Saturday, May 25, 2024

भारतीय पेहराव उठावदार करणारे कानातले दागिने

Share

केवळ पार्टी, लग्न वगैरे कार्यक्रमांनाच नाही, तर घराबाहेर पडताना पोशाख, ज्वेलरी पूरक ठरत आहे ना हे बघितले जाते. लग्नाला जाताना ही निवड कशी करायची, त्याविषयी –

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. या दिवसांत मेंदी, हळद, संगीत असे विविध कार्यक्रम सुरू असतात. या कार्यक्रमांना आवर्जून पारंपरिक पोशाख परिधान केला जातो. या वेळी मुलींना पारंपरिक पेहरावावर ज्वेलरीदेखील उठावदार असायला हवी असते. या पेहरावावर दागिन्यांची निवड जर चुकली तर त्यांचा संपूर्ण ‘लूक’ खराब होण्याची शक्यता असते.

कोणत्याही प्रकारचा लूक असला तरी तो कानातल्याशिवाय पूर्ण होत नाही. पारंपरिक किंवा कॉर्पोरेट, कोणत्याही प्रकारच्या लूकसाठी कानातले निवडताना गोंधळ होत असेल, तर या टीप तुमच्यासाठी आहेत.

पेहरावाला मॅचिंग कानातले : पेहरावाला मॅचिंग रंगाचे कानातले घातले तर लूक उठून दिसतो. पेहराव आणि कानातले बरोबर एकाच रंगाचे असतील, तर ते साजेसे दिसतात.

प्रसंगानुरूप कानातले निवडा : पारंपरिक पेहराव म्हटल्यावर बऱ्याच जणांना वाटते, केवळ मोठेच कानातले घातले पाहिजे. पण असे नसून प्रसंग बघून कानातल्यांची निवड करावी. कधी कधी छोटे नाजूक झुबे चांगले दिसतात, तर कधी मोठे! एखादे गेटटुगेदर असेल किंवा छोटी पार्टी असेल तर मोठे झुबे नाही तर टॉप्स किंवा लहान आकाराची कानातली घालावी.

नेकलाईन बघावी : कानातले निवडताना पेहरावाची नेकलाईन नक्की पाहावी. जर तुम्ही डीप नेकलाईन किंवा ऑफशोल्डरचे ब्लाउज किंवा टॉप घालणार असाल, तर स्टेटमेंट इअररिंग्ज घालावीत. पण जर तुम्ही टर्टल नेक किंवा कॉलरवाले ब्लाउज, टॉप्स घालणार असाल तर तुम्हाला तुमचे सौंदर्य खुलवायला वेगवेगळ्या आकाराचे किंवा रंगांचे झुबे मदत करतील.

केशरचनादेखील विचारात घ्या : संपूर्ण पेहरावात जसे कानातले महत्त्वाचे असतात तशी केशरचनादेखील महत्त्वाची असते. कारण कानातले निवडताना केशरचनादेखील महत्त्वाची भूमिका निभावते. उदाहरण द्यायचे झाले तर जर अंबाडा एकदम घट्ट घातला, त्यावर काही बारीक फुले लावली तर त्यावर मोठे झुबे उठून दिसतात. यामुळे तुमची हेअरस्टाईल आणि कानातले एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असल्याचे दिसते.

नवे डिझाईन विचारात घ्या : हुप्स, ऑक्सिडाइज्ड झुबे, गोल्डन स्टड, हिऱ्याचे झुबे ही सध्या बाजारात आलेली एकदम नवी कोरी डिझाइन्स आहेत. या कानातल्यांच्या निवडीमुळे तुम्ही ‘ट्रेंडसेटर’ होऊ शकता. या नव्या डिझाइन्सच्या निवडीमुळे तुमचा लूक छान ग्लॅमरस होतो. तुम्ही एकदम हटके दिसता.

समृद्धी पुरंदरे

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख