Tuesday, February 10, 2026

HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा! १० फेब्रुवारीपासून राज्यात बारावीचा रणसंग्राम सुरू

Share

महाराष्ट्र : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला (HSC Exam 2026) उद्या, मंगळवार दि. १० फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी या ‘अग्निपरीक्षेला’ सामोरे जाणार आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक
सुरुवात:
१० फेब्रुवारी २०२६

वेळ: सकाळचे सत्र (सकाळी ११ ते २:००) आणि दुपारचे सत्र (दुपारी ३ ते ६:००)

राज्यातील नऊ विभागीय मंडळांतर्गत (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) ही परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य शासनाने ‘कॉपीमुक्त अभियान’ अधिक कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
१. भरारी पथके: प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
२. सीसीटीव्ही पाळत: संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
३. केंद्राबाहेर संचारबंदी: परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
४. विद्यार्थ्यांसाठी नियम: विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
१० मिनिटांचा वाढीव वेळ रद्द केल्याने वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

तणावमुक्त परीक्षेसाठी समुपदेशन
विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने हेल्पलाईन क्रमांक आणि समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. “विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे,” असे आवाहन शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख