Thursday, December 5, 2024

महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

Share

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज मुंबईतील राजभवनात भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आजच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस हे उद्या, ५ डिसेंबर रोजी, तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, यांच्यासह अनेक साधू-संत, भाजपा शाशित राज्याचे मुख्यमंत्री, उच्चपदस्थ नेते, कार्यकर्ते आणि महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

महायुतीच्या यशस्वी निकालांमुळे सत्तास्थापनेचा हा दावा केला गेला आहे. महायुतीने मिळवलेल्या जागांमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला ५७, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या आहेत.

राज्याच्या विकासासाठी आणि स्थिरतेसाठी हे नवीन सरकार कोणती दिशा घेईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्याबाबत मोठी उत्सुकता असून, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये या सरकारच्या स्थापनेमुळे मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख