मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात (Maharashtra) दमदार सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. रविवारी, ९ जून रोजी, मान्सूनने मुंबई, पुणे सहित अनेक शहरांमध्ये जोरदार सरींनी बरसात करून महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. ११ जूनच्या नेहमीच्या तारखेच्या दोन दिवस अगोदर सुरू झालेल्या पावसामुळे उन्हाळ्याच्या झळांपासून लोकांना दिलासा मिळाला आहे.
पुण्यात (Pune) मुसळधार पावसामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती, रविवारी शहरात ११७ मिमी पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहिती नुसार, कालचा दिवस १९६९ नंतर जूनमधील तिसरा सर्वात ओला दिवस ठरला. IMD ने किनारी प्रदेशासाठी ‘रेड’ अलर्ट जारी केला असून, कर्नाटक, कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारपर्यंत अत्यंत मुसळधार पावसाचा (24 तासांत 204 मिमी पेक्षा जास्त) इशारा दिला आहे.
मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि किनारी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकासह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही जोरदार अतिवृष्टी केली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत या भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत, मान्सून त्याच्या अलीकडील नेहमीच्या तारखेपेक्षा दोन दिवस आधी ९ जूनला दाखल झाला. येत्या काही दिवसांत शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, हवामान विभागाने रविवारपर्यंत मुंबईसाठी (Mumbai) यलो अलर्ट जारी केला आहे.
मान्सूनच्या आगमनाचे शेतकरी आणि शहरवासीयांनी सुद्धा स्वागत केले आहे, मात्र , मुसळधार पावसामुळे राज्याच्या काही भागात पूर आणि पाणी साचल्याचे वृत्त आहे.
IMD ने रहिवाशांना सुरक्षित राहण्याचा आणि मुसळधार पावसात बाहेर पडण्याचे टाळण्याचा सल्ला दिला आहे. विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवत राहील आणि आवश्यकतेनुसार अपडेट जारी करेल.