Monday, January 19, 2026

शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त

Share

शादाब रियाज शेख जेरबंद : १ किलोचा मुद्देमाल

पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात बाबुरावनगर परिसरातून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पेट्रोलिंग दरम्यान १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार याची किंमत २ कोटी १० लाख ४० हजार रुपये इतकी आहे. शादाब रियाज शेख (वय ४१, रा. शिरूर), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील कारवाईनंतर ही दुसरी कारवाई आहे. जिल्ह्यात अमली पदार्थाचे मोठे रॅकेट यातून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.


शनिवार (दि.१७) रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला बाबूरावनगर येथील मोकळ्या मैदानात ड्रग्जची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथके तयार करून रात्री १२.१० च्या सुमारास सापळा रचला. यावेळी दुचाकीवरून आलेल्या शादाब शेख याला थांबवून त्याची कसून झडती घेतली. त्याच्याकडील बॅगेत अमली पदार्थाचा साठा आढळला. पोलिसांनी ड्रग्जसह दुचाकी, मोबाइल आणि रोकड, असा एकूण २ कोटी १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे, शिरूर पोलीस ठाण्याचे दिलीप पवार, अंबादास थोरे, सचिन भोई, कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, हे अंमली पदार्थ कोठून आणला तसेच त्याचे धागेदोरे कोणाशी जोडलेले आहेत, याचा कसून तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत. या कारवाईमुळे शिरूरमधील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या साखळीचे कंबरडे मोडले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख