्या खोलीत संसार आणि तिसऱ्या खोलीत स्वयंपाकघर—इतक्याशा जागेत त्यांचे संपूर्ण आयुष्य आकार घेत होते. आजूबाजूला साप, उंदीर, कधीमधी वाघांचे दर्शन, तर दुसरीकडे आरोग्य, अज्ञान, दारिद्र्याशी झुंजणारा जनजाती समाज.

अमिताताईंनी या वास्तवाला घाबरून पळ काढला नाही, तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याचा निश्चय केला. त्यांनी बालवाड्या सुरू करून लहान मुलांमध्ये शिक्षणाचा दिवा पेटवला, फिरत्या दवाखान्याद्वारे आजारींना औषधोपचार मिळवून दिले, आरोग्य शिबिरे घेऊन जनजाती बांधवांमध्ये स्वच्छतेची जाणीव रुजवली. चिंचपाडा व रगतविहीर या गावांत तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण उपचारांनी कुष्ठरोगाचा कायमचा उच्चेद केला—हे त्यांचे विलक्षण यश होते.

गुही परिसरात तेव्हा कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव प्रबळ होता. शाळा फोडण्याच्या, दवाखाना मोडून टाकण्याच्या धमक्या सातत्याने मिळत असत. पण अशा दडपशाहीला बळी न पडता अमिताताईंनी आपल्या धैर्याने आणि सेवाभावाने काम सुरू ठेवले. पापड उद्योग, मधुमक्षिका पालन, दूध प्रकल्प अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी महिलांना आणि गावकऱ्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला.

त्यांच्या या कठीण सेवाकाळात तत्कालीन संघ प्रचारक आणि नंतरचे सरकार्यवाह मा. भैय्याजी जोशीही अनेकदा गुही येथे मुक्कामी येत असत. त्या दिवसांत भैय्याजी स्वयंपाकघरात अमिता ताईंना हातभार लावत असत. ही आठवणच त्यांच्या जीवनाच्या साधेपणाची आणि परस्पर जिव्हाळ्याची साक्ष देणारी आहे.

पुढे नाशिक जिल्ह्यातील वणी येथे स्वतःचे दवाखाना सुरू करून संसार व सेवा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरीही डॉ. मधुकर आचार्य आठवड्याचे तीन दिवस गुही प्रकल्पासाठी देत असत. दोन कन्यांची आई म्हणून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना समाजासाठी झगडण्याची ताकद अमिता ताईंनी आपल्या अंतःकरणातूनच शोधून काढली होती.

त्यांचे आयुष्य म्हणजे सेवेला अर्पण केलेली साधना होती. आयुष्यातील ऐन तरुणपणी त्यांनी कुटुंबासह जंगलात राहून आदिवासी समाजासाठी काम करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला, तोच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा ठरतो.

दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. अमिता आचार्य यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाजसेवेत एक प्रेरणादायी अध्याय संपला आहे. मात्र त्यांनी रुजवलेली सेवा, समर्पण आणि धैर्याची बीजे जनजाती बांधवांच्या जीवनात सदैव फुलत राहतील.

अमिताताईंच्या सेवाव्रती जीवनाला आमचा कृतज्ञ निरोप. विनम्र श्रद्धांजली!

अन्य लेख

संबंधित लेख