Saturday, May 25, 2024

हैदराबादचा नवा मुक्तिसंग्राम: भाजपच्या माधवी लता यांचे ओवेसींच्या गडाला आव्हान

Share

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील आगामी लोकसभा निवडणूक ही कदाचित तेलंगणाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात जास्त चर्चेतील व सर्वांचे लक्ष लागलेली निवडणूक ठरणार आहे. जसजशी १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाची तारीख जवळ येत आहोत, तसतसे इथले राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या माधवी लता आणि एआयएमआयएम चे असूउद्दीन ओवेसी यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे.

हैदराबादचा लोकसभा मतदारसंघ हा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चा मागील अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला आहे, कट्टर मुस्लिमवादी विचारसरणीचे असदुद्दीन ओवेसी हे विद्यमान खासदार असून २००४ पासून सलग चार वेळा या जागेवर त्यांनी विजय मिळविलेला आहे. त्यांचे वडील, सुलतान सलाहुद्दीन ओवेसी हे यांनी १९८४ पासून या मतदारसंघात निवडून येत होते. हैदराबादच्या राजकीय पटलावर ओवेसी कुटुंबाचा दबदबा आहे. ओवेसी आणि रझाकार यांचे संबंध हा हैदराबादच्या इतिहासातील वादग्रस्त विषय आहे. रझाकार हे १९३८ मध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले निमलष्करी दल होते. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात, कासिम रझवी यांच्या नेतृत्वाखालील रझाकारांनी हैदराबाद संस्थानाला नव्याने स्थापन झालेल्या भारतीय संघराज्यात जोडण्यास विरोध केला. तसेच संस्थानातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. अखेरीस सप्टेंबर १९४८ मध्ये सरदार पटेल यांनी निमलष्करी कारवाई करून हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील करून घेतले. नंतरच्या काळात एमआयएमचे नेतृत्व असदुद्दीन ओवेसी यांचे वडील अब्दुल वाहिद ओवेसी यांच्याकडे सोपवण्यात आले. १९५७ मध्ये एमआयएम या पक्षाचे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआय एमआयएम) असे नामांतर करण्यात आले.

या लोकसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी भाजपने स्थानिक समाजसेविका व उद्योजिका कोम्पेल्ला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. माधवी लता यांनी या मतदारसंघात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बरीच कामे केली आहेत. ओवेसीच्या बालेकिल्ल्याला तडा देण्यासाठी भाजपने पूर्ण कंबर कसली आहे. मतदार यादीच्या विश्लेषणानुसार हैदराबाद लोकसभा मतदारसंघात अंदाजे साडे अकरा लाख मुस्लिम मतदार आहेत, जे एकूण मतदारांच्या सुमारे ५९% आहेत. मुस्लिम मतदारांचा मोठा टक्का हा भाजपसाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे. काँग्रेस पक्षाने इथून मोहम्मद वलीउल्लाह समीर यांची उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रभाव अत्यल्प होता, तरीही मजबूत प्रचार किंवा इतर स्थानिक पक्षांसोबत युती केल्यास ओवेसींच्या मुस्लिम मतांचे विभाजन होऊ शकते. याचा फायदा थोड्या प्रमाणात माधवी लता यांना होऊ शकतो.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्व पक्षांनी त्यांच्या प्रचाराला वेग दिला आहे. हैदराबाद लोकसभेच्या जागेसाठीची लढाई केवळ स्थानिक मुद्द्यांवर नाही तर भारतातील व्यापक वैचारिक आणि राजकीय मुद्दे देखील यात प्रतिबिंबित झालेले दिसतात. ट्रिपल तलाक, सी ए ए, कलम ३७० हे मुद्दे जसे हिंदू मतदारांवर प्रभाव टाकणारे आहेत तसेच ते मुस्लिम मतांचेही ध्रुवीकरण करणारे आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघात लक्षणीय मुस्लिम लोकसंख्या आहे, जी निवडणूक निकाल एकतर्फी वळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, ओवेसी यांनी सुमारे ५९% मते मिळविली होती. भारतीय जनता पार्टीच्या डॉ. भगवंत राव यांना एकूण मतदानाच्या २६. टक्के मते मिळाली होती. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या पुष्ट्ये श्रीकांत यांना केवळ ७.२ टक्के मते मिळविता आली. काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद फिरोज खान हे ५. ७टक्के मते मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिले. यावरून हैदराबादमध्ये मुस्लिम समाजाचा ओवेसी यांना असलेला मजबूत पाठिंबा दिसून येतो.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील गोशामहल विधानसभा ही एकमेव जागा भाजपच्या ताब्यात असून याचे प्रतिनिधित्व ‘फायरब्रँड’ आमदार राजा सिंह करतात. ते २०१४ पासून ही जागा जिंकत आलेले आहेत. इतर सर्व सहा विधानसभा मतदारसंघात AIMIM पक्षाचे मुस्लिम आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत ४५% मतदान झाले. मात्र या निवडणुकीत हा टक्का वाढविण्याचे प्रयत्न भाजप व ए आय एम आय एम हे दोन्ही पक्ष करतील. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार के. माधवी लता यांनी मतदारसंघात तब्बल सहा लाख बोगस मते असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने हैदराबाद मधील सुमारे ५ लाख मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकली आहेत असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे, ज्यात मृत, स्थलांतरित आणि डुप्लिकेट मतदारांचा समावेश होता. परंतु अधिकृतपणे याची पुष्टी होऊ शकली नाही.

माधवी लता यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसते. त्यांचे आक्रमक व प्रभावी वक्तृत्व माध्यमांमध्येही लक्ष वेधून घेत आहे. भाजपच्या रणनीतीमध्ये लक्षणीय संख्या असलेल्या मुस्लिम मतदारांमधील महिला मतदारांना जवळ करणे तसेच त्यांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेऊन त्यांची मते वळविणे समाविष्ट आहे. मुस्लिम मतांचा भक्कम पाठिंबा आणि हैदराबादमधील भूतकाळातील मतदान जरी ओवेसींच्या बाजूने असले तरी माधवी लता यांनी त्यांच्या आक्रमक प्रचार शैलीने आणि ओघवत्या वक्तृत्वाने ओवेसी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख