Sunday, May 26, 2024

भौगोलिक विविधतेचा मावळ लोकसभा मतदारसंघ

Share

भौगोलिक विविधता असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचाराच्या दृष्टीने राजकीय पक्षांचा कस लागणारा ठरला आहे. या मतदारसंघात कोकणातील तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

सन २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मावळ भागाचा वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात पुणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारसंघ येत असल्याने आणि या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचताना लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे चिंचवड आणि पनवेल हे राज्यातील मोठी संख्या असलेले दोन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात.

पनवेल, कर्जत, उरण हे रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. यातील पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. स्थानिक पातळीवरील काही नेत्यांच्या प्रवेशाने भाजपची ताकदही वाढल्याचे येथे चित्र आहे. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा असला तरी त्याचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याची राजकीय चर्चा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येत असेल्या सहाही विधानसभा मतदादरसंघात महायुतीचे आमदार असल्याने मावळावर महायुतीचे वर्चस्व दिसून येते.

महायुतीचे वर्चस्व

पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप भाजपचे आमदार आहेत. उरणचे अपक्ष आमदार महेश बाल्दी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके आणि पिंपरीमध्ये आण्णा बोनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. कर्जत मतदादरसंघातील आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेत (शिंदे गट) आहेत.

पनवेल हा राज्यातील मोठी मतदारसंख्या असलेला चिंचवडनंतरचा दुसरा मतदारसंघ ठरला आहे. या मतदारसंघात एकूण ५ लाख ९२ हजार ९१५ एवढी मतदारसंख्या आहे. त्यामध्ये ३ लाख ३ हजार ६८१ पुरूष तर २ लाख ६२ हजार १६८ स्त्री मतदार आहेत. ६६ तृतीयपंथी मतदारांची नोंद जिल्हा निवडणूक शाखेकडे करण्यात आली आहे.

कर्जत मतदारसंघात १ लाख ५३ हजार ८९ पुरूष आणि १ लाख ५१ हजार ४३० स्त्री मतदार आहेत. ४ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ४ हजार ५२३ मतदार आहेत.

उरण मतदारसंघात ३ लाख ९ हजार २७५ मतदार असून त्यामध्ये १ लाख ५५ हजार ४९८ पुरूष तर १ लाख ५३ हजार ७६९ स्त्री मतदार आहेत. तसेच ८ तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे.

जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात १ लाख ८८ हजार ९१२ पुरूष आणि १ लाख ७८ हजार ८५५ स्त्री मतदार आहेत. १२ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण मतदारांची संंख्या ३ लाख ६७ हजार ७७९ एवढी आहे.

चिंचवड हा राज्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे. यामध्ये ३ लाख १६ हजार १५२ पुरूष मतदार आहेत. तर, २ लाख ७९ हजार २१५ स्त्री मतदार आहेत. ४१ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात ५ लाख ९५ हजार ४०८ एकूण मतदार आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारदसंघातील ३ लाख ६४ हजार ८०६ मतदारांपैकी १ लाख ९२ हजार २०६ पुरूष, १ लाख ७२ हजार ५७२ स्त्री मतदार आहेत. २८ तृतीयपंथी मतदार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात पाच संवेदनशील मतदार केंद्र आहेत. त्यात चिंचवडमधील चार आणि मावळमधील एका मतदार केंद्राचा समावेश आहे.

अन्य लेख

संबंधित लेख