Saturday, May 25, 2024

कोल्हापुरातील युवकांचे मतदान कोणाला…

Share

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. या नवमतदारांची संख्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मतदान करताना त्यांचा दृष्टिकोन काय असेल, हे लक्षात येते. देशाची सुरक्षा, औद्योगिक आणि आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, सक्षम आरोग्यवस्था असे अनेक मुद्दे विचारात घेऊन ही पिढी मतदान करणार असल्याचे दिसते.

या निवडणुकीत जे युवक, युवती प्रथमच मतदान करणार आहेत, ते मतदानाबद्दल काय म्हणतात, काय विचार करतात, त्याची ही काही प्रतिनिधिक उदाहरणे…

हे माझ्या लक्षात आहे…
संविधानाने देशातील नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचे रक्षण करणारे आणि नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा देणारे सरकार केंद्रात हवे. या दृष्टीने विचार करणाऱ्या उमेदवाराला मी निवडणार आहे. देशातील पायाभूत सुविधांचा विकास करणाऱ्या पक्षाला प्राधान्य देऊ. मतदान हे माझे कर्तव्य आणि अधिकार आहे ही भावना पहिल्यांदा मतदान करताना माझ्या मनात आहे.

गौरी वासुदेवन, एलएलबी, तृतीय वर्ष, भारती विद्यापीठ, कोल्हापूर

सक्षम परराष्ट्र धोरण हा निकष
जागतिकीकरणानंतर जग जवळ आले आहे. जगामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावणारा आणि आपल्या देशाचे अन्य देशांशी चांगले संबंध ठेवणारा पंतप्रधान आवश्यक आहे. राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन भू-सामरिक धोरण बनवणारे सरकार अपेक्षित आहे. त्या दृष्टीने मांडणी करणाऱ्या उमेदवाराला मी मतदान करेन. तसेच स्थानिक पातळीवर आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. हा मुद्दा विचारात घेऊनही उमेदवाराची निवड करणार आहे.

श्रीनिधी पुजारी, एमबीबीएस, प्रथम वर्ष, एसएसपीएम मेडिकल कॉलेज, पडवे, सिंधुदूर्ग

स्थलांतराचा विचार करणारा खासदार हवा
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. औद्योगिक विकासाला चालना देणारा तसेच रोजगार उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणारा उमेदवार निवडून देऊ. रोजगारासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याचा विचार करून नव्या खासदाराने धोरण ठरवले पाहिजे. अशी मांडणी करणाऱ्या उमेदवाराचा विचार करू.

ओंकार सुतार, एम. एस्सी., प्रथम वर्ष, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

पहिले मतदान काम करणाऱ्याला
मी जीवनात पहिल्यांदाच मतदान करत आहे. ज्या उमेदवाराला लोकांच्या प्रश्नांची जाण आहे, नागरिकांसाठी जो नेहमी उपलब्ध आहे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात तत्पर आहे अशा उमेदवाराला मी माझे पहिले मत देणार आहे. जो काम करेल त्यालाच मत.

प्रद्युम्न दिवेकर, बीई प्रथम वर्ष, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, कोल्हापूर

हा माझा एकमेव निकष…
कोल्हापूर जिल्हा हा शेतीप्रधान असला तरी इथे औद्योगिक विकास झाला आहे. पण तो शहरापुरता मर्यादित आहे. ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे प्रकल्प आले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती असणाऱ्या आणि प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला मत देणार आहे. पायाभूत सुविधांचा विकास हाच एकमेव निकष पहिले मतदान करताना ठरवला आहे.

सिद्धेश देसाई, एम. एस्सी, द्वितीय वर्ष, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

महिला सक्षमीकरणाला प्राधान्य हवे
केंद्र सरकारने महिलांना ३३ टक्के आरक्षण दिल्याने आता राजकीय क्षेत्रात महिलांची संख्या वाढेल. हा निर्णय चांगला आहे. मात्र महिला सक्षमीकरणासाठी अजूनही काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्न करणारा, पाठपुरावा करणारा, सभागृहात मत मांडणारा उमेदवार निवडून देणार.
नंदिनी कराळे, एम. एस्सी., द्वितिय वर्ष, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

अन्य लेख

संबंधित लेख