Wednesday, April 2, 2025

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है !

Share

पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि पूजनीय गुरुजी ह्यांच्या वर १९७८ /७९ साली दोन ध्वनी मुद्रिका प्रथम प्रकाशित झाल्या त्यातील डॉक्टर हेडगेवार ह्यांच्यावर असणाऱ्या ध्वनी मुद्रिकेतील गीत होते लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष शतकोटी हृदय के कुंज खिले है , आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है !

हे गीत आठवते आहे ते उद्या वर्षप्रतिपदेला डॉक्टर हेडगेवार ह्यांच्या जन्म दिनी देशाचे पंतप्रधान , एक संघ स्वयंसेवकांच्या भूमिकेत स्मृती मंदिर येथे भेट द्यायला जात आहेत त्या निमित्ताने. अर्थात मोदीजी ह्या पूर्वी अनेक वेळा तेथे गेले असणार , अनेक वेळा त्यांनी डॉक्टर हेडगेवार ह्यांच्या समाधीचे दर्शन घेतले असणार . संघ स्वयंसेवक , संघ प्रचारक , भाजप संघटन मंत्री आणि आता पंतप्रधान ह्या विविध भूमिका पार पाडत असताना. त्यातील एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे स्वयंसेवक होय!

संघात असे म्हटले जाते once a स्वयंसेवक always a स्वयंसेवक ! डॉक्टर म्हणायचे कुणाही स्वयंसेवकावर अशी म्हणण्याची वेळ आली नाही पाहिजे की मी संघाचा स्वयंसेवक होतो ! अर्थात व्यापक अर्थाने तर सारा हिंदू समाज स्वयंसेवकच आहे आज असणारा आणि उद्या होणारा ! त्यामुळे हे सगळे जे काही आहे ते राजकारणाच्या पलीकडचे आहे . ते अनुभवावे लागते . शब्दात समजून सांगता येत नाही.

१९२५ साली डॉक्टर हेडगेवार ह्या महापुरुषाने अशक्य वाटणारी एक गोष्ट करायची ठरवली ती म्हणजे हिंदू संघटन ! स्वातंत्र्याच्या क्रियाशील चळवळीचे वातावरण असताना असा वेगळा लांब , दूरचा मार्ग त्यांनी निवडला. देशासाठी कार्य करण्याचा , समर्पित होण्याचा धोपट मार्ग समोर असताना तरुण आणि अरुण वयातील मुलांना त्यांनी कुठलेही वलय प्राप्त न झालेले हे सामाजिक काम स्वीकारण्यास कशा प्रकारे प्रेरित केले असेल ? त्या मागे कुठली अद्भुत शक्ती असेल? सामाजिक शास्त्र किंवा अन्यान्य विषयात शोध निबंध लिहिणारे , संशोधन करणारे मंडळीनी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता ह्याचा अभ्यास करावा असे आवाहन संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने करावे वाटते.

खरे तर मोदीजी ह्यांच्या अंतर्मनात असणारे स्वयंसेवकत्व हे वारंवार अभिव्यक्त झाले आहे त्यासाठी त्यांना मी स्वयंसेवक आहे हे सांगावे लागलेले नाही पण आवश्यक त्या ठिकाणी प्रसंग आल्यावर त्यांनी ते लपवले पण नाही हे लक्षात ठेवावे लागेल. त्यांच्या मनात खरे तर अनेक वेळा स्मृती मंदिराच्या दर्शनाची ओढ लागली असेल अगदी त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारी करताना भक्ताला जशी ओढ लागते तशी . पण आपल्या आंतरिक शक्तीने अनेक वेळा त्यांनी ते दर्शन प्राप्त ही केले असणार पण आज ते स्वयंसेवक म्हणून आणि पंतप्रधान मोदी म्हणून जेव्हा दर्शनासाठी जात आहेत तेंव्हा असंख्य स्वयंसेवकांचे ऊर भरून येणे स्वाभाविक आहे .

संघाचा गेले १०० वर्षे सुरू असलेला हा प्रवास सहज सोपा नव्हता . उपेक्षा , हेटाळणी , चेष्टा, टिंगल , अत्यंत घृणास्पद टीका टिपणी, विविध आरोप आणि ह्या जोडीला सरकारी पातळीवरची दमनशाही ह्यातून संघ आणि स्वयंसेवक तावून , सुलाखून निघाला. प्रथम इंग्रज सरकार आणि नंतर काँग्रेस शासन सरकारी पातळीवर संघ संपवण्याची भाषा करत असताना दुसऱ्या बाजूने डावे विचारवंत , समाजवादी , लिबरल सगळे संघावर वैचारिक हल्ले चढवत साहित्य , कला,संस्कृती आणि ज्ञान केंद्र असलेली विद्यापीठे ह्यातून संघाबद्दल गरळ ओकत होते. पण स्वयंसेवकांचा डॉक्टर हेडगेवार ह्यांनी दिलेल्या तंत्र आणि मंत्रावर विश्वास होता. त्यातून अनेक स्वयंसेवक , कार्यकर्ते ह्यांना जीवन लक्ष मिळाले. अशा जीवन लक्ष मिळालेल्या कार्यकर्त्यांचे नरेंद्र मोदी हे प्रतिनिधी आहेत.

संघाच्या कार्याचा उद्देश राजसत्ता ताब्यात घेण्याचा कधीच नव्हता आणि कधीच नसणार आहे पण त्याच बरोबर स्वयंसेवकांनी घेतलेली प्रतिज्ञा आणि रोज म्हटली जाणारी प्रार्थना ह्यात हिंदू धर्म , हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज ह्यांचे रक्षण करून हिंदू राष्ट्र पुन्हा वैभवा प्रति नेण्याचे उद्दिष्ट स्वयंसेवक कधी विसरत नाही, विसरलेला नाही. म्हणून ह्या उद्दिष्टातील एक टप्पा राजसत्ता असेल तर त्यापासून स्वयंसेवक लांब गेला नाही आणि ते सर्वस्व पण तो मानत नाही . त्यामुळे एखादा स्वयंसेवक पंतप्रधान होणे ही ध्येयपूर्ती नाही पण त्याचवेळेस त्या पदावर जाऊन त्याची स्वयंसेवक म्हणून व्यक्त होणारी अभिव्यक्ती स्वयंसेवकांना अभिमानास्पद वाटणारच !

संपूर्ण विश्वात आपल्या व्यक्तिमत्वाने , नेतृत्व करण्याच्या पद्धतीने नरेंद मोदीजी ह्यांनी एक प्रभाव निर्माण केला आहे. त्यांचा दिनक्रम , त्यांची सतत देशाप्रती असणारी चिंता आणि चिंतन , त्यांचे सार्वजनिक जीवनात वावरताना हिंदू असण्यात कुठेही न्यूनगंड भाव नसणे , स्वतःच्या परिवाराचा , स्वतःचा कुठलाही व्यक्तिगत अजेंडा कुठे ही नसणे , राष्ट्र प्रमुख तसेच अन्य कुणी विविध राष्ट्राचे प्रतिनिधी ह्यांच्या व्यक्तिगत भेटीत एक सलगी देणे , व्यक्तिगत स्नेह निर्माण करणे हे सगळे अन्य राष्ट्रातील प्रमुखांना , जनतेला अचंबित करणारे आहे पण हे सर्व संघाच्या शाखेतून , प्रशिक्षणाच्या वर्गातून त्यांनी प्राप्त केले आहे. संघात पंतप्रधान ,मंत्री , खासदार किंवा अन्यान्य लोकप्रतिनिधी ह्यांचे प्रशिक्षण दिले जात नाही पण व्यक्ती निर्माण करण्याचे अनोखे रसायन संघाच्या वायु मंडलात असते त्याचे एक वैश्विक नेतृत्वाचे उदाहरण नरेंद्र मोदी आहे.

राजकारणाचा चष्मा बाजूला ठेवून स्मृती मंदिरातील मोदीजी ह्यांच्या भेटीकडे बघितले तर संघ समजावून घेणे अधिक सोयीचे होईल असे वाटते. ज्यावेळी ही भेट होईल तेव्हा संघाचे लक्षावधी स्वयंसेवक आपल्या शाखांवर आद्य सरसंघचालक प्रणाम देत असतील त्या त्या शाखेचा वर्ष प्रतिपदा उत्सव संपन्न होत असेल म्हणजे ह्या घटनेचा माध्यमे जेव्हढा गवगवा करतील तितकीच अभिमानास्पद असूनही स्वयंसेवकांना ही एक सामान्य गोष्ट असेल हे अजब संतुलन जर समजले तर संघ समजेल अन्यथा राजकारणाच्या परिघात ह्या भेटीचे जे अर्थ काढले जातील ते स्वयंसेवकांच्या भावना कधीच लक्षात न आल्याचा परिणाम असेल.

हे नक्की आहे की ज्या डॉक्टर हेडगेवार ह्यांचे नाव त्यांच्या जन्मशताब्दी पर्यंत काही ठराविक वर्तुळात माहीत होते कालांतराने ते नाव लोकांना कळू लागले ते संघ कार्यकर्त्यांनी १९८९ पासून अधिक जोमाने आज पर्यंत सर्वत्र पोहचवलेल्या कार्यामुळे! मोदीजी ह्यांच्या स्मृती मंदिर भेटीने कदाचित जगभर अधिक डॉक्टर हेडगेवार ह्यांचे नाव चर्चेत येईल सुद्धा! पण मुळात डॉक्टर हेडगेवार ह्यांनी रुजवलेले संस्कार , अवलंबलेली कार्यपद्धती ही सगुण साकार रूपात कुणा व्यक्तीच्या जयघोषाची कधीच नव्हती. त्यामुळे आपलेच नाही तर संघटनेच्या पण नावाचा कुठे जयजय कार व्हावा हे त्यांना मान्य नव्हते . ( म्हणूनच शाखेवर प्रार्थनेच्या शेवटी भारत माता की जय हा जयघोष असतो. ) अभिनेवेश शून्य, निर्गुण, निराकार साधना हेच संघाचे सूत्र राहिले आहे त्यामुळे पूजनीय मोहनजी ह्यांनी एका ठिकाणी म्हटले होते संघ दिसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पेक्षा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शक्तीवर चालतो.

राजकारणाच्या अपरिहार्य प्रक्रियेत संघाचे अनेक असे परीस सम व्यक्तिमत्व समाजाच्या समोर आले . त्यातून समाजाला किंचित संघ समजायला मदत ही झाली . पण स्वयंसेवकत्व आणि स्वयंसेवक , शाखा आणि व्यक्तीनिर्माण ही समजण्यासाठी अनुभूती शिवाय पर्याय नाही.

जगाला भविष्यात आपल्या समाज समूहाला , संस्कृतीला टिकवून ठेवण्याचे आणि शांततेने सुखी जगण्याचे जे आव्हान निर्माण झाले आहे ते आव्हान आज जगात कुठल्याही तत्वात नाही . प्रत्येक तत्व हे अभिनिवेश , आक्रमण आणि अत्याचार ह्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना , अपौरूषेय वेदातून निर्माण झालेले हिंदू तत्वच जगाला सुखी , समाधानी , शांत ठेवू शकते हे आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे. आपले कुठलीही धार्मिक आचरण आणि कर्मकांड न सोडता ह्या तत्वाचा अंगीकार होऊ शकतो हे ह्या हिंदू तत्वाचे वैशिट्य म्हणावे लागेल . अशा हिंदू तत्वाची १०० वर्षांनी जगात खूप आवश्यकता , गरज लागणार आहे आणि त्यासाठी त्यांचे संवर्धन करणे ह्यासाठी संघटन हाच मार्ग आहे हे ओळखणारा महापुरुष म्हणजे डॉक्टर हेडगेवार !

अशा हिंदू तत्वाचे वैश्विक प्रतिनिधी म्हणून एक संघ शाखेतून सिद्ध झालेला स्वयंसेवक आपले श्रध्दा सुमन वाहण्यासाठी डॉक्टर हेडगेवार ह्यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला येत आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. हे श्रध्दा सुमन हिंदू तत्व जिवंत ठेवण्यासाठी ह्या कंटकाकीर्ण मार्गावरील अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांच्या प्रति असणाऱ्या श्रद्धेचे प्रतीक आहे.

अटलजी ह्या आणखी एका पुर्व स्वयंसेवक पंतप्रधानाने डॉक्टर हेडगेवार ह्यांचे वर्णन ‘ यह कैसा भक्त था , जो खुद भगवान बन गया , चलते चलते खुद राह बन गया , तील , तील जलते जलते खुद दाह बन गया , कुंभकार की कृती होकर निर्माण बन गया ! असे केले आहे ! एके ठिकाणी अटलजी म्हणतात वह एक थे तब नहीं डरे , अब हम. हुवे इतने है , भला अब हम क्यूँ डरे !

अटलजी ह्यांच्या वर केलेल्या वर्णनाचे वाहक म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. हिमालयाची निश्चलता आणि सागराची अथांगता त्यांच्या व्यक्तिमत्वात ओतप्रोत भरली आहे आणि म्हणूनच कवी ने वर्णन केलेली भावना आज प्रत्यक्षात येत आहे

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है !

रवींद्र मुळे
अहिल्या नगर

अन्य लेख

संबंधित लेख