आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून कांद्यावरील निर्यातबंदी खुली करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन २० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. आहे. तसेच खाद्यतेलाच्या आयातीवर आता २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं राज्यचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितलंय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत म्हणाले, “मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने आमच्या बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे निर्णय निश्चितपणे क्रांतीकारी ठरतील आणि त्यामुळे आमच्या कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“खाद्यतेलाच्या आयातीवर आधी कोणतेच शुल्क नव्हते, त्यावर आता 20 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल. याशिवाय रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर कस्टम शुल्क 12.50% वरून 32.50% करण्यात आले आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतलेला आहे.”
पुढे ते म्हणाले, “कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरुन 20 टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे संपविली आहे. यातून कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल. तसेच, बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी सुद्धा किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे,” असे ते म्हणाले.