मुंबई : १८ डिसेंबर २०२५ महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी भूकंपसदृश घडामोडी पाहायला मिळाली. काँग्रेसचे दिवंगत नेते हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सोलापूरचे दिग्गज नेते माजी आमदार दिलीप माने यांनीही ‘कमळ’ हाती घेतल्याने काँग्रेसला मराठवाडा आणि सोलापूर अशा दोन महत्त्वाच्या बालेकिल्ल्यांमध्ये मोठा हादरा बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला.
प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये जाण्यापूर्वी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सभापती राम शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. प्रज्ञा सातव यांची २०२४ मध्येच विधान परिषदेवर फेरनिवड झाली होती. अद्याप त्यांच्या कार्यकाळाची ५ वर्षे बाकी असताना त्यांनी दिलेला राजीनामा राजकीय वर्तुळात आश्चर्याचा विषय ठरला आहे.
“देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास”
प्रवेशावेळी बोलताना प्रज्ञा सातव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “राजीवभाऊंचे हिंगोलीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि राज्याच्या चौफेर विकासात सहभागी होण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आम्ही ‘सबका साथ, सबका विश्वास’ या धोरणाने जोमाने काम करू.”
काँग्रेससाठी मोठा भावनिक धक्का!
राजीव सातव हे राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने २०२१ मध्ये विधान परिषदेवर संधी दिली होती. तेंव्हा, भाजपचे उमेदवार संजय केणेकर होते, परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भाजपचा उमेदवार न देण्याची विनंती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून संजय केणेकर यांनी माघार घेतली होती. संजय केणेकर यांनी माघार घेतल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. आता त्याच भाजपमध्ये सातव यांनी प्रवेश केल्याने काँग्रेसची मराठवाड्यातील मोठी ताकद कमी झाली आहे. त्या महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या एकमेव महिला विधान परिषद सदस्य आहेत.
सोलापूरमध्ये दिलीप मानेंचे भाजपला बळ
प्रज्ञा सातव यांच्यासोबतच सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.