पुणे : “आपण परंपरेने गायीला ‘माता’ मानतो, मात्र गायीपासून किती अफाट उत्पादने तयार होऊ शकतात, याची अनेकांना कल्पना नाही. गोमूत्र आणि शेणापासून साकारलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन अद्वितीय आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थकारणाला एक नवी आणि वेगळी दिशा देण्याची शक्ती गायीमध्ये आहे,” असे ठाम मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय संस्था ‘ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रिज’ (जीसीसीआय), ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ आणि ‘आर्.आर्. काबेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्याच्या कृषी महाविद्यालय मैदानात ‘गौ टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.
मंत्री पाटील पुढे म्हणाले की, “ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर शेणाचे व्यवस्थापन कसे करायचे, हा मोठा प्रश्न असतो. मात्र, गोबरगॅसच्या माध्यमातून समाजाच्या ऊर्जाविषयक गरजा पूर्ण होऊ शकतात. राज्य सरकारने आता गोशाळांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे केवळ गाय पाळणेच नव्हे, तर त्यापासून मिळणाऱ्या उप-उत्पादनांकडे व्यावसायिक दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे.”
या प्रदर्शनात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेली औषधे, खते, रांगोळी, साबण, अगरबत्ती तसेच बांधकाम साहित्यातील विविध नाविन्यपूर्ण वस्तू मांडण्यात आल्या आहेत. गो-आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजित ‘गौ-टेक २०२६’ एक्स्पोला भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यावेळी देशी गोवंश संवर्धन, सेंद्रिय शेती, पंचगव्य तसेच गो-आधारित उद्योगांना चालना देणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. या उपक्रमांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळून शाश्वत विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.