वैष्णवीला आज त्याचा ओझरता स्पर्श झाला….आणि तिला अचानक रोमांचित झाल्यासारखं वाटलं….हा अनुभव वेगळा होता….सुखावणारा होता……मुख्य म्हणजे असं वाटलं की हे परत परत व्हावं…..या आधी असा चुकूनजरी कोणाचाही स्पर्श झाला की ती चिडायची…..आज, आज अजिबात राग आला नाही…..उलट जे झालं ते आवडलंच…… छातीत होणारी धडधड तिला थेट ऐकू येत होती आणि तिच्या डोळ्यातही दिसत होती….तिला हे जाणवलं होतं की तो स्पर्श चुकून झाला नव्हता तर तो प्रयत्नपूर्वक केला गेला होता….पण आत्ता या क्षणाला तिला त्यापेक्षा महत्वाचे त्या स्पर्शानी निर्माण झालेली भावना जास्त महत्वाची वाटतं होती…..पुढे त्या स्पर्शाचं, वेडाचं रूपांतर ज्यात होतं तेच झालं……आता ओरडावसं वाटतंय, पण आवाजच फुटत नाहीये…..अचानक एक हसती-खेळती मुलगी कोमेजून गेली….काय नक्की घडले असेल असं….. १३-१५४ वय…..शरीरात होणारे नैसर्गिक बदल….शरीराची बदलणारी रचना….त्यामुळे मनात उठणारे तरंग….कितीतरी गोष्टी एकाचवेळी घडत होत्या….मनातले भाव व्यक्त करायला, होणारे बदल समजून घ्यायला योग्य जागा नव्हती……घरात बोलली नाही, शाळेतील बाईंजवळसुद्धा बोलली नाही…..मग आपल्याच सारखं होणाऱ्या आपल्याच वयाच्या एका मैत्रिणीजवळ बोलली…..दोघीनेही आपली जिज्ञासा भागविण्यासाठी आंतरजाळाची मदत घेतली…..नको असलेली माहिती, पद्धती सगळं समोर आलं, त्या बाल मनाला त्या माहितीचा ताण सहन झाला नाही आणि नको ते घडलं…… अगदी प्रत्येकवेळी असंच व्हायला हवं का तर नाही ना….कधी-कधी मैत्री, शारीरिक आकर्षण आणि प्रेम यामध्ये गल्लत होते. मैत्रीला मर्यादा हव्यात…..पण आत्ताच्या जगात जे समोर येतं ती आहे मर्यादा विरहित मैत्रीची गोष्ट, अनेक रूपातून….पण ती खरी मैत्री नाही……मग या मैत्रीचे रूपांतर शारीरिक आकर्षणात कधी होते हे कळत नाही आणि मग हाती येते ती केवळ फसवणूक…..बरं जे घडतं ते संमतीने घडल्यामुळे त्याला उघड-उघड फसवणूक देखील म्हणता येत नाही…..स्त्री प्रत्येकगीष्ट भावेनेच्या जोरावर करते…..आणि त्याच भावेनेच्या चष्म्यातून सगळेच याकडे बघत नाहीत….मग होते शारीरिक फसवणूक……. प्रेम हे स्पर्शाचे भुकेले नाही…..ती मनाची आणि भावनांची गुंतवणूक आहे…..आयुष्यभराची…..एकमेकांवर पूर्ण विश्वास, एकमेकांचा, परस्परांच्या भावनांचा, विचारांचा, पूर्ण आदर म्हणजे प्रेम, पूर्ण स्वीकार म्हणजे प्रेम…..तर हे प्रेम शास्वत….इथे बाकी गोष्टींना थारा नाही….. प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती आहे….आपल्याला एक सहावे इंद्रिय आहे….आपल्या मनात एक आपला मार्गदर्शक आहे….जो प्रत्येकवेळी आपल्याला आपल्या आसपासच्या परिसराची, व्यक्तींची जाणीव करून देत असतो….तो आपल्या मनाचा कौल आहे ग सखी…..तो ऐक…. त्याकडे लक्ष दे….तो कधीही चूक सांगणार नाही….एक प्रश्न मनाला विचार….मी जे करतेय ते मी सगळ्यांना, घरातल्या वडीलधाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना मोकळेपणाने सांगू शकते का? याचं उत्तर नाही आलं, तर ती धोक्याची घंटा आहे हे समज ग सखी…..ताबडतोब मागे फिर….हा मार्ग तुझा नाही, तुझ्यासाठीचा नाही….. मैत्री, आकर्षण आणि प्रेम…..एकाच नाण्याच्या बाजू नाहीत ग सखी…..त्या वेग-वेगळ्या आहेत…..हेच समजून घेणं गरजेचं आहे…..आपली जिज्ञासा भागवून घेतांना आपल्यापेक्षा अनुभवाने, अभ्यासाने मोठ्या व्यक्तीशी संवाद साधणे गरजेचे आहे ग सखी…..चुकीच्या पद्धतीने ज्ञानार्जन करणे एकलव्यालासुद्धा फळले नाही ग…..हे वय मुक्त बागडण्याचे आहे, नवे क्षितिज काबीज करण्याचे आहे…..आपला सर्वांगीण विकास करण्याचे आहे….आपल्या पायावर उभे राहण्यासाठी समर्थ होण्याचे आहे….ते कर….तुझ्याही आयुष्यात प्रेम नक्की येणार….पण त्यासाठी आधी तू तयार हो, शारीरिकरित्या, मानसिकरित्या….
सोनाली तेलंग
नाशिक