हा प्रश्न माझ्या मनात आपसुकच उभा राहिला जेंव्हा परवा एका मुलीची केस माझ्या समोर आली. १६ वर्षांची चुणचुणीत मुलगी (Girls), दहावीची परीक्षा संपवून निकालाची वाट पाहते आहे. तिच्या डोळ्यात उद्याची मोठी स्वप्ने आहेत, ती पूर्ण करायची जिद्द आहे, प्रयत्नामध्ये ती मागे हटणार नाही. पण…, हा पणच अवघड आहे पार करणे.
आपण तिला माया म्हणूया. जेंव्हा ती आली, तेंव्हा ती शांत होती. आमचे बोलणे कान देऊन ऐकत होती. तिचे ते मौन फार बोलके होते, आणि डोळे अथांग होते, तिला शब्दाची गरजच नव्हती. तिला विचारल्यावर सुद्धा अगदी मोजक्या शब्दात तिने सारे वास्तव समोर मांडले.
ती बोलत असताना स्वर फार संयत होता, सगळे माहिती होते तरी पुन्हा ऐकताना बरोबर आलेल्या मैत्रिणीचे मात्र डोळे भरून येत होते. माया म्हणाली, बहुतेक ( मी बहुतेक म्हणते आहे, कारण तिला देखील ठाम पणाने सांगता येत नाही एका अर्थाने) तिच्या जन्माच्या वेळी वडिलांना मुलगा हवा होता. त्यामुळे ते काहीतरी कारण काढून तिला रागावतातच, मरतात पण. ती पाचवीत असल्यापासून ही सगळे सहन करते आहे. लहान मुलीचे रूपांतर एका तरुण मुलीत झाले तरी परिस्थिती बदलली नाही.
मधे तर कमालच झाली, वडील म्हणाले आता तिचे लग्नच करायला हवे लवकरात लवकर. अर्थातच मायाला शिकायचंय, नोकरी करायची आहे, पायावर उभं राहायचं आहे. एकदा स्वप्न दिसल्यावर का माघार घ्यावी? हे ऐकताच त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी तिला बेदम मारलं. फोटो पाहिले, तिचा चेहरा ओळखू न येण्याइतका पूर्ण सुजला होता, शिवाय संपूर्ण पाठीवर मारहाणीचे ठळक वळ उठले होते. फोटो पाहताना मायाकडे बघायचे धैर्य झाले नाही. पण ते पाहून मन अक्षरशः विदीर्ण झालं.
ती मैत्रीकडे गेलेली असताना तिच्या आईने हे फोटो काढले. ( फोटो न काढता आलेले अनेक प्रसंग आहेतच. ) तीच पोलिसांकडे घेऊन गेली, तक्रार केली. पोलिसांनी आई वडिलांना बोलावून सज्जड दम भरला. पण प्रश्न सुटत नाहीत. आईला आवडलेले दिसले नाही. ती उघड पाठिंबाही देऊ शकेल असे शक्य वाटत नाही. वडिलांचा रागही धुमसतोच आहे असे म्हणाली.
मात्र शाळेत अनेकांनी समजून घेतले. मैत्रीण भक्कमपणे पाठीशी आहे, ती सुद्धा पोर आहे लहानशी, पण मनाने खंबीर आणि तिचे मायावर निरपेक्ष प्रेम आहे. मायाचे धाडस पण कमालीचे आहे. येवढे सहन करून सुद्धा तिचे स्वप्न ती भंगून द्यायला तयार नाही. शिक्षणाचे चालू ठेवायचे आहे, पुढे शिकून शिखर गाठायचे आहे. तिच्या मनोधैर्याची परिसीमा गाठलीच गेली नाही अजून.
हे पाहताना काही वर्षापूर्वीची एक केस स्वाभाविकच आठवली. वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने एक वेगळा अर्ज केला होता. व्यावसायिक पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती ती. नोकरीही मिळाली होती, पण तिथे हजर व्हायला तीन आठवड्याचा अवधी होता. त्या काळात वसतिगृहात राहू देण्याची विनंती होती. तिला इथूनच परस्पर नोकरीच्या गावी जायचे होते. सर्वांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून प्रमुख म्हणाल्या, परिस्थिती अवघड आहे, तिला घरी जायचे नाही, कारण घरातच अत्याचार होतात अशी दुर्दैवी स्थिती आहे. तिला कधीच घरी जायचे नसते, अनेक वेळा मैत्रिणीकडे राहायला जाते, नाईलाज झाला तरच घरी जाते. आता तिला चांगली संधी मिळाली सुदैवाने, आर्थिक दृष्ट्या पण स्वातंत्र्य मिळाले आहे. ही संधी तिने घ्यायची ठरवली आहे.
घरातले सर्व फी भारतात, पण ही परिस्थिती बिकट आहे.
त्यांनी दिलेले हे स्पष्टीकरण ऐकून आलेली अस्वस्थता वर्णन करता येणे शब्दांना शक्य नाही, मूलभूत संकल्पनांना हादरा बसला असे वाटले. तिला भेटायचा योग आला नाही, आणि काय विचारायचं, काय शब्दात धीर द्यायचा हाही प्रश्नच होता. सुदैवाने ती बुद्धिमान आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण चांगल्या रितीने करू शकली, स्वातंत्र्य मिळवू शकली इतक्या काळाने का होईना या साऱ्यातून बाहेर पडून मुक्त श्वास घेऊ शकली, हेच महत्त्वाचे होते. तिची व्यवस्था झाली.
पण प्रश्न आहेतच. अनेक आहेत, उत्तर सोपे तर नाहीच, शिवाय फार वाच्यता करता येत नाही.
मुली जर घरातही सुरक्षित नसतील तर त्यांनी जायचे तरी कुठे? कुंपणाने शेत खाल्ले तर काय करायचं? धोका पालकांकडूनच असेल तर मग कोणाकडे पाहायचे?
सुदैवाने समाजात काही व्यक्ती व संस्था आहेत,ज्या अशा वेळी मदतीला धावतात. मायाला चांगल्या मैत्रिणी, शिक्षक व समुपदेशक आहेत पाठीशी.
अत्याचार घरी झाले तर कोणाकडे पाहायचे?
अनेक वेळा मुलगा हवा असताना, मुलगी झाली की इतके टोकाचे हाल व नकार मिळून सुद्धा यातून बाहेर पडायला मार्ग नसतो. कितीतरी काळ सहनच करीत राहण्याला पर्याय नसतो. सुटकेची संधी अनेकांना मिळतही नसेल या विचाराने मन क्षुब्ध होते.
अशा भयानक सामाजिक प्रश्नापासून सोडवणूक होण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांची गरज आहे. स्वस्थ समाज जीवनाशिवाय समाजाची उन्नती व प्रगती पोकळच राहील.
विद्या देशपांडे