Monday, February 16, 2026

“काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक

Share

मुंबई : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. “इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची ही परंपराच आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

केशव उपाध्ये यांचे ट्विट जसेच्या तसे:
“इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची परंपराच आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्य.
महाराज म्हणजे अस्मिता.
किल्ल्यांची अभेद्य साखळी, आरमाराची निर्मिती, शिस्तबद्ध महसूल व्यवस्था, स्त्री सन्मानाची कठोर चौकट !!
अठरापगड, बारामावळ जनतेचे रक्षण करणारे द्रष्टे नेतृत्व म्हणजे महाराज.

टीपू सुलतान म्हणजे काय?
असंख्य अत्याचार.
जबरदस्तीची धर्मांतरे.
हजारो हिंदूंची कत्तल.
इस्लामी साम्राज्य विस्ताराची महत्त्वाकांक्षा म्हणजे टीपू.

मग कुठे आणि कसली समकक्षता आहे महाराज आणि टीपूमध्ये, हर्षवर्धन सपकाळजी?…

हिंदू अस्मितेला कमी लेखण्याचे, तिला डावलण्याचे काँग्रेसी षड्यंत्र आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत.
म्हणूनच, काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा वाटतो.
औरंगजेबाच्या प्रेमापोटी छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध केला जातो.
आणि धर्मांध टीपूला महाराजांच्या समकक्ष ठरविण्याचे धाडस केले जाते.

महमद घोरी असो, टीपू असो किंवा औरंगजेब
देशाच्या अस्मितेवर, संस्कृतीवर घाला घालणारे कधीच नायक होऊ शकत नाहीत.

त्यांना नायकत्व देण्याचा कॉंग्रेसचा लाळघोट्या कट जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.”

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एका वक्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांना समकक्ष ठरवण्याचा प्रयत्न केला. या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून, भाजपने याला ‘हिंदू अस्मितेवरचा घाला’ असे म्हटले आहे.

उपाध्ये यांचा काँग्रेसवर थेट निशाणा
केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले की, महाराजांनी स्त्री सन्मानाची आणि शिस्तबद्ध स्वराज्याची निर्मिती केली, तर टीपू सुलतानने हिंदूंची कत्तल आणि सक्तीने धर्मांतर केले. अशा परिस्थितीत या दोघांची तुलना करणे हे सूर्यासमोर दिवा धरण्यासारखे किंवा जाणीवपूर्वक इतिहास कलंकित करण्यासारखे आहे.

अन्य लेख

संबंधित लेख