Saturday, August 30, 2025

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Share

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) मोर्चा मुंबईत (Mumbai) दाखल होताच, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) थेट संघर्ष सुरू झाला असून, भाजपने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर यापूर्वी लक्ष न दिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? …, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष. मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मो’र्चा म्हणून हेटाळणी करणारे सामना. आरक्षणचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार आणि वर्षानुवर्षे मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा कॅाग्रेस पक्ष.आजही हे तिघेही केवळ राजकारण करू पहात आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मनोज जरांगे यांच्या मागणीवर हे तिघेही मूग गिळून गप्प आहेत. आता या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. याबाबत कायदेशीर बाबी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे यांनी सरकार वर टीका करावी, लोकशाहीतील तो अधिकारच आहे. पण आता शरद पवार, उध्दव ठाकरे व कॅाग्रेस पक्षाकडे त्यांच्या मागणीबाबत स्पष्टता मागायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.

कारण सर्वाधिक संवेदनशील हे देवेंद्रजी सरकार आहे व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा देवेंद्रजीनी घेतला, आताही अशा वेळी त्यांच्या नावाने टीका करून काय साध्य करीत आहोत?, असा सवाल केशव उपाध्ये यांनी विचारला. यावेळी त्यांनी महायुती सरकारने मराठा समाजासाठी केलेल्या कामांची आकडेवारी सादर केली.

▪️मराठा समाजाला १० टक्के आरक्षण महायुती सरकार असतानाच मिळाले व सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला रद्द केले नाही
▪️शिंदे समितीस मुदतवाढ मिळावी ही त्यांची मागणी होती त्याला सहा महिने मुदत वाढ दिली.
▪️मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना नोकरी मिळावी अशी मागणी होती ती सुध्दा जवळपास पूर्ण झाली.
▪️ अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा समाजातील एक लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी, ८३२० कोटींचे कर्ज वाटप केले.
▪️राजर्षी शाहू महाराज शुल्कप्रतिपूर्ती योजनेतून मराठा समाजातील १७.५४ लाख विद्यार्थ्यांना ९२६२ कोटी दिले.

मराठा समाजाला न्याय देणारे देवेंद्रजी व या उलट कोणतीही भूमिका न घेणारे कॅाग्रेस, उबाठा, शरद पवार…, महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाशी द्रोह करणारे हे या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा, असा हल्लाबोल केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर केलाय.

अन्य लेख

संबंधित लेख