मुंबई : आज 6 डिसेंबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वच स्तरांतून त्यांना अभिवादन करण्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांची विचारधारा यांत मूलभूत फरक असल्याचा पुरोगामी वर्गाचा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेटाळून लावला आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे की, डॉ. आंबेडकर आणि संघ यांच्यात मार्ग वेगळे असले तरी, त्यांची दिशा एकच होती.
त्यांनीही ट्विट मध्ये म्हंटले कि, मध्यतंरी अमरावतीमध्ये श्रीमती कमलाताई गवई या संघाच्या व्यासपीठावर जाणार म्हणून मोठा गदारोळ निर्माण केला गेला. संघ व आंबेडकरी विचार हे विरोधी असल्याने त्या संघाच्या व्यासपीठावर जाणार यावर घमासान चर्चा झाली.
पण प्रत्यक्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आणि संघ विचार यात खरच अंतर आहे?…
याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. मार्ग वेगळे, मात्र दिशा एकच होती.
या देशातील पुरोगामी वर्गाने नेहमी हीच मांडणी केली की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाला संघाने, हिंदुत्ववादी शक्तीनी नेहमीच विरोध केला. मुळात ही मांडणीच चूक आहे. बाबासाहेबांनी भारतीय मूल्यांचे संवर्धन केले, ही वस्तुस्थिती आहे. संघदेखील हेच काम करीत आला आहे.
‘आर्य बाहेरून आले’ हा सिद्धांत बाबासाहेबांना अमान्य
केशव उपाध्ये यांनी पुरोगामी वर्गाच्या एका प्रमुख मांडणीवर आक्षेप घेतला. ‘आर्य बाहेरून आले’ हा सिद्धांत रुजवून समाजात संघर्ष निर्माण केला जातो, असे त्यांनी नमूद केले. मात्र, या सिद्धांताशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहमत नव्हते, असे त्यांनी पुराव्यासह सांगितले.
डॉ. आंबेडकरांचे मत: “आर्य बाहेरून आले आहेत हा सिध्दांत सापाला ठेचून मारल्याप्रमाणे मारला पाहिजे.” (संदर्भ: ‘हू वेअर द शुद्राज’ खंड ७, प्रकरण ५, पान क्र. ८६)
उपाध्ये यांनी स्पष्ट केले की, बाबासाहेबांच्या मते आर्यानी बाहेरून आक्रमण केल्याचा कोणताही पुरावा ऋवेदामध्ये सापडत नाही, त्यामुळे पुरोगामी वर्गाची ‘आर्य बाहेरून आले’ (संदर्भ हु वेअर द शुद्राज पान क्र ७४) ही मांडणीच चुकीची आहे. व अशी अजूनही उदाहरणे आहेत असे ते म्हणाले.
संघ आणि बाबासाहेबांचा संवाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्यात संवाद नव्हता, या प्रचारामुळे निर्माण झालेला गैरसमजही उपाध्ये यांनी दूर केला.
संघ संपर्क: दत्तोपंत ठेंगडी आणि मोरोपंत पिंगळे यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नित्य संपर्क होता.
संघ भेटी: १९३५ आणि १९३९ मध्ये पुणे येथे झालेल्या संघ शिक्षा वर्गास बाबासाहेबांनी भेटही दिली होती.
निवडणुकीतील मदत: १९५४ मध्ये भंडारा लोकसभा निवडणूक लढवताना संघ स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार केला होता, तर काँग्रेसने त्यांना पराभूत केले, हा इतिहास असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.
बाबासाहेबांनी भारतीय मूल्यांचे संवर्धन केले आणि संघदेखील हेच कार्य करत असल्याने, दोघांच्या विचारांत अंतर नसल्याचे केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ठामपणे नमूद केले आहे.