Saturday, September 7, 2024

वैभवशाली संस्कृतीच्या खुणा

Share

भारत पूर्वीपासून वैभवसंपन्न, समृद्ध आणि प्रगत देश होता. याचे अनेक दाखले इतिहासाच्या कुपीत बंद आहेत. भूतकाळाचा आढावा घेतला की आपल्या अवतीभवती असणारे अनेक संदर्भ आपल्यालाही आपल्या वैभवाची जाणीव करून देतात. त्यातूनच कोल्हापूर सारख्या छोट्या शहराचा रोम साम्राज्याशी असणारा संबंध उलगडतो. कोल्हापूरच्या टाऊन हॉल बागेमध्ये इतिहासाच्या या पाऊलखुणा प्रत्ययाला येतात.

कोल्हापुरातल्या जुना बुधवार तालीम समोरून तोरस्कर चौकात आले, की एक रस्ता शिवाजी पुलाकडे जातो. थोडे पुढे गेल्यावर एका चढाला लहान मोठ्या घरांची वस्ती दिसते. तिथून पुढे गेले की पंचगंगा नदी लागते. इथे राहणाऱ्या लोकांना पुसटशी कल्पना देखील नसेल की कधीकाळी इथे राहणारे लोक रोम साम्राज्याच्या संपर्कात होते. त्यांच्या वस्तीमधूनच भारत आणि रोम साम्राज्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा. ब्रह्मपुरी अशी या परिसराची प्राचीन ओळख होती. अर्थात हा वैभवशाली इतिहास आता केवळ काळाच्या पडद्याआड गेला नाही तर जमिनीखाली गाडला गेला आहे. पण पुरातत्व खात्याच्या नोंदवहीत हा समृद्ध वारसा टिपून ठेवण्यात आला आहे. इ.स. १८७७ मध्ये याच परिसरात उत्खनन झाले होते. तेथे बौद्धकालीन अवशेष मिळाले होते. त्यामध्ये दगडी पेटी आणि पेटीमध्ये काही वस्तू होत्या. या वस्तूंवरचा मजकूर बौद्धकालीन तत्त्वज्ञानाशी साधर्म्य दाखवणारा आहे. हे उत्खनन आणि त्यामध्ये सापडलेल्या वस्तू याविषयीचा विस्तृत लेख रा.गो. भांडारकर यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध केला. पुढे राजाराम महाविद्यालयाचे प्राध्यापक के.जी. कुंडणगार आणि आर.एस. पंचमुखी यांनी कोल्हापूर संस्थानची परवानगी घेऊन १९४४ मध्ये याच परिसरात उत्खनन केले. जवळपास वर्षभर हे काम सुरू होते. तीन मीटर खोल गेल्यानंतर येथे ब्रांझ धातूचे हांडे, वस्तू आढळल्या. पक्क्या विटांची बांधलेली कौलारू घरे सापडली. घरांची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण होती. चार खोल्यांच्या घरांमध्ये दोन चुली आणि सांडपाण्याची व्यवस्था देखील आढळून आली. बैलगाडीची प्रतिकृती मिळाली. आणि १४.३ सेंटीमीटर उंचीची ग्रीक देवता ‘पोसाइडन’ ची मूर्ती सापडली. सापडलेल्या या वस्तू पाहता हा काळ सर्वसाधारणपणे सातवाहन आणि त्यापूर्वीचा असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. पण रोमन साम्राज्याचे प्रतीक असणारी पोसाईडन देवतेची मूर्ती ब्रह्मपुरी मध्ये कशी आली? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडेल. यासाठी काही खलाशांनी लिहिलेली ‘पेरिपल्स ऑफ द एरीत्रियन’ ही पुस्तिका पहावी लागते.

पश्चिम किनाऱ्यावरून जहाजातून व्यापार
या पुस्तिकेमध्ये रोम साम्राज्याचा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील संस्थाने, राजवटी, शहरे यांच्याशी चालणाऱ्या व्यापाराबाबत उल्लेख आहे. कोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दाभोळ, राजापूर, कल्याण, ठाणे, येथून जहाजामार्गे आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा. देशाच्या विविध भागातून सुती कापड, मसाल्याचे पदार्थ, वनउपज, विविध प्रकारच्या वस्तू, कोरीव काम केलेल्या शोभेच्या वस्तू समुद्रमार्गे परदेशात निर्यात होत होत्या. या वस्तू घाटमाथ्यावर असणारी गावे, वसाहती या मार्गे बंदरांवर पोहोचायच्या. त्यामुळे व्यापारासाठी आलेले परकीय व्यापारी घाट माथ्यावरील गावांमध्ये थांबायचे. इथे आर्थिक व्यवहार पार पाडायचे. त्यामुळे स्थानिकांचा आणि त्यांचा संपर्क यायचा. यातूनच कोल्हापुरातल्या ब्रह्मपुरी टेकडीवरील त्याकाळी असणाऱ्या व्यापाऱ्यांना युरोपातील व्यापाऱ्यांनी पोसाइडन देवतेची मूर्ती भेट दिली असावी असा अंदाज वर्तवला जातो. इटली मधील नेपल्स शहरात झालेल्या उत्खननात हस्तिदंताची कोरीव मूर्ती सापडली. मूर्तीवरील कोरीव काम केशरचना दागिने पाहता ही मूर्ती महाराष्ट्रातील असावी असा संशोधकांचा अंदाज आहे. व्यापारातूनच या मूर्तीचे आदान-प्रदान झाले असावे असा तर्क वर्तवला जातो. मात्र यातून आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची कल्पना करता येते.

बंदरांना जोडलेल्या घाटवाटा
कोल्हापूर जिल्ह्यात जसे कोकणात उतरणारे घाट आहेत तसेच कोकणातल्या गावांना जोडणाऱ्या घाटातल्या पायवाटा देखील आहेत. या पायवाटांवरून बैलांवर व्यापाराच्या वस्तू टाकून व्यापारी घाटावर यायचे, याचे अनेक उल्लेख विविध पत्रांमध्ये आढळतात. मुघल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या वाटांवर तपासणी चौक्या असल्याचे दस्तऐवज देखील मिळाले आहेत. या चौक्या म्हणजे त्या काळातील जकात नाके होते. या चौक्यांवर बैलांना बांधण्यासाठी जागा होती. निवाऱ्याची सोय होती. याच्या देखील खुणा इथल्या काही गावांमध्ये पाहायला मिळतात. पूर्वी याच पायवाटांवरून व्यापार चालत होता. आजही या पायवाटांनी माणसांची येजा सुरू असते. एका वैभवशाली संस्कृतीच्या खुणा या पायवाटांनी आजही जपल्या आहेत. डच प्रवासी डॅन टविस्ट याने महाराष्ट्रातील व्यापारी घाट रस्त्यांबाबत लिखाण केले आहे. त्याच्या नोंदीवरून कोल्हापुरातील कोणत्या घाटवाटा कोणत्या बंदराशी जोडल्या होत्या याची कल्पना येते. त्याकाळी असणारा आंबे घाट आज आंबा घाट म्हणून ओळखला जातो. हा घाट रत्नागिरी बंदराशी जोडला आहे. आंबोली घाटातून वेंगुर्ला व सावंतवाडी बंदराकडे जाता येते. विजयदुर्ग बंदराशी फोंडाघाट जोडला आहे. तर राजापूर वखारीशी अनुस्कुरा घाटातून जाता येते. आज याच मार्गाने घाटातून वाहतूक चालते. मात्र पूर्वी डोंगरकपारी आणि जंगलातून या वाटा जायच्या.

उत्तर कर्नाटक मधून ब्रिटिश कोल्हापुरातील अणुस्कुरामार्गे राजापूर वखारीशी संपर्क साधत होते. या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौक्या होत्या आणि ते आपल्या मालाची कसून तपासणी करतात व योग्य तो कर सक्तीने वसूल करतात, असे माहिती देणारे पत्र कर्नाटकातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राजापूर वखारीतील आपल्या अधिकाऱ्यांना पाठवले होते. तेही उपलब्ध आहे.

कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय व्यापार कसा चालायचा याची माहिती देणारे नकाशे आणि साधने इथल्या टाऊन हॉल म्युझियममध्ये आजही पाहायला मिळतात. ब्रह्मपुरी परिसर आता ब्रह्मपुरीची टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे. आता इथे उत्खनन होत नाही. लहान-मोठे घरे बांधून इथे दाट लोकवस्ती तयार झाली आहे. कधीकाळी या परिसरात रोममधून व्यापारी यायचे. व्यापार करायचे ही बाब आजही मनाला अभिमानास्पद वाटते. कोकणात जाणाऱ्या पायवाटा असतील किंवा ब्रह्मपुरी ही टेकडी असेल या निर्जीव भूरूपाने आपला समृद्ध वारसा आजही शाबूत ठेवला आहे. वैभवाच्या आणि प्रगतीच्या कालखंडाकडे नेणाऱ्या या आपल्या पाऊलखुणा आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख