महापालिका निवडणूक 2026 : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकींच्या (Maharashtra Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून, ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांना 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप जाहीर केले जाईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणुकांना आता अवघे 23 दिवस उरले असले तरी, महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत घोषणांचा अजूनही अभाव आहे. जागावाटपावरून दोन्ही आघाड्यांमध्ये चर्चा सुरू असून, अनेक ठिकाणी अजूनही संभ्रम कायम आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील बहुतेक महापालिकांमध्ये भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेत युतीबाबत अद्यापही मतभेद कायम असून खणाखणी सुरू आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीची आज घोषणा होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर सविस्तर चर्चा सुरू असून काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्ष इच्छुक असल्याने मतभेद निर्माण झाले असून, हे प्रश्न थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पातळीवर सोडवले जात असल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणूक कार्यक्रम (Municipal Corporation Election 2026)
- नामनिर्देशन अर्ज दाखल: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- अर्ज छाननी: 31 डिसेंबर
- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: 2 जानेवारी 2026
- अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: 3 जानेवारी 2026
- मतदान: 15 जानेवारी 2026
- मतमोजणी व निकाल: 16 जानेवारी 2026