भारतीय उद्योग (Indian Industry) जगताचा ठसा जागतिक प्रतलावर उमटवणारे भारताचे खरे रत्न उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतनजी नवल टाटा (Ratan Naval Tata) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक भारतीयाच्या मनाला चटका लावणारे हे एक्झिट खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनापर्यंत विविध मार्गाने पोहोचले आहे.
अशा व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास जाणून घेऊया –
भारतीय उद्योग जगताचा ठसा जागतिक प्रतलावर उमटवणारे उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
रतन टाटा यांची यशोगाथा केवळ आर्थिक यशावर आधारित नाही. त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकीवर भर दिला. २००८ मुंबई हल्ल्यांनंतर पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांनी दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. विश्वास, विश्वासार्हतेला असलेला समानार्थी शब्द म्हणजे रतन टाटा. टाटांच्या घराण्यातील प्रत्येकानं तो सार्थ करून दाखवला आहे. याच टाटा समूहातील आणखी एक चकाकता हिरा म्हणजे रतन टाटा.
प्रारंभीचे जीवन –
रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई आणि अमेरिकेत झाले. पदवी प्राप्त करून ते १९६१ मध्ये टाटा समूहात सामील झाले. रतन टाटा अमेरिकेत सात वर्षे होते. तिथे कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांना लॉस एंजेलिसमध्ये चांगली नोकरी मिळाली होती, एक छान घर होतं. मात्र त्यांची आजी आणि जेआरडी यांच्या इच्छेमुळे त्यांना भारतात परतावं लागलं.
उद्योग क्षेत्रातील वाटचाल –
सुरुवातीच्या काळात ते टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा एअर इंडिया ही भारताची आघाडीची विमान कंपनी बनली. १९९१ मध्ये रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेलको (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच, टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. सुरूवातीला अनेकांनी रतन टाटांच्या व्यावसायिक आकलनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र 2000 मध्ये त्यांनी टाटांपेक्षा दुपटीनं मोठ्या असलेल्या ‘टेटली’ या ब्रिटिश समूहाचं अधिग्रहण करून सर्वांना आश्चर्यचकित केलं.
आज टाटा समूहाची ग्लोबल बेवरेजेस जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे. यानंतर रतन टाटांनी ‘कोरस’ ही युरोपातील सर्वात मोठी पोलाद कंपनी विकत घेतली. नॅनोच्या आधी 1998 मध्ये टाटा मोटर्सनं ‘इंडिका’ ही कार बाजारात लॉंच केली होती. टाटांनी जागतिक स्तरावरील देखील मोठा ठसा उमटवला आहे. टाटा समूह ‘जॅग्वार’ आणि ‘लॅंड रोवर’ सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या कारचं उत्पादन करतो. तर ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ जगातील सर्वात प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे. १९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते, तसेच त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते. ते पद्मविभूषण (२००८) आणि पद्मभूषण (२०००) या भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आहेत. टाटा यांना २००६ मध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या कामासाठी ‘ महाराष्ट्र भूषण ‘ आणि आसाममध्ये कर्करोगाच्या उपचारात योगदान दिल्याबद्दल २०२१ मध्ये ‘ आसाम वैभव ‘ असे विविध राज्य नागरी सन्मानही मिळाले आहेत.
मदतीचा हात –
भारतात कोरोनाचं संकट आल्यानंतर आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी म्हणून रतन टाटांनी तत्काळ टाटा ट्रस्टकडून 500 कोटी रुपये आणि टाटा कंपन्यांकडून 1000 कोटी रुपयांची मदत केली होती.
स्वत:ला मोठ्या धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना राहण्यासाठी त्यांनी टाटांच्या लक्झरी हॉटेलचा वापर करण्याची ऑफर दिली होती. असं पाऊल उचलणारे देखील रतन टाटाच पहिले होते. हे सर्व उभं करण्यामागील रतन टाटांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल.
आज सुद्धा भारतातील ट्रक चालक त्यांच्या वाहनांचा मागील बाजूस ‘ओके टाटा’ असं लिहितात. जेणेकरून कळावं की हा ट्रक टाटांच्या कंपनीचा आहे आणि म्हणून विश्वासार्ह आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांपासू रुग्णालयापर्यंत सामान्यांना परवडणाऱ्या दरांत चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प केला आणि त्यांनी तो पुर्णत्वास नेला. म्हणूनच रतनजी सर्वांना आपल्या घरातील एख व्यक्ती मानतात.
भारतीय संस्कृतीत परोपकार, निस्वार्थपणा, साधेपणा, सामाजिक बांधिलकी, नम्रपणा या मूल्यांना प्रचंड महत्त्व आहे. यशाच्या शिखरावर असताना आणि देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाच्या प्रमुखपदी असूनही रतन टाटा नावाच्या एका अद्भूत माणसाच्या अंगी या सर्व गुणांचं प्रकटीकरण झालेलं होतं. पुढील अनेक पिढ्या त्यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रेरणा घेत राहील यात शंका नाही.