Friday, November 8, 2024

‘दुर्गा बनून लव्ह जिहादचा नायनाट करा’ – ॲड. वर्षा डहाळे यांचे तरुणांना सजग राहण्याचे आवाहान

Share

पुणे: लव्ह जिहादचे संकट आता तुमच्या-आमच्या घरापर्यंत पोचले आहे. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे प्रेम नसून केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सक्तीचे धर्मांतर होय. यापासून हिंदू मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी सजग राहणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ अधीवक्त्या ॲड. वर्षा डहाळे यांनी काल दिला.

कोथरूड मध्ये आरंभ प्रतिष्ठान, द एमआयटीयन्स ग्रुप आणि शुभम सुतार मित्रपरिवार तर्फे आयोजित दांडिया खेळायला आलेल्या तरुण वर्गाला संबोधित त्या बोलत होत्या. ‘लव्ह जिहाद’ची अनेक न्यायालयीन प्रकरणे  सौ. डहाळे यांनी हाताळली असून अनेक मुलींची त्यांनी सुटका केली आहे.    

त्या म्हणाल्या: “हजार-बाराशे वर्षां पूर्वी पासून ते आज पर्यंत भारतावर अनेक आक्रमणे झाली. आक्रमणे जमिनींवर झाली, मंदिरांवर झाली, धर्मावर झाली आणि महिलांवर झाली. पण आपण इतिहास विसरलो. काळाच्या ओघामध्ये आपला शत्रू कोण होता हे विसरलो.”

“हल्ली आक्रमणाची पद्धत बदललेली आहे. सध्या तुमच्यावर तलवारीने आक्रमणं होत नाही, पण आपल्या घरातल्या शक्ती स्थानावर त्यांचा लक्ष आहे. आपल्या घरातील शक्ती स्थान म्हणजे आपली आई-बहीण. सुप्त पद्धतीने तुमच्या घरातल्या मुलींवर त्यांचे लक्ष आहे. असली संकटे आपल्या दारापाशी उभी आहेत. आपल्याच घरातील मुलगी जेव्हा ‘श्रद्धा वाईकर’ होते तेव्हा आपल्याला जाग येते. ही  वेळ येऊ नये म्हणून आपण जागरूक असणे आवश्यक आहे.” 

तरुणांना आवाहन करत त्या म्हणाल्या नवरात्री सारखे सण आपण समाजात जागृती  निर्माण व्हावी म्हणून साजरे करत असतो. “तुमच्या पूर्वजानी बलिदान दिलं, धर्मवीर संभाजी महाराजानी बलिदान केलं म्हणून तुम्ही इथे असे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी एकत्र आलेले आहात. आणि तुम्ही धर्म जपला तर येणाऱ्या पिढ्या देखील असेच धर्मकार्य करू शकणार.” 

“ज्या भूमीवर तुमचा जन्म झाला आहे तिथे मुलीला, स्त्रीला देवीचा स्थान आहे. नवरात्रीमध्ये आपण सजवलेल्या देवीकडे विद्या मागा, शक्ती मागा. स्वतः दुर्गा बना, सजग रहा आणि समाजामध्ये होणाऱ्या ‘लव्ह जिहाद’ सारख्या वाईट प्रवृतींचा नायनाट करा,” असे सौ. डहाळे यांनी तरुणांना आवाहान केले. 

अन्य लेख

संबंधित लेख