Wednesday, August 27, 2025

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत

Share

भारताची अखंड उन्नती आणि त्याला पुन्हा एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान करणे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासामागचा अढळ संकल्प आहे. स्थापना असो वा कार्यपद्धती, विस्तार असो वा दैनंदिन कामकाज, या प्रत्येक टप्प्यात भारतमातेची निस्सीम सेवा हाच केंद्रबिंदू राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्षांची यात्रा : नवी क्षितिजे” या तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात डॉ. भागवत बोलत होते. “संघाची स्थापना भारतासाठी आहे, संघाच्या अस्तित्वाचा अर्थ केवळ भारतासाठी आहे, त्याचे कार्य भारतासाठी आहे, आणि आता भारताने जगाला आपले योगदान देण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.

संघाच्या विचारधारेचे स्पष्टीकरण

भागवत म्हणाले की संघाबाबतची चर्चा प्रामुख्याने चुकीच्या माहितीवर आधारलेली असते, प्रत्यक्ष सत्यावर नाही. २०१८ साली अशाच व्याख्यानमालेद्वारे संघाच्या मूलभूत तत्त्वांचे स्पष्टीकरण देण्यात आले होते, हे त्यांनी आठवले. “संघाबद्दल बरीच चर्चा होते, पण बहुतांश चर्चा अप्रमाणित माहितीनुसार असते. संघाचे ध्येय समाजपरिवर्तन आहे, राष्ट्रोन्नतीसाठी आवश्यक सद्गुण जागृत करणे आहे. नेते, धोरणे, पक्ष ही सहाय्यक साधने आहेत; मूळ प्रयत्न हा समाज बदलण्याचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संघाचे संस्थापक डॉ. के. बी. हेडगेवार यांचा दाखला देत भागवत म्हणाले, “हे जीवन माझे राष्ट्राला अर्पण आहे. वैयक्तिक सुखाची चिंता पुढच्या जन्मासाठी.” हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते आणि त्यांची भारतभक्तीच १९२५ मध्ये संघ स्थापनेमागील प्रेरणा ठरली, असे त्यांनी सांगितले.

‘भारताचे ध्येय’

स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनाचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की प्रत्येक देशाला जागतिक व्यवस्थेत एक विशिष्ट ध्येय पूर्ण करायचे असते आणि आता भारताची भूमिका उलगडत आहे. “कोणताही देश नेता होणार असेल, तर ते केवळ स्वतःसाठी नसावे; त्या नेतृत्वामुळे संपूर्ण जगात नवी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

भारताच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की भारत कधीकाळी जगात अग्रेसर होता, परंतु परकीय आक्रमणाखाली गेला. “आपण एकदा स्वातंत्र्यसंपन्न व क्रमांक एक होतो. काही हजार लोक आले आणि त्यांनी आपल्यावर राज्य केले. असे का झाले? केवळ सैनिकांशी लढून चालत नाही; देशासाठी जगणे आणि मरणे आवश्यक असते. त्या काळी काँग्रेसने देशाला जे द्यायला हवे होते ते दिले नाही,” असे भागवतांनी नमूद केले.

‘हिंदू म्हणजे सौहार्दावर विश्वास’

हिंदू म्हणजे काय, यावर भाष्य करताना भागवत म्हणाले, “हिंदू तो जो स्वतःच्या मार्गाने चालतो आणि इतरांचा मार्ग अडवत नाही. प्रत्येक जण स्वतःचा मार्ग अनुसरूनही एकाच ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, असा विश्वास बाळगणारा म्हणजे हिंदू.”

ते पुढे म्हणाले, “आपले डी.एन.ए (DNA) एकच आहे. सौहार्दाने राहणे हीच आपली संस्कृती आहे. प्राचीन काळापासून आपण जाणले आहे की संपूर्ण जगाला एकाच दैवी शक्तीने बांधले आहे.”

हिंदू या नावाचा मर्म स्पष्ट करताना सरसंघचालक म्हणाले की ‘हिंदू’ शब्दाचा अर्थ केवळ धार्मिक नाही, तर राष्ट्राबद्दलची जबाबदारी यामध्ये सामावलेली आहे. हे नाव इतरांनी दिले, पण आपण स्वतःकडे नेहमी मानवशास्त्रीय दृष्टीने पाहिले आहे. आपण मानतो की मनुष्य, मानवता आणि सृष्टी हे परस्पर जोडलेले आहेत आणि एकमेकांवर परिणाम करतात. हिंदूचा अर्थ म्हणजे समावेशकता – आणि समावेशकतेला कुठलीही मर्यादा नाही.

भागवत म्हणाले, “हिंदू म्हणजे काय – प्रत्येकजण स्वतःच्या मार्गाने चला, पण इतरांना बदलू नका. इतरांच्या श्रद्धेचा सन्मान करा, अपमान करू नका. हीच परंपरा, हीच संस्कृती – आणि अशा परंपरेचे पालन करणारे म्हणजे हिंदू. त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करणे हेच आपले ध्येय आहे. हिंदू म्हटले म्हणजे ‘हिंदू वि. इतर’ असा अर्थ अजिबात नाही. हिंदू म्हणजे समावेशकता.”

भारताचा समन्वयी स्वभाव

“भारताचा स्वभाव हा संघर्षाचा नाही, तर समन्वयाचा आहे. भारताची एकता यामागे भूगोल, संसाधने आणि आत्मचिंतनाची परंपरा हे घटक कारणीभूत आहेत. बाहेर पाहण्याऐवजी आपण आत डोकावले आणि सत्याचा शोध घेतला. त्यातून आपल्याला शिकायला मिळाले की सगळ्यांत एकच तत्व आहे, भिन्न रूपे असूनही. म्हणूनच भारतमाता आणि पूर्वज हे आपल्यासाठी पूजनीय आहेत,” असे भागवत म्हणाले.

“भारत माता आणि आपल्या पूर्वजांना मानणारा तोच खरा हिंदू. काही लोक स्वतःला हिंदू म्हणतात, काही भारतीय किंवा सनातनी म्हणतात. शब्द बदलू शकतात, पण त्यामागील भावना तीच आहे – भक्ती आणि श्रद्धा. भारताची परंपरा आणि डी.एन.ए आपल्याला जोडतात. विविधतेत एकता हीच भारताची खरी ओळख आहे. त्यामुळे जे आधी दूर होते तेही आता स्वतःला हिंदू म्हणू लागले आहेत. जीवनाची गुणवत्ता सुधारली की लोक मूळांकडे परत येतात. आम्ही कुणाला ‘हिंदू म्हणा’ असे सांगत नाही, पण तुम्ही हिंदू आहात हे आम्ही समजावतो. या शब्दांच्या मागे केवळ शब्दार्थ नाही, तर भारतमातेची भक्ती, पूर्वजांची परंपरा दडलेली आहे. ४० हजार वर्षांपासून भारतवासीयांचा डी.एन.ए एकच आहे. जे स्वतःला हिंदू म्हणतात त्यांचे जीवन चांगले बनवा; मग जे म्हणत नाहीत तेही म्हणतील. ज्यांना विसर पडला आहे, त्यांना पुन्हा आठवेल. हिंदू राष्ट्र म्हटल्यावर कुणालाही वगळले जात नाही. सत्ता मिळवणे हा त्यामागचा हेतू नाही. संघ कधीच विरोधासाठी किंवा प्रतिक्रियेसाठी बाहेर पडलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संघ प्रार्थनेतून प्रकट होणारा सार

संघाच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा उल्लेख करताना भागवतांनी सांगितले की संघ प्रार्थनेच्या शेवटच्या ओळी – भारत माता की जय – ही संघाच्या कार्याचा सारांश आहे. “हा आपला देश आहे, त्याचे गौरवगान करणे आणि त्याला जगात क्रमांक एक बनविण्यासाठी प्रयत्न करणे, हेच आपले कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.

स्वयंसेवकांच्या समर्पणावर चालणारा संघ

“संघाची वैशिष्ट्ये म्हणजे तो बाहेरील साधनांवर अवलंबून नाही, तर स्वयंसेवकांच्या वैयक्तिक समर्पणावर चालतो. ‘गुरुदक्षिणा’ ही संघाच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहे, ज्याद्वारे प्रत्येक स्वयंसेवक संघाबद्दलची आपली निष्ठा आणि बांधिलकी व्यक्त करतो. ही प्रक्रिया अखंड सुरू आहे. आमचे प्रयत्न असतात की विचार, संस्कार आणि आचार योग्य राहावेत. स्वयंसेवकांची काळजी घेणे हे आमचे काम आहे; संघटनेची काळजी ते घेतात. आपल्याला भारतात गटबाजी निर्माण करायची नाही, तर सगळ्यांना एकत्र आणायचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शताब्दीचा टप्पा

संघ स्थापनेच्या शताब्दी उत्सवाचा भाग म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यात संघाचे तत्वज्ञान, इतिहास व भविष्यातील राष्ट्रनिर्माणातील भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी या सत्रांना उपस्थित आहेत.

शेवटी भागवत म्हणाले की भारताचा विश्वगुरू म्हणून उदय हा केवळ राष्ट्रहितासाठीच नव्हे तर विविधतेत संतुलन शोधणाऱ्या जगासाठी नवा मार्गदर्शन ठरेल. “जग अनेक राष्ट्रांनी बनले आहे. मानवता एकच आहे, पण ती एकसंध नाही. भारताचे नेतृत्व हे विविधतेला मान्यता देत सौहार्द निर्माण करणारे असले पाहिजे,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, उत्तर क्षेत्र संघचालक पवन जिंदल आणि दिल्ली प्रांत संघचालक डॉ. अनिल अग्रवाल मंचावर उपस्थित होते. पहिल्या दिवशी सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी राजनयिक, माजी प्रशासकीय अधिकारी, विविध देशांचे राजनयिक, माध्यम संस्थांचे प्रमुख, माजी सैन्याधिकारी तसेच क्रीडा आणि कला क्षेत्राशी निगडित मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख