Saturday, July 27, 2024

हिरवाईची सोबत १: गच्चीवरील बाग कशी फुलवावी, तज्ज्ञाचे मार्गदर्शन

Share

आपली बाग असावी असे प्रत्येकीला वाटत असते. पण छोटी घरे असतील तर ती कशी फुलवावी हा प्रश्न असतो. अशावेळी गच्चीवरील किंवा अगदी गॅलरीतील बाग हा पर्याय असू शकतो. ती कशी फुलवावी, याबद्दल काही भागात तज्ज्ञाचे मार्गदर्शन.

आम्ही मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. त्यामुळे सतत हिरवाईच्या सोबतीने राहण्याची सवय जन्मजात जडलेली. नोकरीच्या निमित्ताने वडील अणि घरातील इतर पुरुष मंडळी मुंबईत आली. नोकर्‍या मिळाल्या. छोटी का होईना प्रत्येकाची फ्लॅट संस्कृतीची घरेही झाली. पण कोकणातील हिरवाईच्या आनंदाला मात्र मुकलो.

लग्न होऊन मी सासरी वरळी येथे आले. तिथे घराला एक अगदी छोटी बाल्कनी होती. ती पाहून मनोमन आनंदून गेले. वाटले, इथे आपली हिरवाई तयार करून ती जपायची हौस थोड्याफार प्रमाणात भागवता येईल. मग चार – पाच मध्यम आकाराच्या कुंड्या आणल्या. तळाला नारळाची किशी, वर माती अणि शेणखत घालून त्या भरल्या. नर्सरीतून वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांची कलमे आणली. ती त्या कुंड्यांमध्ये व्यवस्थित लावली. बाल्कनीत उन्हाच्या दिशेला कुंड्या ठेवल्या. हळू हळू सर्व गुलाबांनी बाळसे धरले. चांगले खत, पुरेसा सूर्यप्रकाश अणि पाणी मिळाले. गुलाब वाढायला सुरवात झाली. गुलाबी रंगाच्या गावठी गुलाबाला पहिली कळी आली, तेव्हा इतका आनंद झाला की शेजार्‍यांना त्या कळीचे दर्शन घ्यायला बोलावले. त्या इवल्याशा कळीने सर्वांना भरभरून आनंद वाटला.

रोज सकाळी उठून त्या कळीचे निरीक्षण करण्याची ओढ लागली. ती कशी आणि किती मोठी होत आहे हे पाहण्यात मन रमू लागले.. आणि एका सुंदर प्रसन्न सकाळी त्या कळीने आपले मुखकमल उघडून सुगंध पसरवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गावठी गुलाब आपल्या सुगंधाने सर्वांना मोहित करतो हे मात्र अगदी खरे!

… हळू हळू उरलेले चारही गुलाब आपल्या अंगाखांद्यावर कळ्या घेऊन रुबाब दाखवू लागले. लाल, केशरी, पिवळा अणि पांढरा असे आणखी चार गुलाब होते. लाल, केशरी अणि पिवळा गुलाब दिसायला मोहक आणि रूबाबदार होते. पण सुगंध मात्र यथातथाच होता. पांढर्‍या गुलाबाने आपले वेगळेपण जपले होते. त्याला चार – पाच फुलांचा गुच्छ यायचा. अनेक गुच्छांनी ते झाड लगडलेले असे. सगळ्या कुंड्यांतील गुलाब फुलले की आपोआपच एक सुंदर बुके तयार होत असे. आमच्या बाल्कनीचा आवाका फक्त पाच कुंड्यांचा असल्यामुळे थोडक्यात समाधान मानावे लागे. मोजक्याच कुंड्या असल्यामुळे नोकरी, घर अणि मुले सांभाळून गुलाबांची निगा राखणे सोपे होते. वेळेवर माती सैल करणे, छाटणी करणे जमत होते. गावाहून शेणाच्या गोवऱ्या मागवून त्याचा चुरा करून खत म्हणून घालत असू. चांगल्या प्रतीच्या शेणखतामुळे गुलाब अगदी तरारून येत.

पावसाळ्यात मात्र झाडांचे रूप फारच बदलून जात असे. मुंबईचा पाऊस झाडांना झोडपून काढत असे. झाडांची दशा पाहून खूप वाईट वाटत असे. निसर्गाच्या पुढे आपण हतबल होतो. पण एकदा का पावसाळा संपला, की पुन्हा सगळे गुलाब आपल्या मूळ रुपात येत.

मनीप्लँट
घराच्या हॉलमध्ये थोडी हिरवाई निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मनीप्लँट आणले. खिडकीच्या वरच्या बाजूला दोन हूक लावले. दोन हॅंगरमध्ये मनीप्लँट लावून त्या दोन हुकना टांगले. नेहमीची खिडकी त्या दोन मनीप्लँट्समुळे अधिक आकर्षक दिसू लागली.

मधल्या टीपॉयसाठी एक छोट्या हत्तीच्या आकाराची कुंडी आणली. हत्तीच्या पाठीवर रोप लावण्यासाठी जागा होती. त्यात माती घालून मनीप्लँटचे चार छोटे छोटे तुकडे करून रोवले. सगळे तुकडे वाढले तेव्हा ते इतके सुंदर दिसत होते, की हत्ती हिरव्या रंगाची झूल पांघरून रुबाबात उभा आहे असे वाटे. मनीप्लँटमुळे हॉलला जिवंतपणा आला. एका लहानशा कृतीने हॉलचा लूक एकदम आकर्षक झाला. मनीप्लँटसाठी फार काही करावे लागत नाही. अगदी छोटी वाटी भरून पाणी आणि अधून मधून ओल्या कापसाने पाने पुसली की झाले!

.. मुंबईत जागेची कमतरता असल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. फक्त गुलाब अणि मनीप्लँटवर आनंद मानीत होतो. पण मनात एका कोपर्‍यात मोठ्या टेरेस अणि तिच्यावरील बागेची सुप्त इच्छा जपून ठेवली होती. त्या इच्छापूर्तीची मी वाट पाहात होते. टेरेस गार्डनची स्वप्ने रंगवीत होते… (क्रमशः)

अपर्णा सावंत
(‘टेरेसवरील बाग’ या विषयात लेखिका तज्ज्ञ आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख