उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभलमधील ताज्या हिंसाचारावर जोरदार गदारोळ झाला. या गदारोळानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी विरोधकांवर तीव्र हल्ला करत, संभलमधील वातावरण बिघडल्याचे म्हटले. ते म्हणाले, “१९४७ पासून संभलमध्ये दंगली होत आहेत, पण आमचे सरकार आल्यापासून एकही दंगल झाली नाही.”
योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या दंगलींचा तपशील मांडला. त्यात त्यांनी १९४८, १९५८, १९६२, १९७८ या वर्षांतील दंगलींमधील आकडेवारी दिली. विशेषतः १९७८ च्या दंगलीत १८४ हिंदूंना जिवंत जाळण्यात आले होते, हे त्यांनी स्पष्ट केले. “विरोधक या सत्याला मान्य करणार नाहीत,” असे ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, “जो कोणी दगडफेक करेल त्याला कठोर कारवाईचा सामना करावा लागेल, परंतु पुराव्याशिवाय कोणालाही अटक होत नसल्याचा दावाही योगी आदित्यनाथ यांनी केला.”
योगी आदित्यनाथ म्हणाले, मोहरमची मिरवणूक किंवा मुस्लीम समाजाची मिरवणूक हिंदू परिसरातून शांततेने निघते, पण हिंदू मिरवणूक मशिदीजवळून जात असताना दंगली का होतात? जर हिंदू वस्तीतून मुस्लिम मिरवणूक निघू शकते, तर मुस्लीम वस्तीतून हिंदू मिरवणूक का काढू नये? आता महाकुंभ आयोजित होणार आहे. विरोधकांनी त्यांच्या गैरकृत्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. अराजकता, दगडफेक आणि कायदा हातात घेतल्यास सरकार कडक कारवाई करेल. निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही, पण जो दोषी असेल त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. मुस्लीम भागातून हिंदू मिरवणूक काढू नये असे घटनेत कुठेही लिहिलेले नाही. जेव्हा हिंदूंना रोखले जाते, तेव्हा हिंदू परिसरातही प्रतिक्रिया उमठतात. जय श्रीरामचा नारा प्रक्षोभक नसून, तो आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.