Sunday, May 26, 2024

रंगपंचमी ते धुळवड: सणांचा उलटा प्रवास

Share

हल्ली लोक धुळवडीलाच रंगपंचमी समजू लागले आहेत. महाराष्ट्रात मराठी समाजात गेली पंधरा वीस वर्षे हे बदल वेगात घडल्याचे मला जाणवते आहे.  

लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल की या लेखिकेचं पंचांगाचं ज्ञान दिव्यच दिसतंय. कारण होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असते आणि पाच दिवसांनी जी पंचमी येते त्या दिवशी रंगांची उधळण करत रंगपंचमीचा सण येतो. मग रंगपंचमी ते धुळवड हा उलटा क्रम का बरं मांडला आहे ? त्याचं कारण असं की हल्ली लोक धुळवडीलाच रंगपंचमी समजू लागले आहेत. महाराष्ट्रात मराठी समाजात गेली पंधरा वीस वर्षे हे बदल वेगात घडल्याचे मला जाणवते आहे.

भारताच्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये वर्षभर चंद्रकलांप्रमाणे येणाऱ्या तिथीनुसार काही ना काही सण, व्रतं, उत्सव करून समाजाला आध्यात्मिकतेकडे वळवायची, जागृत करून जोडून ठेवण्याची प्रथा आहे. गेल्या दीड दोन शतकांत निर्माण झालेल्या नोकरीप्रधान समाजाच्या चाकोरीबद्ध जीवनाच्या काही मर्यादा आहेत. म्हणजे असं बघा की होलिकोत्सव ते रंगपंचमी असा पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत पाच दिवस हा सण साजरा होतो. प्रत्येक दिवसाचं स्वतःचं असं एक वेगळं पौराणिक/ऐतिहासिक, आध्यात्मिक महत्त्व आहे. आणि ते प्रत्येकानं आपापल्या परीनं शोधायचं असतं. याचे काही ठोक नियम नसतात. प्रत्येक कुटुंबाची जी पद्धती असेल त्यानुसार आचरण केले जाते. आपापल्या इच्छेनुसार त्यात काही वैयक्तिक बदलही केले जातात. हिंदू धर्मात ही सगळी सोय आहे. फक्त आपली मर्यादा ओळखायची उंची आपली आपण गाठायची.

होळीच्या दिवशी होलिकादहन करून वाईट, अपवित्र असेल ते सगळं अग्नीला समर्पित केलं जातं. दुसऱ्या दिवशी ही होळीतली राख माती एकमेकांना लावायची पद्धत आहे. बनारसमधे चिताभस्म उधळून ‘मसान होली’ खेळण्याची प्रथा आहे. भगवान शिवशंकर स्वतः या खेळात सहभागी होतात अशी श्रद्धा आहे. भगवान कृष्णाच्या वृन्दावनात, गोकुळात आणि राधारानीच्या किंवा भक्तांच्या भाषेत श्रीजूजीच्या बरसाना या गावात लड्डुमार होली, लठमार होली वगैरे कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे होतात. महिनाभर आधीपासून या कार्यक्रमांची तयारी सुरु असते. पहिल्या दिवशी राधारानी मंदिरात वरच्या मजल्यांवरून खाली उभ्या असलेल्या तमाम भक्तांवर लाडवांची बरसात होते. तर दुसऱ्या दिवशी वेगळाच खेळ रंगात येतो. पुरुष राधारानीच्या महालावर चढून तिथे देवाचा ध्वज उभारायचा प्रयत्न करतात. ते दर्शनाला आलेल्या स्त्रियांना खेळकर, मजेदार ढंगाने उसकावतात. त्यांची खूप टर उडवतात, त्यांना छेडतात सुद्धा. मग या स्त्रिया लाठ्याकाठ्यांनी त्यांना मारून पळवून लावायला बघतात. स्वतःला वाचवण्यासाठी हे पुरुष ढालींचा वापर करतात. आता यात कोणी स्त्रीपुरुष फरक, स्त्रियांवर अत्याचार वगैरे मुद्दे घुसडणार असेल तर स्वतःची बौद्धिक, मानसिक उंची वाढू न देण्याचा घेतलेला निर्णय त्या व्यक्तीचा स्वतःचा असतो. कार्यंक्रमाच्या अंताला याच महिलांना वाकून चरणस्पर्श करून नमस्कारही केला जातो.

आमच्या कोकणात होळी ते रंगोत्सव असा पाच दिवसांचा उत्सव साजरा होतो. होळीला पोरंटोरं लोकांच्या घरची लाकडं चोरतात. ज्या घरचं लाकूड चोरीला गेलं, त्या घरचं दुःख होळीत जळालं असं आम्ही लहानपणी म्हणायचो. सहाणेवर (ग्रामदेवतेच्या देवळासमोरचं व्यसपीठ किंवा अंगण) लहानथोर सर्वच बोंबा ठोकतात. अगदी कोणाकोणाच्या नावाने ढो .. वगैरे मजेदार प्रकार असतात. लहान मुलांना चंटगिरी शिकवायची असेल तर कोकणात शिमग्याला आवर्जून जावं. नोकरी, आर्थिक तंगी, प्रवासाची असुविधा वगैरे कितीतरी अडचणी पार करत आजही मुंबईचा चाकरमानी ओढीने गावाकडे शिमगा आणि गणपतीला हमखास येतोच. या सहाणेवर रात्री तमाशाचा फड लागतो आणि दिवसा गावाची पंचायत बसते. गावपंचायतीत काही निवाडेही केले जातात. कधी भावकीत दुरावा आलेला असतो. तो देवासमोर घालून भांडण मिटवतात. मनं परत जुळतात, ग्रामदेवतेची पालखी सगळे भाऊ मिळून नाचवतात. देवाला कळा लावणे म्हणजे काही प्रश्न विचारणे, अडचणी, दुःख निवारण्याचे गाऱ्हाणे घालणे वगैरे कार्यक्रमही चालतात. पुढचे ३-४ दिवस विविध देवांच्या पालख्या गावात फिरतात. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत या पालख्या गावभर फेरफटका मारतात. देव आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी वर्षातून एकदा या दिवशी बाहेर पडतात. गाव नजरेखालून घालतात अशी भक्तिपूर्ण भावना आहे. ओरिसातील पुरीच्या भगवान जगन्नाथांचा रथ ओढण्यासाठी लोक जसे हिरीरीने पुढे येतात तसेच या पालख्या नाचवायची संधी कोकणी माणसाला अगदी मनापासून हवी असते.

एका गावाच्या पंचक्रोशीत एकापेक्षा अधिक देव आणि देवता असतात. मग हे बहीणभाऊ एकमेकांना भेटतात. ‘आमच्या देवाची सोन्याची पालखी’, ‘सहाणेवर पालखी नाचवती मुले, गावदेवी आमची शिमग्यात खेळे, ‘होळी शिमग्याला गावदेव पालखीत बसले…’ वगैरे कोकणी हेल आणि चालीची गाणी बायाबाप्यांच्या, पोराटोरांच्या तोंडावर असतात. ‘शेरणी काढणे’ हा प्रकारही अजब आणि फार फेमस आहे. लोकं आपल्या इच्छा मागण्या लिहून एका नारळासोबत पालखीच्या वाटेवर कुठेतरी पुरून ठेवतात. जिथे हे शेरना लपवलेलं असेल, बरोबर तिथेच पालखी थांबते अशी लोकांची श्रद्धा आहे. तो कार्यक्रमही अगदी पाहण्यासारखा असतो.

चैत्र कृष्ण पंचमीला साजरी केली जाणारी रंगपंचमी सुद्धा अशीच सार्वजनिक असते. आपल्या आसपासच्या लोकांसोबत महिलापुरुष मुले रंग खेळतातच पण पंचायतीच्या वतीनेही अनेक गावांत रंगाचा गाडा फिरवला जातो. एखाद्या ट्रक मध्ये भरपूर रंग घेऊन मोठे लोक गावातून फिरतात. गावात कोणीही रंग लागल्याशिवाय राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात. कसलाही भेदाभेद या उत्सवात नावालाही सापडत नाही. जातीपातीची कसलीही तुच्छ भावना कोकणी माणसांच्या मनाला शिवतही नाही. त्यामागे हे सामाजिक स्वरूपात साजरे केले जाणारे धार्मिक उत्सवचं आहेत नाही का?

वेगवेगळ्या रंगांचेही वेगवेगळे महत्त्व आहे. जसे की शांतता, प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक असा पिवळा रंग नीलवर्णी कृष्णाला अतिशय प्रिय आहे. ऊर्जा, शक्ती, वीररसाचा आशीर्वाद हवा असेल तर लाल रंग उधळावा. हिरवा रंग बुद्धी, सकारात्मकता जीवनात आणतो. तर निळा, जांभळा इत्यादी रंग न्याय, यश, सुरक्षितता, आरोग्य प्रदान करतात असे मानले जाते. रंगपंचमीच्या दिवशी बलराम आणि कृष्ण आपल्या मित्रांसमवेत रंग खेळत असे. थंडी ओसरून सुरु झालेल्या उन्हाळ्याचा तडाखा जाणवू नये म्हणून कृष्णाने सुरु केलेला हा उत्सव गेली हजारो वर्षे अव्याहतपणे चालू आहे. या दिवशी राधाकृष्णाला अबीरगुलाल लावला जातो. कारण या दिवशी कृष्ण गोपिकांची रासलीला रंगली होती अशीही कहाणी आहे. जो भक्त या दिवशी परमेश्वराची मनापासून प्रार्थना करेल त्यांना देव स्वतः येऊन रंगांच्या माध्यमातून आशीर्वाद देतात असेही मानले जाते. प्रामुख्याने मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा पाहायला मिळते.

आपल्या बॉलिवूडमधल्या होळीच्या दृश्यांमुळे आजकाल या सणाला मोठेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. बॉलिवूडवर हिंदी बेल्टचा, उत्तरभारतीय, पंजाबी समुदायाचा मोठा पगडा चित्रपटनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळापासून आहे. त्यामुळे विविध लेखक, दिग्दर्शक, निर्माते आपापल्या लहानपणी अनुभवलेला रंगोत्सव चित्रपटांच्या माध्यमांतून समाजासमोर आणतात. ‘होली है’ स्वरूपाची कित्येक गाणी लोकांच्या मनात गेली अनेक दशके ठाण मांडून बसली आहेत. दिवसागणिक या चित्रपट होळीगीतांत भरच पडत चालली आहे. या बॉलिवूडच्या प्रभावामुळे, तसेच महानगरीय शहरी जीवनामुळे असेल, लोकं धूळवडीच्याच दिवशी रंगपंचमी साजरी करून मोकळे होतात.

‘जीन्स पहन के जो तुमने मारा ठुमका, तो लट्टू पडोसन कि भाभी हो गयी’ ‘इशक के नाम पे करते सभी तो रासलीला है, मै करू तो साला कॅरेक्टर ढीला है’ अशा गाण्यावर ‘धुळवडीला रंगों का त्योहार’ म्हणत कंबर हलवणाऱ्या मंडळींना राधा कृष्णाचं आध्यात्मिक प्रेम समजून घ्यायचं असेल तर किती मेहनत घ्यावी लागणार आहे बरं? मला मजा, मस्ती, डान्स याबाबत काहीही अडचण नाहीये. खरंतर सवंग गाण्यांवरही माझा आक्षेप नाहीये. वर लिहिल्याप्रमाणे होळीच्या सणाच्या निमित्ताने बोंबा मारायची, तमाशे करायची प्रथा चिक्कार जुनी आहे. परंतु धुळवड असो वा रंगपंचमी, ती उत्साहात, नाचत, आनंदाने साजरी करताना पूर्णवेळ नाही जमले तरी निदान सुरुवातीचा किंवा शेवटचा काही वेळ तरी राधाकृष्ण नावाचा गजर करावा; काही कृष्णभक्तीचे गीत लावावे असे कोणालाच वाटत नाही. आपण हिंदू आहोत म्हणून हा सण साजरा करतो ही जाणीव लोप पावत चालली आहे. या सणांचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आजकालच्या ४०-५० वर्षांच्या व्यक्तींनाही सांगता येणार नाही. खरी अडचण आहे ती ही आहे.

आता लोकांकडे अनेक दिवस चालणारे सण साजरे करण्याइतका वेळ नाहीये पण भावना तर आहे. त्यामुळे या प्रश्नावर तात्कालिक उपाय म्हणून धूळवडीलाच रंगपंचमी साजरी करायचा हा पर्याय नक्कीच सोयीचा ठरतो आहे. पण या सगळ्यात दोन वेगवेगळ्या सणांचे, त्यांच्या शुभमुहूर्तांचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आपण विसरू नये म्हणून हा लेखनप्रपंच.

अमिता आपटे
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आणि आंतरराष्ट्रीय तसेच ईशान्य भारतातील प्रश्नांच्या अभ्यासक आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख