Sunday, May 26, 2024

मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन; मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

Share

Pune Lok Sabha Constituency : ‘पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार’, असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा (BJP) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मोहोळ म्हणाले, ‘मी महापौर असताना 22 सप्टेंबर 2021 रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. हे धरण टाटा कंपनीचे आहे. कंपनीकडून पाणी मिळविण्यासाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू.’

मोहोळ पुढे म्हणाले, ‘समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. या योजनेतील 82 पैकी 51 टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, 20 टाक्यांचा वापर सुरू झाला आहे. बाराशेपैकी 921 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून,वितरण वाहिन्यांचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक पाण्याचे मीटर्स बसविण्यात आले आहेत. या योजनेमुळे पाण्याची गळती कमी होणार असून, पुणेकरांना शुद्ध, पुरेसा आणि चोवीस तास पाणीपुरवठा होऊ शकेल असा विश्वास वाटतो.’

‘नगर रस्ता, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी, संगमवाडी या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली. या धरणातून 2.8 टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. 2041 च्या लोकसंख्येचा विचार करून या प्रकल्पाची आखणी करण्यात करण्यात आली असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख