Tuesday, March 10, 2026

कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा

Share

मसुरी : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापाठोपाठ आता टीम इंडियाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव याच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. कुलदीप यादव येत्या १४ मार्च २०२६ रोजी आपली मैत्रीण वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असून आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे.

कुलदीप आणि वंशिका यांचा विवाह सोहळा उत्तराखंडमधील प्रसिद्ध हिल स्टेशन मसुरी येथील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला आहे. विवाहाच्या एकदिवस आधी १३ मार्चला हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विवाह सोहळा १४ मार्च रोजी संपन्न होईल, ज्यासाठी दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि निवडक पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

या दोघांचा साखरपुडा ४ जून २०२५ रोजी लखनऊ येथे झाला होता. वास्तविक, हे लग्न नोव्हेंबर २०२५ मध्येच होणार होते, परंतु भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक आणि टी२० वर्ल्ड कपमधील निवडीमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण
कुलदीपचे वडील रामसिंह यादव यांनी ८ मार्च रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांना लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण दिले आहे. लग्नानंतर १७ मार्चला लखनऊ येथील ‘हॉटेल सेंट्रम’ मध्ये एका भव्य रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला बीसीसीआय (BCCI) अधिकारी, युपी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि भारतीय संघातील आजी-माजी क्रिकेटपटू हजेरी लावण्याची शक्यता आहे.

कुलदीप यादवची क्रिकेट कारकीर्द (Stats)
३१ वर्षांचा कुलदीप यादव नुकत्याच झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजेत्या संघाचा भाग होता. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर…

एकूण सामने: १९१ (तिन्ही फॉरमॅट मिळून)

एकूण विकेट्स: ३६५

सरासरी: २२.५० | इकोनॉमी: ४.८४

विशेष कामगिरी: आतापर्यंत ९ वेळा डावात ५ पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख