Wednesday, September 18, 2024

फेमिनिझम ते वोकिझम एक अंधारयात्रा

Share

ऑलिंपिक खेळ सुरू झाले आहेत. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून जगाला जोडण्याचा, एक गेल्या शतकात उदयाला आलेला अभिनव उपक्रम आहे. जगभर प्रसिद्ध पावणाऱ्या या महोत्सवात सर्वच देशातले क्रीडापटू आपले कौशल्य दाखवत त्या त्या क्रीडा प्रकारात आपले नेपुण्य, वर्चस्व दाखवण्यासाठी जीवनभर प्रयत्न करत असतात.

अशा या महोत्सवाला उद्घाटन सत्रापासून एक जगभर घोंघवणाऱ्या वादळाने ग्रासून टाकले आहे. कुणे एके काळी याच क्रिडामहोत्सवात दहशतवादाने प्रवेश केला होता आणि मग हळू हळू जगभर या दहशतवादाने थैमान घातले. आता एका अशाच अमानवी विचारसरणीची काळी छाया या महोत्सवावर पडली आहे. जगभरातील विवेकी वृत्तीने वेळीच याची दखल घेतली नाही तर संपूर्ण मानवी संस्कृती पुढे एक आव्हान उभे राहणार आहे.

कूणे एके काळी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या विचाराने जिथे फ्रेंच राज्यक्रांती उदयाला आली, त्याच भूमीवर स्वातंत्र्याने स्वैराचारापुढे आपली मान टाकल्याची दुर्दैवी स्थिती पहावी लागत आहे आणि हे खूप भयावह आहे.

स्त्री आणि पुरुष यामध्ये असणारे नैसर्गिक भेद हे मानवी जीवनाला पुढे नेणारे आहेत असा सांस्कृतिक विचार न करता ज्या तत्त्वज्ञानाने स्त्री हे पापाचे प्रतीक आहे असे म्हणायला सुरुवात केली त्यावेळी ह्या बायबल प्रणित तत्त्वज्ञानाच्या विरोधात एक चळवळ उभी राहिली आणि तिचे नामकरण स्त्रीवादी चळवळ (फेमिनिझम) असे दिले गेले. जशी जशी ही चळवळ पुढे गेली तिचे स्वरूप प्रत्येक देशात बदलत गेले.

भारतात वास्तविक आमच्या विचारात अर्ध नारीनटेश्वर ह्या संकल्पनेत सुरुवातीपासून स्त्री / पुरुष ह्यांच्या नैसर्गिक भेदाला एक वेगळे उदात्त स्वरूप देण्यात आले होते. पण आमच्या विचाराच्या मागील आमची शक्ती दुर्बळ झाल्याने जगात जे विकृत विचार फोफावले त्यातून केवळ भौतिक गोष्टींचा विचार करणाऱ्या पाश्चात्य देशात स्त्रीवाद , स्त्री मुक्ती हे विचार फोफावले आणि मग भारतात पण त्याचा शिरकाव झाला . स्वतःला डावे, पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक हा विचार रुजवला त्यातून भारतीय स्त्री दृष्टीचा प्राकृत विचार मागे पडत अनेक विकृती जन्माला आल्या. त्यातूनच आज आपल्या कुटुंब व्यवस्थेची‌ उध्वस्त होण्याच्या दिशेने दुर्दैवी वाटचाल सुरू आहे.

पण फेमिनिझम ची सुरू झालेली वाटचाल इथेच थांबणार नव्हती. स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचार करण्यात होत असताना जगभरातील त्याला खतपाणी घालण्याचे काम ग्लोबल मार्केटिंग फोर्सेस वाल्यांनी कसे केले याची अनेक उदाहरणे आहेत. पुरुष केंद्रीत उत्पादने ही स्त्रियांनी वापरली तर आपली बाजारपेठ दुपट्ट होईल या शुद्ध बाजारी विचाराने स्त्री वादाला उचलून धरले. (उदाहरणार्थ स्त्री ने सिगारेट पिण्यास हरकत नाहीं अशा जाहिराती सुरू झाल्या) या सगळ्याचा परिणाम म्हणजे प्राकृत अवस्थेतून आम्ही विकृत अवस्थे कडे जाऊ लागलो.

आता याच मालिकेत एका आणखी भयानक विचाराने जन्म घेतला‌ आहे आणि तो म्हणजे स्त्री काय, पुरुष काय किंवा अगदी टोकाला जावून मनुष्य काय आणि कुत्रे, मांजर काय ? हे वर्गीकरण करण्याचे अधिकार कुठल्याच व्यवस्थेला नाहीत. हे अधिकार कुठल्या समाज व्यवस्थेला देणे म्हणजे त्या जीव मात्राच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे आहे आणि त्यामुळे अशी बंधने जी व्यवस्था तुमच्यावर लदते ती व्यवस्था तुम्ही नाकारली पाहिजे किंबहुना अशी सामाजिक व्यवस्था ही अमानवी आहे. असे तत्त्वज्ञान वोकिझम नावाने सांस्कृतिक मार्क्सवादी मंडळीनी जन्माला घातले आहे.

नेहमी प्रमाणेच या तत्वज्ञानाला उचलून धरले आहे ते डाव्या म्हणवून घेणाऱ्या सर्वच कम्युनिस्ट विचाराने. पण यावेळी त्यांनी स्वतःच्या तत्वज्ञानाला सांस्कृतिक मार्क्सवाद असे बिरूद लावून घेतले आहे. कामगार आणि कारखाने यातून निर्माण होवू घातलेली तथा कथित क्रांती कधीच, कुठेच यशस्वी झाली नाही, प्रत्यक्षात आली नाही . किंबहुना चीन, रशिया सारख्या देशांना उत्कर्षासाठी राष्ट्रवाद, भांडवलवादी विचाराचा आसरा घ्यावा लागला.

पण मग रूप बदलून हे तथा कथित क्रांतिकारी नवीन वर उल्लेखलेल्या तत्वज्ञानाला वोकीझम या गोंडस नावाने फोफवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याचेच दृश्य स्वरूप काल ऑलिंपिक स्पर्धेत महिला बॉक्सिंग क्रीडा प्रकारात बघायला मिळाले आहे.

घडले असे की अल्जेरिया देशातील महिला बॉक्सर खेलिफ ही (?) गेल्यावर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या महिला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग मध्ये डीएनए टेस्ट केल्यावर सर्व अटी पूर्ण करू शकली नाही आणि त्याचे कारण ट्रान्स जेंडर हे होते. असे सांगण्यात आले. पण ऑलिंपिक मध्ये तिला ( का त्याला ) महिला गटात प्रवेश मिळाला आणि इटलीच्या अंजेलोने ४६ सेकंदात सामना सोडून दिला. याचे मुख्य कारण तिने खेलीफ यांच्या बायोलोजिकल फरक आणि ट्रान्स जेंडेर याचे दिले आहे.

या घटनेला म्हणजे खेलिफला प्रवेश देण्यास आणि नंतरच्या घडामोडीचा ट्रम्प, अलन मस्क ते इटलीच्या पंतप्रधान सर्वांनी निषेध नोंदवला आहे. पण केवळ निषेध नोंदवून भागणार नाही वोकिझमचा हा मानवी मूल्ये गिळू पाहणारा अजगर ठेचायचा असेल तर जगभरातून त्यासाठी प्रामाणिक योजनापूर्वक प्रयत्न करावे लागतील.

बॉक्सिंग मध्ये घडलेल्या या प्रकाराला पार्श्वभूमी या अगोदर २६ जुलै रोजी पॅरिस ऑलिंपिक च्या उद्घाटनाची पण आहे. मानसिक रोगी झालेल्या या वोकिझम वाल्या मंडळीनी या उद्घाटन सोहळ्याचा संपूर्ण ताबा घेतला होता हे बघताना दिसत होते. पुरुष वेशातल्या स्त्रिया आणि स्त्री वेषातील पुरुष आणि त्यांचे विकृत लैंगिक चाळे याने व्यापलेल्या या सोहळ्यात कुठेही फ्रान्स देशाच्या संस्कृती , परंपरा यांचे दर्शन नव्हते. दिसत होती ती पूर्णपणे मानसिक विकृत मंडळींची उद्दाम शारीरिक हालचाल.

जगभरातील लोकांनी हे बघितले आहे. याविरुद्ध धर्म, पंथ, परंपरा आणि मुळ संस्कृतीचे वाहक मूग गिळून बसले आहेत ही ह्या विषयाची दाहकता अधिक वाढवणारी आहे. पोप हे नावालाच आहेत का ? ते का या गोष्टीचा निषेध करायला उभे राहत नाही ? का चर्च व्यवस्था पण सोरास सारख्या भांडवलदारांच्या घरी पाणी भरायला गेली आहे ?

या निमित्ताने वोकिझम चा हैदोस सर्व क्षेत्रात कसा प्रभाव टाकू लागला आहे हे जगाच्या समोर आले आहे. लिंग बदल हा अलीकडे पाश्चात्य देशात सर्वात मोठा व्यवसाय होवू पाहत आहे. जगभरात मनुष्याची लोकसंख्या घटण्यास यामुळे सुरुवात झाली आहे. LGBTQ ची मालिका आणखी किती लांबणार आहे याची कुणी खात्री देत नाही आहे. कुठले कपडे घालायचे ? पुरुषांचे कपडे आणि स्त्रियांचे कपडे असे वर्गीकरण का ? सलून पासून पब्लिक टॉयलेट पर्यंत सर्व काही जेंडर मुक्त करण्याची एक मोहीमच जगभर चालू झाली आहे.

बर्लिन मध्ये कुत्रे झालेली माणसे एकत्र आली होती ही घटना फार जुनी नाही. मनुष्य जन्म मिळाल्यावर ही स्वतःला प्राणी मानणे म्हणजे विकृत चाळे कुठेही करण्याचे लायसन मिळवणे आहे आणि हेच वोकिझम नावाचे तत्त्वज्ञान आहे.

माणसाला पुन्हा रानटी अवस्थेकडे नेणारी ही व्यवस्था, हा विचार गतीने जगभर लोकप्रिय होत असताना भारतात ही डाव्यांची जहागीरदारी बनलेली विद्यापीठे या वोकिझम तत्वज्ञानाला प्रोत्साहन , खतपाणी घालत आहेत. या तत्वज्ञानाला विरोध करणाऱ्यांना संस्कृती रक्षक म्हणून हिणवणारे रस्त्यावर येवून निर्ल्लज्ज पद्धतीने रस्त्यावर लैंगिक चाळे करताना काही वर्षापूर्वी आम्ही दिल्लीत बघितले होते. भारतात याची लागण झपाट्याने होत आहे.

या गोष्टी रोखण्यासाठी सगळ्यांनी पुढे येवून वेळीच आवर नाही घातला तर संपूर्ण मानव वंशाला निकालात काढणारा हा एक नवा डायनासोर तयार झालेला आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही.

स्त्रीवादी (फेमिनिझम) चळवळ कुटुंब व्यवस्था गिळंगृत करू पाहत होती तर वोकिझम संपूर्ण समाज व्यवस्थाच गिळू पाहत आहे. ही सगळी अंधार यात्रा जगभरातील तथा कथित पुरोगामी, डावे यांनी आपल्या शिरावर वाहून नेण्याची जबाबदारी उचलली आहे. केवळ व्यापार आणि व्यापार उद्दिष्ट ठेवून काही मंडळी या विचाराला नेहमीच प्रोत्साहन देत आले आहेत. ज्यांचे धार्मिक अनुबंध घट्ट आहेत ते कट्टर वादी मुस्लिम या वादळाचे स्वागतच करणार आहेत कारण त्यांना माहिती आहे त्यांचे धार्मिक कवच त्यांचे फार नुकसान करणार नाही. या वादळाचा सामना करण्यासाठी कदाचित उद्या चर्च व्यवस्था अधिक कट्टर होईल ! पण आम्हा हिंदूंचे काय ?

पुरोगामित्वाचा बुरखा घेवून हिंदू संस्कृती, हिंदू विचार उध्वस्त करणारी वृत्ती , शक्ती सर्व स्तरातून ठेचून काढण्याची वेळ आली आहे. मानवी मूल्यांचे रक्षण फक्त हिंदू विचारात आहे. ह्या पाश्चात्य देशातून सुरू झालेल्या अंधार यात्रेत लूक लुकणारा काजवा, आशेचा किरण फक्त आमचा मूलभूत हिंदू विचार आहे तो विचार जागवण्यासाठी, जगवण्यासाठी कटिबध्द होण्याची वेळ आली आहे. विमर्षची लढाई आता आरपारची लढाई आहे.

रवींद्र मुळे.
अहिल्यानगर.

अन्य लेख

संबंधित लेख