Tuesday, October 22, 2024

रात्रीच्या बैठकीत बीडमधील राजकीय गणिते ठरली?

Share

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) जवळ आल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असून, येत्या २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. निवडणुकांचे बिगुल वाजताच विविध पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागली असून, पक्षांतर्गत बैठका जोरात सुरू आहेत. यातच भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नुकतीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी बंगल्यावर रात्री उशिरा अनपेक्षित भेट दिली.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. ही भेट रात्री उशिरा ११.३० वाजता झाली. या भेटीत बीड जिल्ह्यातील विधानसभा जागांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे समजते. पंकजा मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही उपस्थित होते. बीड जिल्ह्याची ओळख भाजपचा बालेकिल्ला म्हणून आहे, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व होते.

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून अपेक्षित असून, मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न आणि स्थानिक परिस्थितीबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. बीड जिल्ह्यात महायुतीच्या अधिकाधिक जागा जिंकता याव्यात यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वर्चस्वाला शह देण्याच्या रणनीतीवरही दोन्ही नेत्यांनी विचारमंथन केले. तसेच, रात्रीच्या बैठकीत बीडमधील राजकीय गणिते ठरली का? अशी जोरदार चर्चा या भेटीमुळे सध्या सुरु आहे.

अन्य लेख

संबंधित लेख